करगुप्पी
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : बेळगाव
उंची : २२६५ फुट
श्रेणी : सोपी
मराठी बहुभाषिक असलेला बेळगाव प्रांत भाषावार प्रांतरचना करताना कर्नाटक राज्याला जोडला गेला. आजही मराठी संस्कृती जपुन असणारा हा भाग कर्नाटक राज्यात असला तरी मनाने महाराष्ट्रात आहे याचा प्रत्यय आपल्याला बेळगाव मधील किल्ले फिरताना वारंवार येतो. बेळगाव जिल्ह्यात असणारे हे किल्ले एकेकाळी स्वराज्यात असल्याने या किल्ल्यांना मी महाराष्ट्रातील किल्ले समजतो व त्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले म्हणुन करत आहे. बेळगाव जिल्ह्यातील किल्ले भटकताना आमच्याकडे ३५ किल्ल्यांची नावे होती पण यात एक नाव अचानकपणे जोडले गेले. हुक्केरी तालुक्यातील दुर्गभ्रमंती करत असता पाच्छापूर किल्ला पाहुन चिक्कलांदिनी किल्ल्याकडे जाताना वाटेत एका टेकडीवर असलेला मोठा बुरुज नजरेस पडला व आमच्या किल्ल्यांच्या यादीत अजुन एका गडाची भर पडली तो म्हणजे किल्ले करगुप्पी. बेळगाव जिल्ह्याची भटकंती करताना मला येथील ३५ पेक्षा जास्त गढीकोटांना भेट देता आली.
...
त्या सर्व गढीकोटांची माहीती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर देण्याचा प्रयत्न केला आहे. करगुप्पी गावात एका लहानशा टेकडीवर असलेला हा किल्ला बेळगावपासुन ४० कि.मी.अंतरावर तर हुक्केरी या तालुक्याच्या ठिकाणापासुन २४ कि.मी.अंतरावर आहे. पाच्छापूर किल्ल्यापासून हे अंतर फक्त ५ कि.मी.आहे.गावात आल्यावर मल्लेश्वर मंदीर अथवा सरकारी शाळा विचारल्यास गाडीने आपण थेट किल्ल्यावरच पोहोचतो. या शिवाय गडावर येण्यासाठी दुसऱ्या बाजुने पायऱ्याची वाट आहे. गडावरील बुरुज व मंदीर वगळता इतर अवशेष भुईसपाट झाले असुन त्यावर शाळा व नव्याने काही घरे बांधलेली आहे. गडावरील मुळ मल्लेश्वर मंदिराची बाहेरून नव्याने उभारणी करण्यात आली असुन आतील मुळ रचना कायम आहे. घडीव दगडात बांधलेल्या या बुरुजाचे बांधकाम सांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मिश्रण वापरलेले नसुन बुरुजात प्रवेश करण्यासाठी एक लहान दरवाजा आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर पायऱ्यांनी आपण बुरुजाच्या माथ्यावर पोहोचतो. या भागात हि एकमेव टेकडी असुन या बुरुजावरून पाच्छापूर किल्ला व १०-१२ कि.मी.प्रदेश सहजपणे नजरेस पडतो. दुर्गदर्शनास १० मिनिटे पुरेशी होतात. पाच्छापूर किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर टेहळणीसाठी तसेच संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी या छोटेखानी किल्ल्याची बांधणी करण्यात आली असावी. किल्लाच अज्ञातवासात असल्याने किल्ल्याचा इतिहास देखील अज्ञातच आहे. टीप - किल्ल्यावर असताना अचानक आलेल्या जोरदार पावसाने जास्त छायाचित्रे घेता आली नाहीत.
© Suresh Nimbalkar