कनकदुर्ग

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : रत्नागिरी

उंची : 0

श्रेणी : सोपी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिध्द आहे. महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोली व तेथुन हर्णेला पोहोचता येते. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासीक महत्व आहे. सुवर्णदुर्गच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत हर्णे किनाऱ्यावर गोवा किल्ला, कनकदुर्ग व फत्तेगड या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. हर्णेच्या दक्षिणेकडे सुवर्णदुर्गासमोर समुद्रात घुसलेल्या एका लहानशा टेकडीच्या कातळमाथ्यावर हा लहानसा किल्ला बांधण्यात आला. या किल्ल्याची उभारणी नेमकी केव्हा आणि कोणी केली हे ज्ञात नसले तरी बहुतांशी इतिहासकारांच्या मते याची निर्मिती शिवकाळानंतर झाली असावी. हर्णे गावाकडून कनकदुर्गाकडे जाणारी वाट एका दगडी पुलावरून आपल्याला किल्ल्याजवळ घेऊन जाते. पावसाळ्यात तसेच भरतीच्या वेळी कनकदुर्गचा भुभागाशी असलेला संपर्क तुटू नये यासाठी हा पुल उभारण्यात आला आहे. ... किल्ल्याजवळ पोहोचल्यावर वाटेच्या उजव्या बाजुस काळ्या दगडात बांधलेला मोठा बुरुज व त्यावर फडकणारा भगवा झेंडा दिसतो. या बुरुजाच्या उजव्या बाजुस किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे असणारा किल्ल्याचा दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला आहे. या पायऱ्याच्या वाटेने पाच मिनिटांत कनकदुर्गाच्या माथ्याजवळ पोहोचतो. पायऱ्यांनी वर जाताना उजव्या बाजुस उतारावर कोरलेली काही पाण्याची टाकी दिसतात. इतक्या वर्षांच्या दुर्लक्षामुळे व स्थानिकांच्या वापराने या सर्व टाक्यांची कचराकुंडी झाली असुन गडावर येणाऱ्या पर्यटकांनी त्यात अजून भर घातली आहे. किल्ल्याचा परिसर साधारण ५ एकरवर पसरलेला असुन समुद्राच्या दिशेने असलेली किल्ल्याची थोडीफार तटबंदी शिल्लक आहे. किल्ल्याच्या समुद्र पायथ्याशी असणारा खडक समुद्राच्या पातळीत तासून सपाट केलेला आहे. गडाच्या माथ्यावर असणाऱ्या वास्तु पूर्णपणे नष्ट झाल्या असून काही ठिकाणी त्यांचे केवळ चौथरे शिल्लक आहेत. किल्ल्याच्या सर्वोच्च भागात दिपगृह बांधलेले असून सध्या ते वापरात नाही. कनकदुर्गावरुन पश्चिमेकडे सुवर्णदुर्ग तर उत्तरेकडे मच्छिमारांच्या वस्तीने घेरलेली फत्तेदुर्गाची टेकडी दिसते. दीपगृहाकडुन मुरुड दाभोळ तसेच गोपाळगडापर्यंत समुद्रकिनारा दिसतो. कनकदुर्गावर जास्त अवशेष नसल्याने अर्ध्या तासात आपला किल्ला पाहून होतो. सन १८६२ मधल्या एका संदर्भात कनकदुर्ग व फत्तेगड या दोन्ही किल्ल्यांची दुरावस्था झाल्याचे म्हटले आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!