कण्हेरगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशीक

उंची : ३५०० फुट

श्रेणी : कठीण

महाराष्ट्रात कण्हेरगड नावाने ओळखले जाणारे दोन किल्ले आहेत. यातील अजंठा डोंगर रांगेतील चाळीसगावचा कण्हेरगड इतिहासाबद्दल मूक आहे तर बागलाणातील कण्हेरगड रामजी पांगेरा व त्याच्या सहकाऱ्यांच्या पराक्रमाची गाथा उराशी कवटाळून अबोल झाला आहे. सातमाळा डोंगररांगेतुन काहीसा सुटावलेला इतिहासप्रसिध्द असा हा किल्ला आडवाटेवर असल्याने दुर्गप्रेमींकडून बराच दुर्लक्षित आहे. कण्हेरवाडी व सादडविहीर हि किल्ल्याच्या दोन बाजुच्या पायथ्याची गावे असुन या दोन्ही गावातुन किल्ल्यावर जाण्यासाठी ठळक वाटा आहेत. या दोन्ही गावातुन येणाऱ्या वाटा किल्ल्याची उतरत आलेली सोंड व समोरचा डोंगर यामधील खिंडीत एकत्र येतात व पुढे एकच वाट कण्हेरगड माथ्यावर जाते. या दोन्ही मार्गांनी गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी दोन तास लागतात. सादडविहीर गावात जाण्यासाठी नाशिक–नांदुरी-आठंबा-सादडविहीर असा ६५ कि.मी.चा मार्ग असून नाशिक-वणी-मुळाणे-कन्हेरवाडी हे अंतर ६० कि.मी.आहे. ... सादड विहीर गावातून सरळ गेलेला रस्ता पिंप्रीपाडा या गावामार्गे पुन्हा वणी-कळवण रस्त्याला जाऊन मिळाला आहे. सादड विहीर गावातुन किल्ल्याचा पायथा २ कि.मी.वर आहे. खाजगी वाहन असल्यास आपण थेट गडाच्या पायथ्याशी जाऊ शकतो. या रस्त्यावरून जाताना खिंडीकडे पाहत गेल्यास वाटेतच डावीकडे खिंडीकडे जाणारी मळलेली पायवाट दिसते. किल्ल्याच्या पायवाटेसाठीची महत्वाची खूण म्हणजे सादड विहीर गाव ते पिंप्रीपाडा रस्त्यावरून जाताना खिंडीच्या खालील भागात रस्त्याला एक लहानसा पुल आहे. या पुलाच्या थोडेसे अलीकडे डावीकडे खिंडीत जाणारी पायवाट आहे. पायवाट ठळक नसली तरी झाडीतुन वर चढत जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासात कण्हेरगड व त्याच्या शेजारील डोंगराच्या खिंडीत आणून सोडते. खिंडीतुन वर किल्ल्याकडे पाहीले असता टोकावरील बुरुज दिसतो. खिंडीतून या बुरुजाकडे जाणारा चढ साठ-सत्तर अंशातला आणि प्रचंड मुरमाड घसा-याने भरलेला आहे. या वाटेवरून जाताना चांगलीच भंबेरी उडते. घसाऱ्याचा हा भाग संपला कि कातळटप्पा सुरु होतो. या कातळात काही ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहेत. खिंडीतुन खडी चढण पार करत पाउण तासात आपण किल्ल्याच्या उध्वस्त बुरुजाखाली पोहोचतो. या बुरुजाच्या डावीकडे काही खोदीव पायऱ्या असून बुरुजाचा तळातील भाग कातळात कोरून काढलेला आहे तर वरील भागात दगडी बांधकाम केलेले आहे. बुरुजाच्या डावीकडुन आपला किल्ल्यात प्रवेश होतो. या ठिकाणी असलेला किल्ल्याचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन तटबंदी मात्र काही प्रमाणात शिल्लक आहे. बुरुजाच्या वरील भागात मातीने बुजलेले एक फुटके टाके आहे. येथुन किल्ल्याचा माथा दिसायला सुरवात होते. माथ्याकडे जाणारी वाट काही ठिकाणी बांधीव पायऱ्याची तर काही ठिकाणी कातळात कोरलेली असुन या वाटेवर पाण्याचे कोरडे टाके पहायला मिळते. टाक्याकडून पुढे आल्यावर उजवीकडे गडाच्या कातळास नैसर्गिक छिद्र (नेढे)आहे. या नेढ्यातुन वाहणारा वारा थकलेल्या शरीराला सुखावणारा आहे. नेढ्यासमोर कातळकड्याला चिटकुन पायऱ्या कोरलेल्या आहेत. याची रचना व इतर खुणा पहाता या ठिकाणी एखादा लहान दरवाजा असावा. या पायऱ्या चढून वर आल्यावर नेढ्याच्या माथ्यावर जाता येते. या वाटेवरून आपल्याला किल्ल्याच्या वरच्या टप्प्यावर दोन छोटे दगडी स्तंभ दिसतात. हा बहुधा किल्ल्याच्या खालील भागात नजर ठेवण्यासाठी तटबंदीतील झरोका असावा. या स्तंभांमधुन चढता उतरता येत असले तरी गडमाथ्यावर जाणारी वाट त्याच्या बाजुला आहे. या वाटेने आपण गडाच्या तिसऱ्या टप्प्यावर येतो. या भागात असलेल्या कातळाला (फोडण्यासाठी) मोठ्या प्रमाणात गोलाकार खळगे कोरलेले असुन एक बुजलेले पाण्याचे टाके आहे. हा तिसरा टप्पा पार केल्यावर आपल गडमाथ्यावर प्रवेश होतो. समुद्रसपाटीपासुन ३५१० फुट उंचावर असलेल्या कण्हेरगडाचा विस्तार दक्षिणोत्तर चार टप्प्यात झाला असुन त्रिकोणी आकाराचा बालेकिल्ला चौथ्या टप्प्यावर १२ एकरात सामावला आहे. गडमाथ्यावर बऱ्यापैकी सपाटी असुन गडाचे बहुतांशी अवशेष या माथ्यावरच विखुरले आहेत. माथ्यावर प्रवेश केल्यावर सुरवातीला काही घरांचे चौथरे तसेच दोन मोठया वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. या वास्तुच्या पुढील भागात डावीकडे पाण्याचे एक सुकलेले तळे तर उजवीकडे पाण्याने भरलेले कातळात कोरलेले टाके पहायला मिळते. या टाक्याच्या उजव्या बाजुस आल्यावर पाण्याने भरलेले दुसरे कोरीव टाके असुन या टाक्याच्या काठावर तुळशी वृंदावन, नंदी व शिवलिंग ठेवलेले आहे. याच्या उजव्या बाजुला घडीव दगडात बांधलेली दोन मोठी व एक लहान टाके असून यातील लहान टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथुन तुळशी वृंदावनाच्या पुढील बाजुस गेले असता गडाची लांबवर पसरलेली माची दिसून येते. या माचीच्या डाव्या बाजुस कातळात कोरलेली ५ टाकी असुन लांबवर पसरलेल्या माचीवर १-२ चौथरे वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. या माचीच्या टोकाला खाच मारून किल्ल्याला शेजारच्या डोंगरापासून वेगळे केले आहे. या खाचेपर्यंत जाऊन येण्यास पाऊण तास लागतो. माचीवरून मागे परतल्यावर धोडपच्या दिशेला म्हणजेच उजव्या बाजुच्या कड्याच्या काठाने निघावे. या वाटेने आपण आधी पाहिलेली ५ टाकी ओलांडल्यावर डाव्या बाजुस सुरवातीला पाहिलेला वाड्याचा मोठा चौथरा दिसतो. या चौथऱ्याच्या उजवीकडील दरीच्या काठाने एक वाट खाली उतरली आहे. या वाटेने २ मिनिटे खाली उतरल्यावर आपण धोडपच्या दिशेने कातळात कोरलेल्या दोन गुहांपाशी येतो. या गुहेत ७-८ जण सहजपणे मुक्काम करू शकतात. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पाहण्यास एक तास पुरेसा होतो. गडमाथ्यावरून सातमाळा रांगेतील अचला, अहिवंत, सप्तशृंग, मार्कंड्या, मोहनदर, धोडप, रवळ्या-जवळ्या, कांचन मंचन, इंद्राई, कोळदेहेर, राजदेहेर, चौल्हेर, प्रेमगिरी, भिलाई इतके किल्ले नजरेस पडतात. गड उतरताना चढण्यापेक्षा जास्त काळजीपूर्वक उतरावा लागतो. गड पायथ्याच्या सादडविहीर गावापासुन गड पाहुन परत येण्यासाठी ४ तास लागतात. इ.स. १६७१ ऑक्टोबर महिन्यात दिलेरखान व बहादूरखान यांच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य बागलाणात घुसले व त्यांनी साल्हेरला वेढा घातला. साल्हेर बरोबर दुसरा एखादा किल्ला ताब्यात घ्यावा या आशेने काही मुघल सैन्य घेऊन दिलेरखानाने रवळ्या किल्ल्याला वेढा घातला पण मराठ्यांनी रवळ्याला वेढा घालून बसलेल्या मुघल सैन्यावर वेळी-अवेळी छापे घालुन त्यांना हैराण केले. त्यामुळे कंटाळून दिलेरखानाने रवळ्याचा नाद सोडला व आपला मोर्चा ह्या परिसरातील कमी उंचीच्या कण्हेरा गडाकडे वळवला. यावेळी कण्हेराचा किल्लेदार होता रामाजी पांगेरा. अफझलखान वधावेळी जावळीत ज्या पाच मराठा सरदारांनी आदिलशाही सैन्यावर हल्ला चढवला त्यात कमळोजी साळुंके, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, कोंडाजी वरडवले यांसोबत रामाजी पांगेराचे नाव येते. कवींद्र परमानंद यांनी शिवभारतात रामाजीला 'अग्निसारखा शूर' या शब्दात गौरवलं आहे. कण्हेरगडावर त्यावेळी रामाजी सोबत हजारभर मावळे होते. दिलेरखानाने गडाला वेढा घालायला सुरुवात केली. रामाजीने कण्हेरगडावरून मुघलांचे सैन्य पाहीले व युद्ध टळणार नाही हे त्याने जाणले. तीनशे मावळे गडाच्या रक्षणासाठी गडावरच ठेवुन उर्वरित सातशे मावळे घेऊन या वेढ्यावर अचानक हल्ला चढवण्याची व्यूहरचना रामाजी पांगेरा यांनी आखली. मोगल सैन्याचा वेढा पूर्ण होण्याच्या आत वेढा तोडणे आणि सैन्य उधळणे हा हेतू त्यात होता. त्यामुळे पहाटेच्या अंधारात रामाजी पांगेरा यांच्या नेतृत्वाखाली ७०० मावळ्यांनी मुघल सैन्यावर हल्ला केला. अचानक पडलेल्या छाप्याने मुघल सैन्य गोंधळले. संख्येने कमी असूनही सातशे मावळ्यांनी सुमारे बाराशे मोगल कापून काढले. साधारण तीन तास कण्हेरगडाच्या परिसरात हे रणकंदन सुरू होते. रामाजी आणि त्याच्या मराठ्यांनी शौर्याची कमाल केली. कोणतीही कुमक शिल्लक नसल्याने सर्व मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राण दिले. सभासदाची बखर यात या लढाईविषयी लिहताना सभासद म्हणतो." टिपरी जैसी सिमगीयाची दणाणते तैसे मराठे कडाडले." म्हणजे शिमग्याच्या दिवशी जशी टिपरी हलगीवर वारंवार कडाडते तसे मावळे मुघलांवर तुटून पडले होते. या लढाईने आपण मुघलांना उघडया मैदानावर पराभूत करू हा आत्मविश्वास मराठ्यांच्या मनात जागृत झाला तर मुघल सैन्याचे मनोधैर्य खचले. किल्ला काही दिलेरखानाला जिंकता आला नाही. रामजी पांगेरा व ७०० मराठयांच्या अतुनलीय पराक्रमाने कण्हेरगड इतिहासात अमर झाला. या नंतर इ.स.१६८२ साली डिसेंबर महिन्यात इजाजतखान याने किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही किल्ला जिंकता आला नाही. यानंतर १७५३-५४ च्या दरम्यान नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला नबाब सलाबतजंगला देऊन त्याच्याकडुन पोचपावती घेण्याच्या सूचना किल्लेदाराला दिल्याचे दिसून येते. १७८९-९० च्या सुमारास कोळ्यांनी बंड करून हा किल्ला ताब्यात घेतला. इ.स.१८१८मध्ये त्रिंबकगड घेतल्यावर ब्रिटिशानी जे इतर महत्वाचे किल्ले ताब्यात घेतले त्यात कण्हेरगडचा उल्लेख येतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!