कण्हेरगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : जळगाव
उंची : २२५० फुट
श्रेणी : कठीण
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव जवळ गौताळा अभयारण्यात पाटणादेवीचे सुप्रसिद्ध व भव्य असे यादवकालीन मंदिर आहे. या भागातील बहुतांशी लोकांचे हे कुलदैवत असल्याने येथे सतत वर्दळ असते पण या मंदिरापासून काही अंतरावर असलेले प्राचीन महादेव मंदिर व कण्हेरगड किल्ला मात्र या सर्व कोलाहलापासुन दुर आहे. महादेव मंदिरामागे असलेल्या या गडाला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गौताळा अभयारण्य गाठावे लागते. गौताळा अभयारण्य ते चाळीसगाव हे अंतर १८ कि.मी. असुन मुंबईपासून हे अंतर २५० कि.मी.आहे. अभयारण्यात सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश दिला जातो. अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून साधारण १.५ कि. मी. आत आल्यावर उजवीकडे महादेव मंदिर अशी पाटी असुन या पाटीकडून मंदिराकडे जाणारी पायवाट दिसते. या वाटेने काही मिनिटांत आपण महादेव मंदिरापाशी पोहोचतो. मंदिराच्या आसपासच्या परिसरात दिसणारे कोरीव दगड व इतर अवशेष पहाता या ठिकाणी केवळ एकच मंदिर नसुन मंदिरसमुह व मोठया प्रमाणात वस्ती असल्याचे दिसुन येते.
...
हे मंदिर भारतीय पुरातत्त्वखात्याने संरक्षित म्हणून जाहीर केले आहे. साधारण ८ फुट उंच फरसबंद दगडी चौथऱ्यावर पुर्वाभिमुख बांधलेले हे मंदिर ७५ x ३६ x १८ फुट लांबीरुंदीचे असुन मंदिराचे मुखमंडप, सभामंडप व गाभारा असे तीन भाग आहेत. मंदिराच्या तळात गजपृष्ठीका असुन त्यावरील शिल्पांची मोठया प्रमाणात झीज झालेली आहे. गर्भगृहात शिवलिंग असुन द्वारशाखेच्या ललाट बिंबावर गणेश व तळात द्वारपाल कोरलेले आहेत. सभामंडपाच्या डावीकडील भिंतीत संस्कृत भाषेतील देवनागरी लिपीत कोरलेला शिलालेख असुन मंडपात नंदीची मुर्ती आहे. मंदिराच्या छ्तावर सुंदर कमळ कोरलेले असुन बाहेरील बाजूस अनेक मूर्ती कोरल्या आहेत. या मंदिराच्या मागील बाजूस कन्हेरगडाचा डोंगर पसरलेला आहे. मंदिराच्या मागे आल्यावर आपल्याला एक आडवी जाणारी पायवाट दिसते. या पायवाटेने डावीकडे गेल्यावर उजवीकडे जाणारी पायवाट दिसते. या वाटेवर दगडी चौथऱ्यावर सिमेंटमध्ये बांधलेली समाधीछत्री आहे. गडाकडे जाण्यासाठी हि ठळक खुण आहे. येथून डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेने १० मिनिटांचा चढ चढून गेल्यावर एक आडवी जाणारी पायवाट दिसते. या वाटेने उजव्या बाजूला वळल्यावर ५-१० मिनिटांत आपण नागार्जुन कोठडी या जैन लेण्यासमोर येतो. मंदिरापासून इथपर्यंत येण्यास अर्धा तास लागतो. नवव्या शतकाच्या उत्तरार्धात कोरलेल्या या जैन लेण्यात तीन दालने असुन बाहेर अर्धवट कोरलेला कीर्तिस्तंभ आहे. लेण्याचा व्हरांडा २ खांबांवर तोललेला असुन डाव्या बाजूला एक खोली आहे तर उजव्या बाजुला थोडे वर खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. २ खांबांवर तोललेल्या या सभामंडपाच्या द्वारशाखेच्या ललाटबिंबावर तीर्थंकर कोरलेले असुन खाली दोन्ही बाजूला गजमुख कोरलेले आहेत. सभामंडपा समोरील भिंतीवर महावीरांची पद्मासनात बसलेली मुर्ती असुन शेजारी ४ तिर्थंकर कोरलेले आहेत. मंडपाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर गोमटेश्वराची ४ फुट उंच मुर्ती असुन प्रभावळीत गंधर्वसोबत सेविका कोरलेल्या आहेत. सभामंडपाच्या एका खांबाखाली अंबिकेची मुर्ती कोरली आहे. नागार्जुन लेणे पाहुन पायवाटेने सरळ पुढे गेल्यावर आपण सीता न्हाणी या दुसऱ्या लेण्यांकडे पोहोचतो. १८ फूट रुंदीचे हे लेणे दोन खांबावर तोललेले असुन ओवरीत उजव्या बाजुला खडकात खोदलेले पाण्याचे कोरडे टाके आहे. लेण्यात कोणत्याही प्रकारचे कोरीव काम दिसुन येत नाही. हि लेणी पाहून पायवाटेने सरळ पुढे आपण कण्हेरगडाच्या खाली उतरत आलेल्या सोंडेवर पोहोचतो. या वाटेने चालत असताना आपल्याला पायाखाली तटबंदीचे काही अवशेष दिसुन येतात. किल्ल्याच्या या सोंडेवर डाव्या बाजूला २५ फुट उंच कातळटप्पा असुन तो चढल्यावर आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. पण प्रथम गडावर न जाता पुढील भागात असलेली शृंगार चावडी लेणी आधी बघून घ्यावी. या पायवाटेने सरळ चालत डोंगराला वळसा घालुन आपण २ डोंगरांमधील घळीत पोहोचतो. या घळीत थोडेसे वर चढून गेल्यावर खडकात खोदलेले पाण्याचे लहान टाके व त्यावरील लेणी दिसतात. शृंगार चावडी म्हणुन ओळखली जाणारी ही हिंदु लेणी साधारण अकराव्या शतकात खोदण्यात आली. पाच नक्षीदार खांबांवर तोललेला या लेण्याचा व्हरांडा समांतर काटकोनात कोरलेला असुन व्हरांड्याच्या बाहेरील भागावर रामायण, दशावतार यांचे शिल्पपट कोरले आहेत. सभामंडपाची व्दारशाखा नक्षीने मढवलेली असुन खालील भागात द्वारपाल व कमळाची फुले कोरलेली आहेत. सभामंडपात पाणी भरलेले असुन कोणतीही मुर्ती दिसुन येत नाही. लेणे पाहुन आल्या वाटेने पुन्हा डोंगर सोंडेवरील कातळ टप्प्याखाली यावे. २५ फुट उंचीचा हा कातळकडा चढल्यावर उजवीकडून आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. किल्ल्यावर प्रवेश करताना कडयाच्या टोकावर पायाखाली पुर्णपणे नष्ट झालेल्या दरवाजाच्या पायाचे अवशेष दिसतात तर समोर टोपीसारखा कण्हेरगडाचा बालेकिल्ला दिसतो. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून २२५५ फुट असुन माची व निमुळत्या आकाराचा बालेकिल्ला दक्षिणोत्तर साधारण २५ एकर परिसरात पसरलेला आहे. माचीवरून बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत एक खडकात खोदलेले खांबटाके दिसते. टाक्याच्या तोंडावर मोठया प्रमाणात माती जमा झाल्याने तळात कोरलेला आतील भाग सहजपणे दिसुन येत नाही. टाके पाहुन पुढे जाताना वाटेत एक कबर व कबरीच्या वरील बाजूस वाड्याचे व घरांचे अवशेष दिसतात. हे अवशेष पाहुन बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर एक साचपाण्याचा तलाव व दोन खडकात खोदलेली पाण्याची टाकी दिसुन येतात. यातील एक टाके खांबटाके असुन वरून वाहुन येणाऱ्या मातीने हि दोन्ही टाकी मोठया प्रमाणात बुजली आहेत. या टाक्यांच्या वरील बाजूस एक कबर आहे. येथे एक पायवाट बालेकिल्ल्याला वळसा घालताना दिसते. उजव्या बाजूस जाणाऱ्या वाटेवर कोणतेही अवशेष नसल्याने डावीकडील वाटेने पुढे निघावे. या वाटेने जाताना डाव्या बाजूला दरीत पाटणादेवीचे मंदिर व वनखात्याची विश्रामगृहे दिसतात. या वाटेच्या शेवटी डोंगराच्या उतारावर गडाचा पश्चिमाभिमुख दरवाजा असुन दरवाजाशेजारी असलेले बुरुज व आतील पहारेकऱ्याच्या देवड्या आजही सुस्थितीत आहेत. दरवाजाच्या बाहेरील बाजूस उतारावर कातळात कोरलेली एक खाच दिसते या ठिकाणी बहुधा किल्ल्याच्या पूर्वीच्या बांधकामातील दरवाजा असावा. दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजुच्या डोंगर उतारावरून एक निसरडी पायवाट वर जाताना दिसते. या वाटेने बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत खडकात खोदलेले पाण्याचे खांबटाके व त्यावरील भागात एक गुहा दिसते. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे सोपे प्रस्तरारोहण करून आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. नेहमी गडकिल्ले फिरणाऱ्यानीच या वाटेचा वापर करावा अन्यथा आपण आधी पाहिलेल्या साचपाण्याच्या तलावाकडून एक मळलेली पायवाट बालेकिल्ल्यावर येते त्या वाटेचा वापर करावा. गडाचा माथा अतिशय लहान असुन माथ्यावर एक बुजत चाललेले पाण्याचे टाके, कबर, वाड्याचा चौथरा, काही घरांची जोती व पत्र्याच्या निवाऱ्याखाली ठेवलेली मारूतीची मुर्ती पहायला मिळते. माथ्यावरून पितळखोरा लेण्यांचा डोंगर व त्यामागे पेडका किल्ल्याचा आयताकृती माथा दिसतो. माथ्यावरून कबरीसमोरील पायवाटेने खाली उतरताना उध्वस्त दरवाजाचे अवशेष व काही पायऱ्या तसेच बालेकिल्ल्याची तटबंदी दिसते. हि वाट सरळ खाली आपण सुरवातीला पाहिलेल्या साचपाण्याच्या तलावापाशी येते. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण कन्हेरगड व लेणी पहाण्यासाठी ३ तास लागतात. किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय केवळ एकाच ठिकाणी असुन सर्वाना तिथपर्यंत जाणे शक्य नसल्याने सोबत पाणी बाळगावे. कण्हेरगडच्या परीसरातील पितळखोरे लेणी ५-६ व्या शतकात वाकाटकांच्या काळात खोदली गेली व याच काळात या दुर्गाची उभारणी झाली असावी. कण्हेरगडाचा इतिहास पहाता इ.स. १००० ते १२१६ पर्यंत या भागावर पाटण येथे राजधानी असलेल्या निकुंभांची सत्ता होती. इ.स.१२१६– १७च्या दरम्यान हा किल्ला यादवांच्या ताब्यात आला. यादवांच्या काळात हा भाग विज्जलगड या नावाने प्रसिध्द होता. शुन्याचा शोध लावणारे गणिती भास्कराचार्य यांचा जन्म व वास्तव्य इ.स.१११४ ते इ.स. ११८५ या काळात विज्जलगड परीसरात होते. त्यांचा सिध्दांत शिरोमणी ग्रंथातील लिलावती हा गणितावरील खंड प्रसिध्द आहेत. शके ११५० (इ.स.१२२८) मधील आषाढी अमावास्या व सूर्यग्रहण असलेल्या दिवशी पाटणादेवीचे मंदिर यादवराय खेमचंद्र व गोविंदराज मौर्य जनतेसाठी खुले केल्याचा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. इ.स.१३०० मधे येथे फारूकी घराण्याची सत्ता होती तर इ.स. १६०० मधे मुघल बादशहा शहाजहानच्या काळात हा किल्ला व आसपासचा प्रदेश मोगलांच्या ताब्यात आला. मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला केव्हा व कसा आला याचा उल्लेख आढळत नसला तरी इ.स. १७५२ ते १८१८ पर्यंत हा किल्ला मराठयांच्या ताब्यात होता. इ.स.१८१८ मध्ये हा किल्ला सहजपणे इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar