कडा
प्रकार : गढी
जिल्हा : बीड
उंची : 0
श्रेणी : सोपी
गढी वास्तुशास्त्रानुसार परिपुर्ण अशा मोजक्याच गढ्या आज महाराष्ट्रात शिल्लक असुन कडा येथील गढी त्यापैकी एक आहे. संरक्षणासाठी परिपुर्ण अशा स्वरूपाच्या केवळ ८-१० गढी आज शिल्लक असुन त्यात कडा येथील गढीचा वरचा क्रमांक लागतो. कडा हे गाव नंतरच्या काळात वसलेले असुन गढीच्या चारही बाजूला गावाचा विस्तार झाल्याने गढी गावाच्या मध्यभागी आली आहे. मराठवाड्यात हैद्राबाद निझाम शासन असल्याने हि गढी स्वतंत्रपुर्व काळापर्यंत वापरात होती पण आता मात्र या गढीच्या सौंदर्याला उतरती कळा लागली आहे. वाढत जाणारी वस्ती देखील काही प्रमाणात या गढीच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेले हे गाव आष्टी या तालुक्याच्या ठिकाणाहुन १५ कि.मी.अंतरावर तर अहमदनगर शहरापासुन पासुन ४५ कि.मी. अंतरावर आहे. गावाला कडा हे नाव कडी नदीच्या नावावरून पडले असुन येथे नदी गावाबाहेर गोल कडे करून वहाते म्हणुन तिला कडी नाव पडलेले आहे. गावात प्रवेश केल्यावर गढी किंवा किल्ला अशी विचारणा केल्यास आपण सहजपणे गढीच्या दरवाजात पोहोचतो. गढीचा परीसर साधारण २ एकर असुन गढीचे बांधकाम दोन भागात विभागलेले आहे. बाहेर संरक्षणासाठी मुख्य तटबंदी व आत गढीची तटबंदी अशी दुहेरी तटबंदी या गढीला लाभली आहे. या दुहेरी तटबंदीत लहानमोठे आकाराचे एकुण १२ बुरुज असुन यातील ८ बुरुज बाहेरील तटबंदीत तर ४ बुरुज आतील गढीच्या तटबंदीला आहेत.
...
यातील बहुतांशी बुरुजाची आता पडझड झाली आहे. गढीचा मुख्य दरवाजा पुर्वाभिमुख असुन गोलाकार आकाराच्या पोकळ बुरुजात बांधलेला आहे. दरवाजाची उंची पहाता कधीकाळी या दरवाजासमोर पायऱ्या असाव्यात पण आता त्यावर भराव टाकून रस्ता बनविण्यात आला आहे. दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन या दरवाजाच्या वरील बाजुस नाकासारखा त्रिकोणी आकाराचा झरोका पहायला मिळतो. याचा वापर शुभप्रसंगी येथुन फुले टाकणे व गढीच्या दरवाजावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. गढीची तटबंदी साधारण २५ फुट उंच असुन यातील तळातील १० फुट उंच तटबंदी घडीव दगडात बांधलेली आहे तर त्यावरील तटबंदी विटांनी बांधलेली आहे. या तटबंदीत जागोजागी बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या दिसुन येतात. मुख्य दरवाजाने आत शिरल्यावर बुरुजाच्या २०x२० लांबीरुंदीचा चौक असुन या चौकात दोन बाजुना घडीव दगडात बांधलेला दगडी चौथरा आहे. या चौथऱ्यावरील तळखडे पहाता पुर्वी या चौकावर छप्पर असल्याचे कळते. येथे गढीत येणाऱ्या माणसांची बैठकीची व्यवस्था असावी. या चौकातच मुख्य दरवाजाच्या काटकोनात बांधलेला गढीचा दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर उजवीकडे दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या असुन त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. पुढील भागात दोन्ही बाजुना नव्याने बांधलेली घरे असुन कधीकाळी येथे घोड्याचा तबेला व चाकरांच्या खोल्या असल्याचे सांगण्यात येते. दुसऱ्या दरवाजा पासुन साधारण १५० फुट अतरावर मुख्य गढी असुन या गढीच्या अलीकडे डाव्या बाजुस मोकळे मैदान आहे. या मैदानाच्या अलीकडे गढीला पाणीपुरवठा करणारी लहानशी विहीर असुन आता ती बहुतांशी बुजलेल्या स्थितीत आहे. मुख्य गढीचे प्रवेशद्वार पुर्वाभिमुख असुन ते षटकोनी आकाराच्या बुरुजात बांधलेले आहे. या दरवाजाची बांधणी पुर्णपणे घडीव दगडात केलेली असुन त्याची सुंदर कमान देखील घडीव दगडात बांधलेली आहे. बाहेरीळ तटबंदी प्रमाणे या तटाचे बांधकाम देखील घडीव दगड व विटा वापरून करण्यात आले आहे. बुरुजातील या दरवाजाने आत शिरल्यावर समोर पहारेकऱ्याची लहान खोली असुन उजवीकडे लहान बंदीस्त चौक आहे. या चौकात दुसरा दरवाजा पहायला मिळतो. या दरवाजाने आत शिरल्यावर १५x१५ फुट आकाराचा चौक असुन या चौकात तीन बाजुना वाड्याचा घडीव दगडात बांधलेला ४ फुट उंच चौथरा आहे. या चौथऱ्याखाली तळघर असुन त्याचा लहान दरवाजा या चौथऱ्याखाली पहायला मिळतो. चौथऱ्यावर जाण्यासाठी दोन बाजुना बांधीव दगडी पायऱ्या आहेत. चौथऱ्यावरील चौसोपी वाडा पुर्णपणे नष्ट झाला असुन तेथे नव्याने घरे बांधण्यात आली आहेत. हा भाग खाजगी वापरात असल्याने आत जाता येत नाही. हा भाग पाहुन झाल्यावर बाहेरील परकोटातुन गढीला फेरी मारता येते. परकोटात बहुतांशी नव्याने बांधकाम झाल्याने गढीचे मुळ अवशेष नष्ट झाले असुन मोकळ्या भागात काटेरी झाडी वाढलेली आहेत. संपुर्ण गढी पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो. या शिवाय मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजुस याच गढी मालकाने बांधलेली गोलाकार आकाराची सुंदर व प्रशस्त बारव आहे. बारव खोल असुन या बारवेत उतरण्यासाठी + चिन्हाच्या आकाराच्या म्हणजे चार बाजुंनी खाली विहिरीतील दरवाजाकडे उतरणाऱ्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. या विहिरीतील पाणी आजही वापरात आहेत. या गढी सोबत वाबळे देशमुखांनी कडा गावात बांधलेले भव्य असे राममंदिर आहे. या सर्व वास्तु पाहण्यास एक तास पुरेसा होतो. गढीतील वतनदार घराणे देशमुखांचे असुन त्यांचे मूळ आडनाव वाबळे आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या कळात या घराण्याला ७२ गावांची जहागिरी मिळाली व त्यांनी या गढीची निर्मीती केले. म्हणजे साधारण २५० वर्षापुर्वी गढीचे बांधकाम झाले असावे. पानिपत तसेच खर्डा येथील लढाईत या देशमुखांनी आपले योगदान दिलेले आहे. गढीच्या संस्थापकाच्या जन्मकुंडलीचा एक सचित्र कागद सापडला असुन त्याची रुंदी दीड फुट तर लांबी १५० फुट आहे. हा कागद, या घराण्याच्या वतनाची कागदपत्रे व ताम्रपट अहमदनगरच्या ऐतिहासिक वस्तु संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. १९९२ साली बांधकामासाठी गढीत खोदकाम करत असता सापडलेल्या १८ तोफा औरंगाबाद कमिशनर कार्यालयात जमा करण्यात आल्या. याशिवाय गढीत सापडलेले १६६ ग्रंथ व मोडी लिपीतील इतर कागदपत्रे अहमदनगर वस्तु संग्रहालयात ठेवलेली आहेत.
© Suresh Nimbalkar