ओवळे कोट
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : ठाणे
उंची : 0
श्रेणी : सोपी
प्राचीन काळी कल्याण हे महत्वाचे बंदर होते. अरबी समुद्रातून उल्हासखाडी मार्गे जहाजांची ये-जा चालत असे. ह्याच जलमार्गावर घोडबंदर, नागलाबंदर ही प्राचीन बंदरे होती. ह्या बंदरांचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी घोडबंदर, नागलाबंदर, गोमुख व ओवले कोट हे चार किल्ले बांधले गेले. यापैकी पहिले तीन कोट पोर्तुगीजांनी तर ओवले कोट हा मराठ्यांनी बांधल्याचे सांगितले जाते. ठाणे - बोरीवली रस्त्यावर नागलाबंदर गावात उतरुन ह्या ठिकाणी जाता येते. नागलाबंदर गावाजवळ खाडीला लागून असणाऱ्या या किल्ल्याचे ठिकाण गावातील लोकांना माहित नसल्याने येथे चर्च विचारत जावे लागते. नागलाबंदर थांब्यावर उतरुन येथवर येण्यास १० मिनीटे लागतात. बरेच लोक नागलाबंदर किल्ला नष्ट झाल्याचे सांगुन नागलाबंदर किल्ल्यासमोर चर्च असणारी टेकडी नागलाबंदर किल्ला म्हणुन सांगतात.
...
पण नागलाबंदर गावात खाडीशेजारी असलेल्या टेकडीवर नागलाबंदर किल्ल्याचे अवशेष आजही शिल्लक आहेत व चर्च असणारी टेकडी म्हणजे ओवले कोट होय. श्री.सदाशिव टेटविलकर ह्यांच्या "दुर्गसंपदा ठाण्याची"ह्या पुस्तकात ठाणे किनाऱ्यालगत असणाऱ्या १२ किल्ल्यामध्ये ह्या किल्ल्याचा समावेश आहे. सध्या नागला बंदर येथे रेती व्यवसाय चालत असल्याने या परिसराला अवकळा आली आहे. दगडांच्या खाणीकडून उजवीकडे जाणारा रस्ता नागलाबंदर टेकडीवर जातो तर डावीकडील रस्ता ओवले कोटाच्या पायथ्याशी पायऱ्यापर्यंत जातो. ओवले कोटाच्या टेकडीवर अलीकडेच जिर्णोद्धार केलेले पोर्तुगीजकालीन चर्च आहे. या टेकडीच्या विरुद्ध दिशेने गेल्यास टेकडीवर जाणारा थेट गाडीरस्ता आहे पण तो खचला आहे. या वाटेने जाताना कोटाच्या पायथ्याशी एक छोटे व एक मोठे अशी दोन तळी दिसुन येतात. या रस्त्याने वर जाताना उजवीकडील झुडुपात रचीव दगडांची २० फुट लांबीची व चार फुट उंचीची ढासळलेली भिंत दिसुन येते. किल्ला म्हणावा असे इतकेच अवशेष येथे दिसुन येतात. उल्हास खाडीचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली. टेकडीवरील उपलब्ध जागा पाहता सदर कोट केवळ जकातीचे अथवा टेहळणीचे ठाणे असावे. टेकडीवरून खुप लांबवरचा प्रदेश नजरेस पडतो तसेच नागलाबंदर आणि खाडीचे अतिशय सुंदर दृश्य दिसते. किल्ला छोटेखानी असून दहा मिनिटात पाहून होतो. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. इ.स.१७३७ मध्ये मराठयांच्या वसई मोहिमेत नागलाबंदर किल्ला व परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. याच काळात मराठ्यांनी येथे चौकी बांधल्याचे सांगितले जाते. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल तर या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar