उसरणी बुरुज
प्रकार : एकांडा बुरुज
जिल्हा : पालघर
उंची : 0
श्रेणी : सोपी
मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. उत्तर कोकणवर बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने त्यांनी या भागाच्या रक्षणासाठी व कारभारासाठी किनाऱ्यालगत अनेक लहान-लहान कोट बांधले. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फार थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. उसरणी येथील समुद्रात प्रवेश करणाऱ्या लहान नदीमुखावर असलेला उसरणीचा बुरुज त्यापैकीच एक. उसरणी बुरुजास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे सफाळे रेल्वे स्थानक हे जवळचे ठिकाण असुन रेल्वे स्थानक ते उसरणी हे अंतर साधारण १४ कि.मी.आहे. उसरणी येथे जाण्यासाठी बस तसेच रिक्षाची सोय आहे. स्थानिकांना हा कोट पुर्णपणे अपरीचीत असल्याने पुरेशी माहीती घेऊनच या कोटाची भटकंती करावी. या बुरुजावर जाण्यासाठी उसरणी गावातील चौकातुन सर्वप्रथम उसरणी समुद्राकाठी असलेल्या शाळेजवळ यावे. या शाळेच्या आवारात समुद्राकडे तोंड करून उभे राहिल्यावर डावीकडे एक पायवाट सुरुच्या बनाच्या दिशेने जाताना दिसते. वाटेची कल्पना न आल्यास स्थानिकांना बंधाऱ्यावर जाणारी वाट विचारावी.
...
या वाटेने कोठेही न वळता २० मिनिटे सरळ चालत गेल्यावर आपण उसरणी गावातुन समुद्रात शिरणाऱ्या नदीच्या मुखावर येतो. या मुखावर येण्याआधी डाव्या बाजुस झाडीत मध्ययुगीन शिवमंदिर आहे पण सध्या तेथे फारसा कोणाचा वावर नाही. शाळा ते नदीमुख हे अंतर साधारण १ कि.मी.आहे. या नदीमुखावर आल्यावर डाव्या बाजुस समुद्रात शिरणाऱ्या नदीपात्राच्या मध्यभागी एक लहानसा गोलाकार उंचवटा दिसतो. हा संपुर्ण खाजणाचा भाग असुन त्यात दिसणारा १५ फुट उंचीचा गोलाकार उंचवटा म्हणजे उसरणीचा बुरुज. टेहळणीचा एकांडा शिलेदार. सततच्या भरतीमुळे हा संपुर्ण बुरुज आज उध्वस्त झाला असुन केवळ मध्यभागी भरणीसाठी वापरलेला मलबा शिल्लक आहे. हा मलबा एकजीव करण्यासाठी चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसुन येतो. त्यामुळेच हा मलबा शिल्लक राहीला असावा. संपुर्ण बुरुजाची पडझड झाली असली तरी एका ठिकाणी १०-१२ रचलेले दगड दिसुन येतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बुरुजात एक लहान कोठार असुन सतत येणाऱ्या भरतीमुळे त्याचा तोंडाकडील भाग वगळता आतील भागात मोठ्या प्रमाणात वाळू जमा झाली आहे. या व्यतिरिक्त कोटाच्या इतर कोणत्याही खाणाखुणा दिसुन येत नाहीत. बुरुजावर ये-जा करण्यासाठी बहुदा शिडीचा वापर केला जात असावा. बुरुजाच्या मागील बाजुस नदीच्या प्रवाहावर बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यासाठी काही ठिकाणी वापरलेले दगड हे या बुरुजाचेच असावेत. बुरुज पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. साधारणतः १६व्या शतकात ह्या भागातील इतर गढीकोटाबरोबर हा बुरुजही पोर्तुगिजांनी बांधला. पोर्तुगीजानी उभारलेल्या या बुरुजांचा मुख्य उपयोग टेहळणी करणे व जलमार्गाचे रक्षण करणे हा होता. याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि आगंतुक आलेल्या नौकांना लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने अटकाव करण्यासाठी होत असावा. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर जानेवारी १७३९ मध्ये हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच. सागरी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असल्यास या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar