उरण कोट

प्रकार : भुईकोट

जिल्हा : रायगड

उंची : 0

श्रेणी : सोपी

वाढत्या लोकवस्तीमुळे अनेक नगर कोटांचा घास त्यातील वस्तीनेच घेतला असुन काही ठिकाणी कधीकाळी नगराबाहेर असलेले भुईकोट आता शहरातच समाविष्ट झाले आहेत. अशा अनेक कोटांचा आज मागमुसही दिसत नसल्याने ते पुर्णपणे नष्ट झाल्याचे मानले जाते तर काही ठिकाणी कोटाचे अवशेष शिल्लक असले तरी त्याची स्थाननिश्चिती न झाल्याने हे कोट नष्ट झालेल्या किल्ल्यांच्या यादीत सामील झाले आहेत. दुर्गप्रेमींच्या नजरेस न पडलेला असाच एक अपरिचित भुईकोट म्हणजे उरणचा किल्ला. उरण शहरात प्रवेश करताना कोटनाका हे नाव आपल्याला कधीकाळी येथे कोट असल्याची जाणीव करून देते. स्थानिकांना या कोटाबाबत विचारले असता ते द्रोणागीरीकडे निर्देश करतात व येथे कोट नसल्याचे वा पुर्णपणे नष्ट झाल्याचे सांगतात. केवळ या गोष्टीमुळेच आजवर हा कोट नष्ट झाल्याचे मानले जाऊन इतिहास वगळता याचा कोठेही उल्लेख येत नाही. पण हि गोष्ट पुर्णपणे असत्य असुन आजही आपल्याला या कोटाचे काही प्रमाणात अवशेष पहायला मिळतात. उरण किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या उरण शहरात यावे लागते. पनवेल ते उरण हे अंतर २८ कि.मी.असुन पनवेल येथुन उरणला जाण्यासाठी एस.टी.बस तसेच खाजगी वाहनाची चांगली सोय आहे. ... उरण शहरात कोटनाका भागात आल्यावर येथील उरण मासळी बाजाराच्या इमारती पासुन काही अंतरावर असलेल्या मैदानाजवळच या कोटाचे अवशेष आहेत. आता हे ठिकाण गुगल नकाशावर उरण कोट म्हणुन निर्देशीत केलेले आहे. मैदानात आल्यावर आपल्याला सर्वप्रथम उजव्या बाजुस आयताकृती आकाराचे पाण्याचे लहानसे टाके नजरेस पडते. दगड व चुन्यात बांधलेल्या या टाक्यात पाण्याचा झरा असुन या टाक्यातील पाणी स्थानिक आजही बांधकामासाठी वापरतात. या टाक्यापासून काही अंतरावर दोन घरांच्या मधील भागात सहा फुट उंचीचा पडझड झालेला गोलाकार आकाराचा बुरुज असुन या बुरुजाला लागुनच तटबंदीच्या भिंतीचे अवशेष आहेत. शिल्लक असलेली हि तटबंदी साधारण ३०-४० फुट लांब असुन तिची रुंदी चार फुट तर उंची ६ फुट आहे. या तटबंदी पासुन काही अंतरावर भुयारासारखे अर्धगोलाकार आकाराचे बांधीव कोठार असुन या कोठाराची बांधणी व द्रोणागिरी किल्ल्याच्या टाक्यावर असलेल्या झाकणाची बांधणी एकसारखी आहे. सध्या या कोठारात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालेला असुन त्याला संवर्धनाची गरज आहे. पण हा संपुर्ण परिसर खाजगी मालकीत आहे याची नोंद घ्यावी. किल्ल्याचे तटबंदी,एक बुरुज, पाण्याचे टाके व कोठार हे चार अवशेष व काही ठिकाणी पडलेले मोठमोठे घडीव वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. कोटाचा हा परीसर पहाण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. कोटाचे एकुण स्थान पहाता कधीकाळी शहराबाहेर असलेला हा कोट कालांतराने वाढत्या लोकवस्तीमुळे शहराजवळ आला असावा असे वाटते. भेंडखळ खाडीमुळे मुख्य भुभागापासून वेगळे पडलेल्या कारंजा बेटाच्या मध्यवर्ती भागात उरण गाव वसलेले आहे. उरण शहराचे प्राचीन नाव उरुण अथवा उरणे असे होते. जवळच असलेल्या चाणजे गावातील उरणावती देवीवरून या शहराला उरण नाव पडल्याचे मानले जाते. उरण जवळील घारापुरी बेटावर असलेली लेणी या शहराची प्राचीनता दर्शवितात. उरण गावासमोर असलेल्या डोंगरावरील द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. १६ व्या शतकात हा किल्ला आदिलशहाच्या अमलाखाली असताना इ.स.१५३० मध्ये लौरेस व लुईस या नौकांचा वापर करत पोर्तुगीजांनी द्रोणागिरी किल्ला व कारंजा बेट ताब्यात घेतले. द्रोणागिरी किल्ल्याची डागडुजी करताना पोर्तुगीजांनी उरणच्या भुईकोटाची बांधणी केली. द्रोणागिरी किल्ल्याची ढाल बनलेल्या या कोटाने पहिला हल्ला स्वतःवर झेलला आहे. इ.स.१६८२मध्ये संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या चौल-रेवदंडा ठाण्यास घातलेला वेढा उधळल्यावर उरण व कारंजा बेटाचा ताबा घेतला. २८ जानेवारी १६८४ साली इंग्रज अधिकारी केज्विन याने इंग्लंडच्या राजाला लिहिलेल्या पत्रात याविषयी लिहिल्याचे दिसुन येते पण औरंगजेबाच्या स्वारीनंतर झालेल्या धामधुमीत उरण व कारंजा पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले. यानंतर १७३९ मधील चिमाजी अप्पांच्या वसई मोहीमेच्या वेळेस १० मार्च १७३९ ला मानाजी आंग्रे यांनी ४० गलबतातून २००० लोक आणुन कारंजा बेटावर हल्ला केला व ५ दिवसांच्या वेढ्यानंतर उरणचा कोट व परिसर तसेच द्रोणागिरी किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. कारंजा बेट ताब्यात घेतले तेव्हा बेटावर जोसे लुई डीसिल्वा हा कप्तान असुन त्याच्याबरोबर १०० शिपायांची शिबंदी होती त्यातील ३ सैनिक मारले गेले. इ.स.१७७५ मध्ये कर्नल किटिंग याच्या सैन्याने करंजा बेट व उरणचा ताबा मिळवला व हा प्रदेश कायमचा ब्रिटीश अधिपत्याखाली आला. टीप- येथील स्थानिक वर्तमानपत्रात आलेल्या लेखानुसार डुक्करखार भागात या कोटाचा एक दरवाजा तसेच मुख्य रस्त्यावर दरवाजाचे भग्न अवशेष असल्याचे लिहिले आहे पण हा परीसर धुंडाळला असता मला ते कोठेही दिसुन आले नाहीत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!