उदगीर

प्रकार : भुईकोट

जिल्हा : लातुर

उंची : 0

श्रेणी : सोपी

मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला सोलापुर, औसा, परांडा, उदगीर, कंधार यासारखे एकापेक्षा एक बलदंड व भक्कम भुईकोट पहायला मिळतात. हे सर्व किल्ले आजही सुस्थितीत असुन या किल्ल्यांची रचना महाराष्ट्रात इतरत्र आढळणाऱ्या भुईकोट किल्यांपेक्षा खुपच वेगळी आहे. मराठवाडयातील हा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने त्या अनुषंगानेच येथे किल्ल्याची रचना केली गेली. येथे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचे नैसर्गिक सुरक्षा कवच नसल्याने किल्ला लढवय्या बनविण्यासाठी त्याला जाडजुड दुहेरी अथवा तिहेरी तटबंदी बांधुन संपुर्ण किल्ल्याभोवती खंदक खोदण्यात आले. इतकेच नव्हे तर किल्ल्याला एकामागे एक अशी दरवाजाची साखळी रचुन आत जाण्याचा मार्ग दुष्कर केला गेला. हे सर्व पहायचे असेल तर लातुर जिल्ह्यातील उदगीर शहरात असलेल्या उदगीर किल्ल्याला भेट द्यायलाच हवी. ... उदगीर किल्ला लातुर शहरापासुन ६८ कि.मी.अंतरावर असून उदगीर हे रेल्वेस्थानक असल्याने ट्रेनने देखील तेथे जाता येते. उदगीर रेल्वे स्थानकापासुन किल्ला फक्त १.५ कि.मी. अंतरावर असून तेथे जाण्यासाठी रिक्षाची सोय आहे. उदगीर शहर देखील कधीकाळी तटबंदीच्या आत वसल्याच्या खुणा गावातुन जाताना पहायला मिळतात. किल्ल्याकडे जाताना या नगरदुर्गाचे दोन दरवाजे व चौबारा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या चौकातील जुन्या काळातील पाणपोई पहात आपण गावाबाहेर असलेल्या किल्ल्यासमोर पोहोचतो. किल्ल्याची बांधणी परकोट, खंदक व दुहेरी तटबंदीने बंदीस्त किल्ला अशी तीन भागात केलेली असुन किल्ल्याच्या दरवाजासमोरील भागात परकोट उभारलेला आहे. परकोटाचा पुर्वाभिमुख दरवाजा आतील चार वास्तु व एक लहान तलाव वगळता परकोटाची तटबंदी व इतर सर्व वास्तु पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत. परकोटाच्या दरवाजावर कमान व आतील देवडी वगळता कोणतेही कोरीवकाम दिसुन येत नाही. परकोटातील एका वास्तुत खापरी नळ व पाण्याचे लहान टाके पहायला मिळते. हि वास्तु बहुदा हमामखाना अथवा पाणी पुरवठा करण्यासाठी असावी. दुसरी वास्तु खंदकाच्या काठावर बांधलेली असुन त्यातुन खंदकात जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. किल्ल्याचा दरवाजासमोरील हा भाग जमिनीपासून वेगळा करण्यासाठी २० फुट रुंद व २५ फुट खोल खंदक खोदण्यात आलेला आहे. हा खंदक दोन्ही बाजुंनी दगडांनी बांधून काढलेला आहे. पुर्वी या खंदकावर काढता-घालता येणारा लाकडी पुल असे आता मात्र यावर कायम स्वरूपी दगडी पुल बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्या उजव्या बाजूच्या टोकावर एक लोखंडी पुल पहायला मिळतो. मध्यंतरी किल्ला बंद असताना किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत असलेल्या उदगीर बाबांच्या मठात जाण्यासाठी हा पुल बांधला होता. या पुलाने गेल्यास चोर दरवाजाने किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत जाता येते पण आता हा मार्ग वापरात नाही. उदगीर किल्ला जरी भूईकोट असला तरी तो एका लहानशा उंचवट्यावर असल्याने दरवाजाकडील भाग वगळता इतर बाजुंनी थोडयाफार प्रमाणात दरीचे नैसर्गिक संरक्षण आहे. साधारण गोलाकार आकाराचा हा किल्ला खंदकाच्या आत ८ एकरवर पसरलेला असुन परकोटाचा परीसर ४ एकर आहे. खंदकावरून दोन बुरुजात लपवलेल्या किल्ल्याच्या दरवाजाकडे जाताना उजवीकडील तटाबुरुजावर दोन हत्तीशिल्प व एक शरभशिल्प पहायला मिळते. यातील एक शिल्प झाडीत लपलेले आहे. किल्ल्याच्या डाव्या बाजुस आतील तटबंदीत असलेल्या कोपऱ्यावरील अष्टकोनी बुरुजावरही एक शरभशिल्प व हत्तींची झुंज असणारी दोन शिल्प अशी एकुण तीन शिल्प आहेत. किल्ल्याची बाहेरील तटबंदी साधारण ४० फुट उंच असून आतील तटबंदी ६० फुट उंच आहे. या संपुर्ण तटबंदीवर चर्या बांधलेल्या असुन त्यात तोफा व बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या बांधलेल्या आहेत. खंदक ओलांडून आपण किल्ल्याच्या प्रशस्त अशा पहिल्या दरवाजापाशी येतो. पुरातत्व खात्याने सध्या येथे नवीन लोखंडी दरवाजा बसवलेला आहे. लोहबंदी नावाने ओळखला जाणारा हा दरवाजा लांबून दोन बुरुजात बांधल्याचे वाटत असले तरी त्याचे बांधकाम डावीकडील बुरुजात केलेले आहे. थेट दरवाजावर मारा करता येऊ नये यासाठी हि रचना केलेली आहे. पुर्वाभिमुख असलेल्या या दरवाजासमोर अतिशय कमी जागा असून या जागेवर मारा करण्यासाठी दरवाजावर तसेच शेजारील तटबंदीत बाहेरील बाजुस सज्जे काढलेले असून त्यात जंग्या आहेत. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या असून यातील एका देवडीसमोर भग्न झालेली तोफ आहे. हा आतील व बाहेरील तटबंदीतील भाग असून येथुन दोन्ही बाजुस दुहेरी तटबंदीमध्ये असलेल्या जागेत जाण्यासाठी लहानसा मार्ग आहे. उजवीकडे असलेला लोखंडी दरवाजा पार करून आपण किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावर सहजपणे दिसुन न येणारा पर्शियन भाषेतील झीज झालेला शिलालेख आहे. या बुरुजावरून डावीकडे असलेल्या किल्ल्याच्या आतील तटबंदीत पाच हत्ती पकडलेले शरभशिल्प पहायला मिळते. या शिल्पावर झाडी वाढलेली असून ते सहजपणे नजरेस पडत नाही. या तटबंदीतुन पुढे जाणारा मार्ग उदगीर महाराजांच्या मठाकडे जातो. वाटेच्या सुरवातीस लोखंडी जाळीचा दरवाजा बसवलेला आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा बंद असताना चोर दरवाजाने मठात आलेली व्यक्ती किल्ल्यात जाऊ नये यासाठी हा दरवाजा बांधला होता. येथुन थोडे पुढे आल्यावर तटाच्या खालील बाजुस दरवाजाची लहान कमान नजरेस पडते. गडाबाहेर जाण्यासाठी हा चोरमार्ग असून या दरवाजाने खाली उतरल्यावर आपण किल्ल्याबाहेरील खंदकात येतो. बाहेरील दरवाजा आता लोखंडी दार लावून बंद केलेला आहे. आपण सुरवातीस पाहिलेला पुल या दरवाजाबाहेर आहे. या चोरवाटेच्या आतील दरवाजा समोर वाटेखाली गाडलेल्या काही अर्धवट कमानी पाहायला मिळतात. मठाकडे जाणारी वाट दुरुस्त करताना या कमानी गाडल्या गेल्या असाव्यात. येथुन मठाकडे जाताना डावीकडे झाडीने भरलेली खोल विहीर पहायला मिळते. वाटेच्या उजवीकडे असलेल्या तटबंदीच्या बुरुजावरील चर्येत हत्तींचा शिल्पपट पाहायला मिळतो. येथील तटबंदी बाहेर असलेल्या खंदकात शेती केलेली असून खंदकाच्या दुसऱ्या बाजुस खंदकातील पाणी काढण्यासाठी मोट बांधलेली आहे. या तटाच्या फांजीवर नव्याने बांधलेली कमान असुन त्यापुढे तटाखाली जमिनीत ४० फूट खोल कातळ खोदून बनविलेला उदगीर महाराजांचा मठ आहे. या मठात उतरण्यासाठी तटाला लागून नव्याने पायऱ्या बांधलेल्या असून हा मठ जवळपास बाहेरील जमिनीच्या पातळीत आहे. मठाकडे जाणारा मुळ मार्ग विहिरीकडून आहे. मठाच्या तळात कातळात कोरलेले बांधीव टाके असून त्यासमोरील गुहेत उदगीर महाराजांचे समाधी स्थान आहे. समाधीच्या या गुहेत शिवलिंग व पादुका असून काही प्राचीन मुर्ती ठेवलेल्या आहेत. येथील दर्शन आटोपुन पुन्हा तटबंदीवरून सुरवातीस पाहिलेल्या विहिरीकडे यावे. तटबंदी उतरून विहिरीकडे गेले असता किल्ल्याच्या आतील तटबंदीतुन या भागात येणारा कमानीदार दरवाजा दिसतो. सध्या दगड रचुन हा दरवाजा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. या दरवाजाकडे जमिनीलगत मठाकडे जाण्याचा मुळ मार्ग आहे. पुर्णपणे बंदिस्त असलेल्या या मार्गावर तीन लहान दरवाजे बांधलेले असुन काही पायऱ्या उतरून आपल्याला मठात जाता येते. हे पाहुन झाल्यावर आपण प्रवेश केलेल्या मुख्य दरवाजापाशी यावे. किल्ल्याचा दुसरा दरवाजा देखील पुर्वाभिमुख असुन याची रचना पहिल्या दरवाजाप्रमाणे आहे. दोन बुरुजांच्या आधारे बांधलेला हा दरवाजा पुर्णपणे बंदिस्त असून येथे आलेल्या शत्रुवर मारा करण्यासाठी छताकडील बाजुस झरोके बांधलेले आहेत. हा दरवाजा परवाना दरवाजा म्हणुन संबोधला जातो. या दरवाजाच्या उजवीकडे एक जाळीदार खिडकी असून शेजारी हात जाईल इतपत लहानसा झरोका आहे. हि खिडकी व खाच आलेल्या माणसाची चौकशी व कागदपत्राची पाहणी करण्यासाठी असल्याचे मानले जाते. कोणत्याही किल्ल्यावर अशा प्रकारची रचना दिसुन येत नाही. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या व व पिण्याच्या पाण्याचा लहान हौद पाहायला मिळतो. किल्ल्याचा तिसरा दरवाजा देखील पुर्वाभिमुख असून दुसरा व तिसरा दरवाजा यामध्ये मोकळा चौक आहे. या भागात काही ठिकाणी कमळाची नक्षी कोरलेली असून आतील तटबंदीवरून या भागात येण्यासाठी मार्ग ठेवलेला आहे. किल्ल्याचा चौथा दरवाजा दक्षिणाभिमुख असून तिसरा व चौथा दरवाजा याच्या मधील भागात सैनिकांच्या राहण्यासाठी मोठया प्रमाणात ओवऱ्या बांधलेल्या आहेत. मुख्य दरवाजा वगळता या भागातुन किल्ल्यात जाण्यासाठी एक लहान दरवाजा आहे. या दरवाजातुन किल्ल्यात शिरल्यावर समोरच एक व्याघ्रमुखी तोफ पहायला मिळते. तोफेसमोर उजवीकडे एक इमारत असून या इमारतीला लागुनच फुलांच्या आकाराचा मोठा हौद आहे. हि इमारत किल्ल्यावरील कारंजे उडविण्यासाठी तसेच आतील वास्तुना पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेली आहे. हौदाशेजारी उंचवटा बांधुन हे पाणी वरील भागात खेचलेले आहे. येथे दोन लहान हौद बांधलेले असुन येथुन सायफन पद्धतीचा वापर करत खापरी नळाने हे पाणी कारंजे व इतर वास्तुना पोहचवले आहे. किल्ला फिरताना आवर्जून पहावी अशी हि महत्वाची वास्तु आहे. या इमारतीवर तिच्या बांधकामाची माहीती देणारा पर्शियन शिलालेख कोरलेला आहे. यातील उल्लेखानुसार हि इमारत हिजरी १०९२ मधील मोहरमच्या महिन्यात मीरखान हुसेन यांनी बांधली आहे. या इमारतीच्या मागील बाजुस एका वास्तुत शिरणारा दरवाजा दिसतो. या दरवाजाने आत शिरल्यावर आपला अनेक नक्षीदार व कमानीदार दालने असलेल्या अतिशय सुंदर अशा महालात प्रवेश होतो. या महालाच्या मधील कमानीवर हा दिवाने आम व खास असल्याचा पर्शियन शिलालेख कोरलेला आहे. महालाला लागुन चौकोनी आकाराचा कारंजा असून त्यासमोर मोकळ्या जागेत पायऱ्या असलेली अष्टकोनी विहीर आहे. महालाच्या समोरील बाजुस ३ कमानी व त्या शेजारी दोन दालने असलेली इमारत असून उजवीकडे तटबंदीला लागून ३ मजली टेहळणी मनोरा आहे. या मनोऱ्यावर चार टोकास चार मिनार आहेत. या मनोऱ्याच्या छतावरून संपुर्ण किल्ला एका नजरेत पहाता येतो. मनोऱ्याच्या अलीकडे किल्ल्याबाहेर जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे पण हा मार्ग दुसऱ्या बाजुने दगड रचुन बंद करण्यात आला आहे. आपण उदगीर बाबांच्या समाधीकडे तटबंदीत पाहिलेला बंद दरवाजा याच मार्गावरील आहे. दिवाने आम मधून वरील भागात जाण्यासाठी जिना आहे. महालाच्या वरील भागात भिंतीत बांधलेले अनेक लहान चौकोनी खुराडे असुन हि वास्तु कबुतरखाना आहे. याच्या समोरील बाजुस पाच कमानी व पंधरा खांबांवर तोललेली रंगमहालाची अतिशय सुंदर वास्तु आहे. येथुन वर गेल्यावर आपण किल्ल्याच्या दक्षिण-पुर्व बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाकडे जाताना मोठया प्रमाणात महालाचे भग्न अवशेष पहायला मिळतात. अंधारी बुरुज वा तेलीण बुरुज नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बुरुजावर एक आठ फुट लांब पंचधातुची तोफ पडलेली आहे. तोफ पाहुन आल्यावाटेने खाली उतरावे व कबुतरखान्याजवळ यावे. येथे डाव्या बाजुस एक कमानीदार दरवाजा पहायला मिळतो. या दरवाजाने आत शिरल्यावर दालनाच्या मध्यभागी नेत्राकार (डोळ्याच्या) आकाराचा दगडात घडवलेला सुंदर कारंजा असून समोर कमानीदार सज्जा आहे. या सज्जावर चुन्यामध्ये अप्रतिम कोरीवकाम केलेले आहे. हा सज्जा बाहेरील बाजुने देखील सजवलेला असून किल्ल्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम हा सज्जाच नजरेस पडतो. दरवाजाच्या डावीकडे ७ ओळींचा पर्शियन शिलालेख असून त्यात शहाजहानचा सरदार झैनखान याने इ.स. १६३६ साली फतेह बुरुज जिंकल्याचा उल्लेख येतो. या शिलालेखाच्या चौकोनी पट्टीवर सुलेखन पद्धतीने अक्षरे कोरलेली आहेत. दरवाजाच्या वरील बाजुस सुलेखन पद्धतीने पाच अरबी शिलालेख कोरलेले आहेत पण ते नीट वाचता येत नाही. येथुन डावीकडील लहान दरवाजाने आत शिरून अनेक दालने पार करताना सुंदर कमानी, हमामखाना, हौद व मोठया प्रमाणात उध्वस्त अवशेष पहात आपण किल्ल्याच्या दक्षिण दरवाजाच्या वरील बाजुस येतो. येथे एका दालनात जीवनातील तत्वज्ञान सांगणारा पर्शियन शिलालेख कोरलेला आहे. या दालनात खाली उतरण्यासाठी भुयारी पायरीमार्ग असून समोर किल्ल्यावरील सर्वात उंच असलेल्या चांदणी बुरुजाकडे जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहीत. येथुन पायऱ्यांनी वर गेल्यावर समोरच खालील तटावरून वर येणारा पायरी मार्ग दिसतो. या प्रवेशमार्गावर दरवाजा बांधलेला आहे. दरवाजाच्या वरील भागात १० फूट लाबीची बांगडी तोफ पडलेली आहे. या तोफेजवळ एक लहान हौद आहे. येथुन पायऱ्या चढुन वर बुरूजावर गेल्यावर किल्ल्याची ढालकाठीची म्हणजेच ध्वजस्तंभाची जागा आहे. हा बुरुज अष्टकोनी आकाराचा असून चांदणी बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावर ८ फुट लांबीची पंचधातूची तोफ असून या तोफेच्या तोंडावर मकरमुख तर मागील बाजुस सुर्यमुख आहे. तोफेवर दोन पर्शियन लेख कोरलेले आहेत. चांदणी बुरुज पाहुन परत मागे फिरावे व किल्ल्याच्या दक्षिण दरवाजावरील दालनात यावे. या दालनातील भुयारी पायरी मार्गाने खाली उतरून दरवाजाच्या वरील भागात येतो. येथे तहसील कार्यालय नावाची पाच कमानी असलेली इमारत असून या इमारतीच्या मधल्या कमानीच्या भिंतीत एक पर्शियन शिलालेख आहे. या इमारतीसमोर खाली उतरण्यासाठी पायऱ्या असून पायऱ्यांच्या उजवीकडे एक थडगे तर डावीकडे किल्ल्याचा मुख्य प्रवेशमार्ग आहे. गडप्रवेश केल्यावर इथपर्यंत येण्यासाठी साधारण २ तास लागतात. येथे थोडावेळ थांबुन नव्याने पुन्हा गडफेरीस सुरवात करायची. दरवाजाकडून सरळ गेल्यावर वाटेच्या उजवीकडे फुलाच्या आकाराचा हौद तर डावीकडे तीन कमानी असलेली मशीद पाहायला मिळते. या मशिदीच्या अलीकडे कमानीयुक्त घोडयाच्या पागा असून त्याच्या आवारात मध्यभागी पाण्याचे टाके आहे. पागेच्या मागील बाजुस तटबंदीला लागुन तीन मजली हवामहाल नावाची इमारत आहे. या हवामहालच्या तळभागात लहानसा हमामखाना आहे. हे पाहुन पुन्हा मशिदीकडे यावे व सरळ रस्त्याने किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे यावे. किल्ल्याची उत्तरबाजु गोलाकार तटबंदीने बंदिस्त केलेली आहे. या टोकाच्या डावीकडे ५ कमानी व १० खांबांवर तोललेला अतिशय सुंदर असा दुमजली राजमहाल आहे. महालाच्या प्रांगणात चार खोलगट चौथरे असुन दर्शनी भागात कारंजाचा हौद आहे. कमानीच्या दोन्ही बाजुस महालाच्या वरील मजल्यावर जाण्यासाठी जिने आहेत. महालाच्या समोरील बाजुस एका चौथऱ्यावर दोन मंडपासारख्या महिरप असुन या दोन महिरपीच्या मधील भागात कारंजे आहेत. या महालाच्या उजवीकडे याची प्रतिकृती असलेला दुसरा महाल आहे पण हा दुमजली नाही व याच्या आवारात दोन इमारती आहेत. या इमारतीच्या चौथऱ्याखाली तळघरे आहेत. या महालाला लागुनच काही घरांचे अवशेष आहेत. हा महाल नर्तकी महाल म्हणुन ओळखला जातो. येथुन आपला परतीचा प्रवास सुरु होतो. येथुन जाताना उजवीकडे एकामागोमाग एक अशा अंबरखान्याच्या तीन इमारती आहेत. अंबरखान्यामागे मशिदीला लागुन अजून एक महाल पहायला मिळतो. याची रचना नर्तकी महालासारखी आहे. हा महाल पाहुन सरळ वाटेने मुख्य दरवाजाकडे आल्यावर आपले किल्लादर्शन पुर्ण होते. किल्ल्यात कोठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने सोबत पुरेसे पाणी बाळगावे. किल्ला अगदी अलीकडील काळापर्यंत नांदता असल्याने व ब्रिटीश काळात किल्ल्यावर कोणतीही लढाई न झाल्याने आतील वास्तुं तग धरून आहेत. शिवाय पुरातत्व खात्याने या वास्तुंचे चांगल्या प्रकारे संवर्धन केले आहे. खेदाची गोष्ट म्हणजे इतका खर्च करून या वास्तुंच्या देखभालीची कोणतीही सोय केलेली नसल्याने सर्वत्र जंगल वाढलेले आहे. संपुर्ण किल्ला व्यवस्थित पाहण्यास ४ तास पुरेसे होतात. किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने किल्ला पहाण्याची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत आहे. उदगीर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहरात राहण्याची तसेच जेवणाची सोय आहे. किल्ल्यात मात्र पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पुरेसे पाणी सोबत ठेवावे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला प्राचीन तसेच ऐतिहासिक पार्श्वभुमी लाभलेली आहे. उदगिर किल्ल्याचा उल्लेख ११ शतकापासुन येत असला तरी करबसवेश्वर या पौराणिक ग्रंथात या नगरीचा उल्लेख "उदयगिरी /उदकगिरी" या नावाने येतो. या ग्रंथातील कथेनुसार उदलिंग ॠषींनी येथे शंकराची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले व येथे शिवलिंगाची स्थापना केली. किल्ल्यातील गुहेत असलेले शिवलिंग त्यांनीच स्थापन केल्याचे मानले जाते व उदलिंग ऋषींच्या नावावरून या शहराला उदगीर नाव पडल्याचे त्यांच्या भक्तांची धारणा आहे. किल्ल्यावर असलेली शिल्प पहाता ११ व्या शतकात बदामीच्या चालुक्यांची या भागावर सत्ता असताना उदगीर किल्ला बांधला गेला असावा. यानंतर या किल्ल्याचा देवगिरीच्या यादवांच्या शिलालेखातुन उल्लेख येतो. इ.स.११७८ च्या शिलालेखात यादव राजा सिंघनदेव यांच्या उदगीर नगरीचा तसेच सहावा भिल्लम यादव हा उदगीरचा शासक असल्याचा उल्लेख येतो. यादव साम्राज्य संपुष्टात आल्यावर उद्गीर किल्ला आधी खिलजी व त्यानंतर बहमणी सत्तेच्या अमलाखाली आला. महमदशहा बहामनी याने इ.स.१४२२ मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला आणली. बिदर हे राजधानीचे ठिकाण जवळ आल्याने उदगीर किल्ल्याचे महत्व वाढले. इ.स.१४९२ मध्ये बहामनी सरदार कासीम बरीद याला या प्रांताची सुभेदारी मिळाली व उदगीर, औसा, कंधार हे किल्ले त्याच्या अमलाखाली आले. इ.स. १५२६मध्ये बहमनी साम्राज्याचे ५ तुकडे पडल्यावर कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली व बिदर आपले मुख्य केंद्र ठेवले. मराठवाड्याचा हा प्रांत आदिलशाहीजवळ असल्याने आदिलशाही व बरीदशाही यांच्यात सतत सत्तासंघर्ष होत राहिला. बरीदशाहीच्या अस्तानंतर किल्ला काही काळाकरता आदिलशहाच्या ताब्यात आला. इ.स. १६३६ मध्ये शहाजहानने मराठवाड्याचा ताबा घेतला त्यावेळी उदगीर,औसा,परंडा असे महत्वाचे ७ किल्ले मुघलांच्या अमलाखाली आणले. यानंतर मात्र या किल्ल्याच्या परीसरात मोठी लढाई झाल्याचे दिसुन येत नाही. मुघली सत्ता खिळखिळी झाल्याने या भागातील मुघल सरदार निजाम उल मुल्क आसफजहा याने निजामशाहीची स्थापना केली व या भागाचा ताबा घेतला. यानंतर फेब्रुवारी १७६० मध्ये सदाशिवभाऊ पेशवे ह्यांच्या नेतृत्वाखाली उदगीर येथे मराठे आणि निजाम याच्यात झालेली लढाई उदगीरची लढाई म्हणुन इतिहासात प्रसिद्ध आहे. या लढाईत निजामाचा पराभव झाला व तहानुसार निजामाचा ८५ लाखाचा मुलुख स्वराज्याला जोडला गेला. पण लवकरच मराठे उत्तरेकडील पानिपतच्या राजकारणात गुंतलेले पाहुन निजामाने यातील काही प्रांत पुन्हा ताब्यात घेतला यात उदगीरचा किल्ला देखील होता. निजामाने इंग्रजांशी शरणागती पत्करल्याने या राज्यातील किल्ल्याचे लढाईत नुकसान असे झाले नाही. भारत स्वतंत्र झाल्यावर १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत किल्ला निजामाच्या ताब्यात होता इतकेच नव्हे तर वापरात देखील होता.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!