उंबरगाव
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : वलसाड
उंची : 0
श्रेणी : सोपी
मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. यातील उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन थोडेफार शिल्लक असलेले अवशेष पहायला मिळतात. पोर्तुगीजांची निर्मिती असलेला पण काळाच्या ओघात पुर्णपणे नामशेष झालेला उंबरगाव हा असाच एक किल्ला. एकेकाळी स्वराज्यात असणारा हा प्रदेश भाषावार प्रांत रचना करताना व इतर काही कारणामुळे गुजरात राज्यात सामील झाला. कधीकाळी हा किल्ला स्वराज्यात असल्याने मी या किल्ल्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. चिंतामण गंगाधर गोगटे यांनी १८९६ सालात लिहिलेल्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात या किल्ल्याचा उल्लेख येतो तसेच गो.नी.दांडेकर यांच्याही लेखनातुन हा किल्ला डोकावतो.
...
महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील किल्ल्यांची भटकंती करताना उंबरगाव किल्ला अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके स्थान पहाण्यासाठी आम्ही या ठिकाणाला भेट दिली. आज उंबरगाव किल्ला म्हणजे एक लहान चौथरा व एका बुरुजाचा पाया इतकेच अवशेष शिल्लक असुन उर्वरीत कोट पुर्णपणे नष्ट झाला आहे. उंबरगाव रेल्वे स्थानक ते कोट हे अंतर ७ कि.मी.असुन रेल्वे स्थानकातुन खाजगी रिक्षाने या ठिकाणी जाता येते. कोट पहाण्यासाठी उंबरगाव समुद्रकिनारी असलेला बोटीचा धक्का गाठावा. वरोडी नदी जेथे समुद्राला मिळते त्या ठिकाणी खाडीमुखावरच असलेल्या लहानशा उंचवट्यावर हा किल्ला बांधलेला आहे. या नदीत शिरणारे कोणतेही गलबत या किल्ल्याच्या नजरेतुन सुटणे अशक्य !! यावरूनच या किल्ल्याचे महत्व अधोरेखित होते. इतर कोणतेही अवशेष नसल्याने ५ मिनिटात कोटाची फेरी पुर्ण होते. टेकडीवरून दूरवर पसरलेला अथांग समुद्र तसेच वरोडी नदीच्या दुसऱ्या काठावरील नारगोल गाव नजरेस पडते. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३७ ते १७३९च्या वसई मोहिमेदरम्यान हा कोट मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्यांना सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar