उंदेरी

प्रकार : जलदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : 0

श्रेणी : कठीण

शिवकाळात शत्रुपक्षाला इतर राजवटीना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी काही किल्यांची निर्मिती केली त्याला काटशह म्हणुन इतर राजवटीनी देखील त्यासमोर दुसऱ्या किल्ल्याची निर्मिती केली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे खांदेरी-उंदेरी जलदुर्ग आहेत. इंग्रज व सिद्दी यांना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी थळ जवळील खांदेरी बेटावर किल्ला बांधायला घेतल्यावर त्याला प्रत्युत्तर म्हणुन जंजिऱ्याच्या सिद्दीने त्यासमोर उंदेरी किल्ला बांधला. या उंदेरी जलदुर्गावर जाण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अलिबागला यावे लागते. अलिबाग ते रेवस या मार्गावर अलिबागपासून ४ कि.मी.अंतरावर थळ गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून ३ कि.मी.वर थळ गाव आहे. थळ समुद्रकिना-याहून आत समुद्रात दिसणारी दोन बेटे म्हणजे उंदेरी-खांदेरी. यापैकी जवळ दिसणारे बेट म्हणजे उंदेरी तर डाव्या बाजुला थोडे लांब असणारे बेट म्हणजे खांदेरी. ... थळ बाजारपेठेत सकाळी लवकर आल्यास मासेमारी करून येणा-या बोटी आपल्याला उंदेरी-खांदेरीवर जाण्यास मिळतात. मध्यम आकाराची ५ ते ६ लोक बसू शकतील अशी होडी आपल्याला खांदेरी- उदेरी दाखवून परत आणतात कारण मोठ्या नौका उंदेरी किल्ल्याजवळ पोहोचु शकत नाहीत. उंदेरी किल्ला थळ किनाऱ्यावरून साधारण २ कि.मी. आत खोल समुद्रात आहे. निमुळत्या आकाराचा हा किल्ला पुर्वपश्चिम पसरलेला असुन किल्ल्यावर दोन कमी उंचीच्या टेकड्या आहेत. उंदेरी किल्ल्याकडे होडीने जात असतांनाच उंदेरीची मजबूत तटबंदी आणि बुरुज आपले लक्ष वेधून घेतात. खांदेरी किल्ल्यावर ज्याप्रमाणे बोटींना धक्क्याची सोय आहे ती सोय उंदेरीवर नाही. त्यामुळे उंदेरीवर भरती ओहटीची वेळ पाळूनच जावे लागते. ज्या ठिकाणी बोटी लागतात तेथून किल्ल्याच्या तटबंदीवर पडझड झालेल्या दगडांवरून चालत जावे लागते. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आपण बोटीने जेथे उतरतो त्याच्याच पुढील भागात आहे. प्रवेशदाराची कमान आजही शिल्लक असुन दरवाजासमोर पायऱ्या व दगडाची बांधीव वाट आहे. दरवाजावर कोणतेही वास्तुशिल्प नाही. उंदेरीला एकूण बारा बुरुज असुन दोन बुरुज वगळता सर्व बुरुज आजही चांगल्या स्थितीत आहेत व बऱ्याच बुरुजावर तोफा आहे. खांदेरीच्या मानाने हे बेट खूपच लहान असून मध्यभागी पठारासारखे सपाट मैदान दिसते. त्यावर अनेक इमारतींची जोती शिल्लक असुन बहुतांशी अवशेष गवतात लपलेले आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एका मोठया वाड्याच्या भिंतीचे अवशेष व दरवाजाची कमान आजही तग धरून आहे. वाड्याच्या पुढील भागात एक लहानसे तुळशीवृंदावन आहे. बेटावरून चहूबाजूला अथांग पसरलेला समुद्र असुन त्याच्या लाटांना तोंड देण्यासाठी गडाच्या एका भागात खालील बाजुस दुहेरी तटबंदी उभारली आहे. या तटबंदीला छोटे बुरुज असून शेवटच्या बुरुजावर तीन तोफाही आहेत. दुर्गांवर भटकंती करणा-याना किल्ल्यावर तोफांचे दर्शन तसे दुर्लभच मात्र संपुर्ण उंदेरीवर लहानमोठया एकुण २२ तोफा पहायला मिळतात. किल्ल्यावर पावसाळी पाण्याची साठवण करण्यासाठी एकुण तीन टाकी असून त्यातील पाणी पिण्यासाठी उपयोगी नाही. यातील एक टाके चांगलेच मोठे असुन त्यात उतरण्यासाठी कमानीदार दरवाजा व त्याखाली पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याच्या एका भागात मोठ्या प्रमाणात झाडी असून त्यात एका ठिकाणी तर चक्क झाडाच्या खोडांचा दरवाजा बनला आहे. किल्ल्याच्या दक्षिण तटबंदीध्ये एक लहान दरवाजा असून येथून बाहेर गेले असतांना किल्ल्याच्या मजबूत तटबंदीची आणि बुरुजाची कल्पना येते. किल्ल्याची तटबंदी दोन ठिकाणी पुर्णपणे ढासळलेली असुन भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी तेथुन आत शिरते. थळ जवळील खांदेरी बेट ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांनी त्यावर किल्ला बांधायला सुरवात केल्याने इंग्रज व सिद्दी अस्वस्थ झाले. आपण मराठा सैन्याला किल्ला बांधण्यापासुन थांबवु शकत नाही हे पाहुन इंग्रजांनी जंजिऱ्याच्या सिद्दीची मदत घेतली. दरम्यान जर खांदेरी घेतला तर तो स्वतःकडे ठेवून घेण्याचा सिद्दीचा डाव इंग्रज अधिकारी केग्विनच्या ध्यानी आला आणि इंग्रजांनी सिद्दी हा शिवाजी महाराजांपेक्षा शिरजोर ठरू शकेल या भीतीपोटी खांदेरी मोहिमेचा जोर कमी केला. २४ डिसेंबर १६७९ ला युद्धबंदी होऊन तहाची बोलणी सुरू झाली. खांदेरी पाडाव होत नाही हे पाहून सिद्दीने ९ जानेवारी १६८० रोजी उंदेरी बेटाचा ताबा घेऊन त्यावर किल्ल्याचे बांधकाम सुरु केले. मराठ्यांनी सिद्दीचा हा बेत तडीस जाऊ नये म्हणून उंदेरीवर अनेक हल्ले केले. एका बाजूने उंदेरीवर किल्ला बांधायचा आणि दुसरीकडे खांदेरीवरील बांधकामाला अडसर करायचा असा दुहेरी कार्यक्रम सिद्दी राबवत होता. १६ जानेवारी १६८० रोजी इंग्रज व मराठ्यांमध्ये तह झाला. मराठ्यांचा चौलचा सुभेदार अण्णाजी याने मराठ्यांतर्फे तहावर शिक्कामोर्तब केले. इंग्रजांनी माघार घेतली तरी सिद्दीने उंदेरीचे बांधकाम करत खांदेरी वर तोफांचा मारा सुरू ठेवला. सुमारे चार-पाच महिने हे चालूच राहिले. सिद्दीने उंदेरीचे बांधकाम पुर्ण करताच मराठी व्यापारी आणि मच्छिमारांना सतावण्यास सुरुवात केली. संभाजीराजांच्या काळात १८ ऑगस्ट १६८० रोजी सुमारे दोन-अडीचशे मावळ्यांनी उंदेरीवर शिड्या लावत हल्ला केला पण सिद्दीला याची आधीच खबर असल्याने ८० मराठे मारले गेले. या लढाईत खांदेरी किल्ला बांधणार्याद मायनाक भंडारीचा मुलगा ठार झाला. या लढाईत जवळपास सर्व मावळे मारले गेले. सिद्दीने ८० मावळ्यांची मस्तके कापुन माझगावला आणली आणि ती त्याने बंदरावरील ८० खांबांना लावण्याची तयारी सुरु केली पण इंग्रजांनी सिद्दीला असे करण्यापासुन रोखले. १८ जुलै १६८१ रोजी पहाटे संभाजी महाराजांनी सिद्दीचा कायमचा काटा काढण्यासाठी उंदेरीवर निर्णायक हल्ला केला. या युध्दात सिद्दीचे प्रचंड नुकसान झाले पण मराठयांना किल्ला जिंकता आला नाही. त्यानंतर बरीच वर्षे मराठे आणि सिद्दी यांच्या मध्ये खांदेरी-उंदेरीचा ताबा मिळवण्यासाठी आणि टिकविण्यासाठी युद्ध सुरु राहिले. पुढे ८ मार्च १७०१ रोजी सिद्दी याकूतखानने खांदेरीवर हल्ला केला पण मराठयांनी तो परतवला. सन १७१३ मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे यांनी खांदेरी-उंदेरी वर मराठी साम्राज्याचा झेंडा रोवला. इ.स. १७४० मध्ये इंग्रज आणि सिद्दी यांचा तह होवून गड जिंकल्यास गड, त्यावरील तोफा व दारुगोळा शिबंदीसह इंग्रजांच्या ताब्यात देण्याचे ठरले पण रघुजी आंग्रे यांनी इंग्रजांचे हे प्रयत्न धुळीस मिळवले आणि गडावर आणखी तोफा ठेवल्या. इ.स. १७५९ साली मानाजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सिद्दीने कुलाब्याचा पाडाव केला. याला उत्तर म्हणून माधवराव पेशव्याच्या मदतीने रघुजी आंग्रे यांनी उंदेरीवर हल्ला केला व उंदेरीचा पाडाव केला. दिनांक २८ जानेवारी १७६० रोजी नारो त्रिंबकनी उंदेरी किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव ‘‘जयदुर्ग ठेवले. सिद्दीने अनेक प्रयत्न करुनही १८१८ पर्यंत किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडेच राहीला. १८१८ मध्ये इंग्रजांकडे उंदेरीचा ताबा गेला, त्यांनी १८२४ मध्ये तो आंग्रेना दिला. आंग्रे यांचे संस्थान १८४० ला खालसा केल्यावर किल्ला परत इंग्रजांच्या ताब्यात आला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!