इंद्रगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : बलसाड

उंची : ३६० फुट

श्रेणी : सोपी

महाराष्ट्र व गुजरातच्या सीमावर्ती भागात शिवकाळात व पेशवाईत बांधले गेलेले अनेक किल्ले आहेत. एकेकाळी स्वराज्यात असणारा हा प्रदेश भाषावार प्रांत रचना करताना व इतर काही कारणामुळे गुजरात राज्यात सामील झाला. कधीकाळी हा किल्ला स्वराज्यात असल्याने मी या किल्ल्याचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. मराठयांची निर्मिती असलेला इंद्रगड हा दमणच्या सरहद्दीवर असलेला असाच एक किल्ला. वापीच्या अलीकडे असलेले करंबेली रेल्वे स्थानक या किल्ल्याला जवळ असले तरी येथे थांबणाऱ्या गाड्या अनियमीत असल्याने तसेच येथुन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाली करंबेली गावात जाण्यासाठी वाहनांची फारशी सोय नसल्याने वापी येथे उतरुन दमणमार्गे तेथे जाणे जास्त सोयीचे आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील भिलाड येथुन १४ कि.मी. आत असलेला हा किल्ला दमणहुन ७ कि.मी. तर वापीहुन १० कि.मी.अंतरावर आहे. दमण येथुन सहजपणे दिसणाऱ्या २५० फुट उंचीच्या टेकडीवर हा किल्ला बांधलेला आहे. ... किल्ला मात्र परीसरात फारसा परिचित नसल्याने दमण येथुन रिक्षा ठरवताना गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाली करंबेली गावातील लक्ष्मीनारायण मंदीर सांगावे. गावातील लक्ष्मीनारायण मंदिराकडून गडावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. जीपसारखे वाहन या रस्त्याने थेट किल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचते अन्यथा चालत जाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. किल्ला म्हणुन स्थानिकांना या वास्तुबद्दल आत्मीयता नसली तरी गडावर असलेल्या चेडूमातेच्या मंदिरामुळे गावकऱ्यांचा गडावर वावर असतो. गडाच्या डोंगरावर भरपूर झाडे असल्याने गड चढतांना उन्हाचा त्रास होत नाही. गडाच्या तटबंदी लगत पत्र्याच्या निवाऱ्यात चेडू मातेचे मंदिर असुन त्यात एक साधू मुक्कामास असतो. या मंदिरामागे किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी पुर्वेस व दक्षिणेकडे असे दोन दरवाजे आहेत. या दरवाजावर सहजपणे आक्रमण करता येऊ नये यासाठी दोन्ही दरवाजासमोर जीभीची म्हणजेच अर्धवर्तुळाकार भिंतींची रचना करण्यात आली आहे. चेडू मातेच्या मंदिराकडून होणारा आपला प्रवेश उत्तरेकडील दरवाजाने होतो. किल्ल्याचा दरवाजा शिल्लक असला तरी त्यावरील कमान मात्र ढासळलेली आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन जीभीच्या फांजीवर तटावर जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. या दरवाजाच्या आत असलेल्या निमुळत्या पायऱ्यांनी आपण गडाच्या तटावर पोहोचतो. गडाचा परीसर फारसा मोठा नसल्याने तटावरून गडाचा आतील संपुर्ण भाग नजरेस पडतो. किल्ल्यात मोठ्या प्रमाणात वास्तुंचे अवशेष दिसुन येतात. समुद्रसपाटीपासुन ३६० फुट उंचीवर असलेला आयताकृती आकाराचा हा किल्ला साधारण पाउण एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेला आहे. किल्ल्याच्या चार टोकाला चार गोलाकार बुरुज असुन प्रत्येक बुरुजावर जाण्यासाठी तटाला लागुन पायऱ्या आहेत. या प्रत्येक बुरूजाखाली एक कोठार आहे. किल्ल्याच्या आतील भागात तीन मोठ्या इमारतींचे अवशेष असुन यातील एक इमारत म्हणजे मोठे सभागृह आहे. याशिवाय किल्ल्यात पाण्याची दोन मोठी टाकी असुन यातील एक टाके कोरडे पडले आहे तर दुसऱ्या टाक्यातील पाणी वापरात नसल्याने पिण्यायोग्य नाही. येथील प्रशासनाने किल्ल्याची बऱ्यापैकी निगा राखलेली आहे. किल्ल्याच्या तटबंदीत राहण्यासाठी मोठया प्रमाणात ओवऱ्या तसेच सात शौचकुप पहायला मिळतात. याचा अर्थ गडावर खुप मोठया प्रमाणात शिबंदी असावी. किल्ल्याचा उत्तर दरवाजा आजही चांगल्या स्थितीत असुन या दरवाजा समोर देखील संरक्षणासाठी जिभी बांधलेली आहे. किल्ल्याची तटबंदी व बुरुज आजही सुस्थितीत असुन फांजीवरून संपुर्ण तटाला फेरी मारता येते. तटबंदीमध्ये बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. हा या भागातील सर्वात उंच डोंगर असल्याने केवळ समुद्राकाठचा दमण किल्लाच नव्हे तर दमणगंगा नदीपात्र तसेच दमण शहर व खुप मोठा परिसर नजरेस पडतो. संपुर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. पेशवाई काळात वसई किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे धारावी किल्ल्याची निर्मिती करण्यात आली त्याचप्रमाणे दमण किल्ल्यातून वसई किल्ल्याला मदत मिळू नये यासाठी दमण किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी इंद्रगड किल्ला बांधला गेला असावा. या संपूर्ण किल्ल्याच्या बांधकामावर मराठा वास्तुशैलीचा प्रभाव ठळकपणे दिसुन येतो. या किल्ल्यामुळे पोर्तुगीजांच्या जमिनीच्या दिशेने होणाऱ्या हालचालींवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या. दमण शहराच्या सरहद्दीवर असलेला हा किल्ला दमणच्या संरक्षणासाठी धोक्याची घंटा होती त्यामुळे पोर्तुगिजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला पण लवकरच तो परत मराठयांच्या ताब्यात आला. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत पोर्तुगीजांचे वसई येथील बस्तान उठल्याने पोर्तुगीजांची या भागातील ताकद ओसरली, त्यामुळे या किल्ल्यावर नंतरच्या काळात लढाईचा फारसा प्रसंग आला नसावा. या किल्ल्याचा इतिहास आपल्याला पेशवेकाळात आढळतो. बारभाईंच्या कारस्थानाने रघुनाथरावास पेशवेपदावरून दुर केल्यावर आपापसात झालेल्या युध्दात अधिक भाद्रपद शु॥ १२ शके १६९८ च्या सुमारास अर्जुनगड व इंद्रगड किल्ला रघुनाथराव पेशव्यांच्या ताब्यात आला व तेथुन त्यांनी गोव्याच्या पोर्तुगीजांशी संधान साधले. दमणच्या पोर्तुगीजांनी हे दोन्ही किल्ले त्यांच्या ताब्यात देण्याच्या अटीवर दोनशे गोरे सैनिक व तीनशें स्थानिक सैनिक व सोबत आठ-दहा तोफा देण्याचे कबुल केले. पण रघुनाथरावांचा त्यांच्यावर विश्वास नसल्याने किल्ल्याचा ताबा त्यांनी सोडला नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!