इंदुरी

प्रकार : भुईकोट

जिल्हा : पुणे

उंची : 0

श्रेणी : सोपी

तळेगाव - चाकण रस्त्यावर तळेगाव पासून ४ किमी अंतरावर इंदुरी गाव आहे. या गावात इंद्रायणी नदीकाठी असलेली सरदार दाभाडे यांची गढी इंदुरीचा किल्ला म्हणून ओळखली जाते. तळेगाव -चाकण रस्त्याने इंदुरी गावात जाताना इंद्रायणी नदीवरील पुलावरून डाव्या बाजूला नदीकाठी असलेली किल्ल्याची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. या वाटेने तटबंदी शेजारून आपला इंदुरी गावात प्रवेश होतो व डाव्या बाजुस किल्ल्याचे पुर्वाभिमुख प्रवेशव्दार नजरेस पडते. गडाच्या दरवाजाची भव्यता पहाता किल्ल्याच्या इतर भागाची बांधणी अगदीच तकलादु वाटते. किल्ल्याचा दरवाजा दोन बुरुजात बांधलेला असुन कमानीच्या दोन्ही बाजुस शरभ व मध्यभागी गणपती कोरलेला आहे. या दरवाजाची उंची २० फुट तर रुंदी १२ फुट आहे. प्रवेशव्दाराच्या वरील बाजूस असलेला नगारखाना आजही चांगल्या अवस्थेत आहे. बुरुजांचा फांजीपर्यंतचा भाग दगडांनी बांधलेला असून वरील त्यावरील भाग वीटांनी बांधलेला आहे. ... तटबंदी व बुरुजांमध्ये जागोजागी तोफ व बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्यांची रचना केलेली आहे. प्रवेशव्दाराच्या आत दोन्ही बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन उजवीकडील बाजुने नगारखान्यात जाणारा मार्ग आहे. बाहेरून नगारखाना वाटणारा हा भाग आतुन महालासारखा सजवला असुन त्याच्या छतावर व भिंतीत चुन्यामध्ये सुंदर कोरीव काम केलेले आहे. दरवाजाच्या उजव्या बाजुस तटामध्ये भिंतीत कोनाडे असणारी एक साठवणीची खोली आहे. अशीच अजुन एक खोली दक्षिणेकडील तटातील बुरुजाखाली पहायला मिळते. किल्ल्याच्या उत्तरेकडील तटात एक लहान दरवाजा असुन येथुन पायऱ्यांनी इंद्रायणी नदीच्या पात्राकडे उतरता येते. या नदीपात्रामुळे किल्ल्याला एका बाजुने खंदकाचे संरक्षण मिळाले आहे. किल्ल्ल्यावर कडजाई देवीचे मंदिर असुन मंदिराच्या आवारात काही विरगळ दिसुन येतात. याशिवाय पश्चिम दिशेला तटबंदीवर एका छोटया घुमटीत शेंदुर फासलेला दगड दिसून येतो. किल्ल्याच्या आतील परिसर खाजगी मालकीचा असुन त्यात अलीकडच्या काळात काही बांधकामे झाली आहेत. किल्ला दुर्लक्षीत असल्याने सर्वत्र बोरी व बाभळीच्या झाडाचे रान माजले आहे त्यामुळे काही ठिकाणी तटबंदीवर देखील जाणे अवघड आहे. किल्ल्याच्या तटबंदीत ९ तर दरवाजाजवळ २ असे एकुण अकरा बुरुज आहेत. तटबंदीची रूंदी १० फूट तर काही ठिकाणी ४ फुट आहे पण तटबंदी आतील बाजुस बऱ्याच ठिकाणी कोसळलेली असल्याने तटबंदीवरून सलग फेरी मारता येत नाही. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावरून खालून वाहणारी इंद्रायणी नदी व दुरवरचा प्रदेश दिसतो. गडाच्या बाहेर इंद्रायणी नदीकिनारी शंकराचे पुरातन मंदिर असुन या बाजुने किल्ल्याचा उत्तरेकडील दरवाजा व अखंड तटबंदी बुरुजासाहित नजरेस पडते. संपुर्ण किल्ला फिरण्यास १ तास पुरेसा होतो. शाहू महाराजांच्या काळात खंडेराव दाभाडे यांनी इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदेपर्यंत मुलुख काबिज केला. यावर शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणुन नेमणुक केली व तळेगाव वतन त्यांना बहाल केले. हे वतन नंतरच्या काळात त्यांच्या नावाने तळेगाव दाभाडे म्हणुन ओळखले जाऊ लागले. इ.स.१७२०-२१ च्या सुमारास खंडेराव दाभाडे यांना इंदुरीची गढी बांधली. खंडेराव दाभाडे यांचे निधन २७ सप्टेंबर १७२९ मध्ये तळेगावच्या जुन्या राजवाड्यात झाले. त्यांची समाधी इंद्रायणी नदीकाठी बनेश्वर मंदिराजवळ आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!