आमनेर

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : अमरावती

उंची : ९५१ फुट

श्रेणी : मध्यम

मेळघाटात असलेले नरनाळा व गाविगड हे बलाढ्य दुर्ग वगळता इतर लहान किल्ले आज अज्ञातवासात गेले आहेत. या किल्ल्यांबाबत फारशी कुणाला माहीती देखील नाही. विदर्भातील अमरावतीच्या धारणी तालुक्यात आमनेरचा किल्ला अथवा झिल्पी आमनेर म्हणुन ओळखला जाणारा असाच एक अपरिचित किल्ला आहे. स्थानिक लोक या किल्ल्याला हासीर किल्ला या नावाने ओळखतात. तापी नदी व गडगा नदीच्या संगमावरील छोट्याशा त्रिकोणी आकाराच्या टेकडीवर असलेला हा किल्ला म्हणजे उत्तरेतुन विदर्भात येणाऱ्या मार्गावरील खडा पहारेकरीच. किल्ल्याच्या दोन बाजुस नदीचे पात्र व एका बाजुस खंदक अशी या किल्ल्याची सरंक्षक रचना आहे. किल्ल्याजवळील आमनेर गाव ब्रिटीशकाळात उठुन गेल्याने भोकरबर्डी हे आता किल्ल्याच्या जवळचे गाव आहे. आमनेर किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला अमरावती येथुन परतवाडा-सेमाडोह-हरीसल मार्गे धारणी हे तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. ... हे अंतर साधारण १४५ कि.मी.आहे. येथुन धारणी बुऱ्हाणपूर मार्गावर भोकरबर्डी हे गाव ११ कि.मी. अंतरावर आहे. या रस्त्याने भोकरबर्डी गावात शिरण्यापुर्वी डावीकडे एक आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेसमोरच उजवीकडे एक लहान रस्ता तापी नदीच्या दिशेला जातो. हा रस्ता आपल्याला किल्ल्यासमोर असलेल्या तापी-गडगा नदीच्या संगमावर आणून सोडतो. येथुन आमनेर किल्ल्याचे सुंदर दर्शन घडते. किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला गडगा नदीचे पात्र ओलांडावे लागते. नोव्हेंबरनंतर नदीचे पाणी कमी होत असल्याने नदी सहजपणे पार करता येते पण पावसाळ्यात व नंतर नदीला पाणी असताना नदी पार करणे धोक्याचे आहे. त्यामुळे या किल्ल्यास भेट देण्यासाठी डिसेंबर ते जुन हा योग्य कालावधी आहे. गडगा नदी ओलांडून किल्ल्याकडे जाताना डावीकडे किल्ल्याची पुर्वपश्चिम पसरलेली तटबंदी व या तटबंदीमधील ढासळत चाललेला बुरुज दिसतो. बुरूजाकडे जाणाऱ्या या वाटेने थोडेसे चढल्यावर बुरुज व तटबंदी डावीकडे ठेवत आपण तटबंदीच्या उत्तर टोकाला पोहोचतो. किल्ल्याच्या उत्तर भागात असलेली तटबंदी पुर्णपणे उध्वस्त झाली असुन किल्ल्याचा या भागात असलेला दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला आहे. या भागात खाजखुजलीच्या वेली मोठया प्रमाणात असल्याने थोडे सांभाळूनच जावे लागते. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच नव्याने बांधलेल्या घुमटीत मारुतीची मुर्ती दिसते. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून ९५५ फुट असुन त्रिकोणी आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर दोन एकर परिसरावर पसरलेला आहे. किल्ल्याच्या प्रत्येक टोकाला एक असे चार व तटाच्या मध्यभागी एक असे एकुण सात बुरुज किल्ल्याच्या तटबंदीत आहेत. यातील उत्तरेच्या टोकावरील एक बुरुज पुर्णपणे नष्ट झाला असुन उर्वरित बुरुजांची पडझड झाली असली तरी ओळखु येण्याइतपत ते शिल्लक आहेत. किल्ल्याचे बहुतांशी बांधकाम विटांनी केलेले असुन या बांधकामात वाळुमीश्रीत चुना वापरलेला आहे. तटबंदीच्या भिंतींमध्ये बंदुका व तोफांच्या माऱ्यासाठी जंग्या बांधल्या आहेत. तटावरील चर्या विटांनी बांधलेल्या असुन त्यात सुंदर कमानी आहेत. उत्तरेकडील एका बुरुजाचे बांधकाम मात्र दगड व चुन्यात करण्यात आले आहे. किल्ल्याच्या आतील भागात मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने त्यातून वाट काढतच गडफेरी करावी लागते. तटाची फांजी काही ठिकाणी कोसळली असल्याने तटावरून सलगपणे फेरी मारता येत नाही. किल्ल्याच्या आत एक चौथरा शिल्लक असून त्यात एक तळघर दिसुन येते. इतर सर्व वास्तु मात्र काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. तापी-गडगा नदीच्या संगमाकडील एक बुरुज पाकळीच्या आकाराचा असुन या बुरुजावरुन दोन्ही नदीचे लांबवर पसरलेले पात्र नजरेस पडते. या दोन्ही बुरुजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या राहण्याची सोय केलेली असुन एका बुरुजावर तोफेसाठी पाण्याचा लहान हौद बांधलेला आहे. तापी नदीच्या दिशेला असलेल्या तटबंदीत नदीच्या दिशेने एक लहान दरवाजा असुन या दरवाजाच्या खालील भागातील नदीपात्रात काही बांधकाम केलेले दिसुन येते. येथुन बहुदा किल्ल्यावर पाणी पुरवठयाची सोय केली असावी. हि वाट घसाऱ्याची असुन वापरात नसल्याने कठीण झाली आहे. या तटबंदीला लागुनच एक कोठार आहे. आमनेरचा किल्ला नेमका कोणी व केव्हा बांधला याबाबत माहिती उपलब्घ नसली तरी किल्ल्याचे सध्या अस्तित्वात असलेले बांधकाम पहाता हे बांधकाम सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात करण्यात आले असावे असे वाटते. मेळघाट परगण्यात असलेला हा किल्ला तत्कालीन भौगोलिक परीस्थितीत मोक्याच्या जागेवर उभा होता. इ.स.१५७२ च्या सुमारास निजामशाहीत फिरोजशहा या सरदाराने निजामशहा विरोधात बंड केले असता निजामशहाने सय्यद मुर्तझा या सरदाराला त्याच्यावर पाठवले. त्यावेळी फिरोजशहा एलिचपूरहून पळून आमनेर चर्वी येथे आश्रयास आल्याची नोंद बुरहाने मासीर या ग्रंथात आढळते. इ.स.१५९९ मधील अकबराच्या दक्षिणेकडील स्वारीनंतर बुऱ्हानपूरचे महत्व वाढल्याने त्याच काळात हा किल्ला बांधला गेला असावा असे वाटते. त्यानंतर १७२७ ला पहिले बाजीराव पेशवे यांचा तापीकाठी तळ असल्याचे उल्लेख आढळतात. इ.स.१८१८ मध्ये दुसरे बाजीराव पेशवे जिल्पी आमनेर किल्ल्याजवळ आल्याचे व १८१९ ला नागपूरकर आपासाहेब भोसले व ब्रिटीश यांच्यात या किल्ल्यावर लढाई झाल्याचे उल्लेख देखील येतात. इ.स. १८५८ मध्ये इंग्रजांनी आमनेर किल्ल्याचे प्रवेशव्दार व तटबंदी उध्वस्त करून किल्ल्यातील चार तोफा काढून घेतल्या. त्यानंतर राजस्थान मधून मेळघाटात आलेल्या पोद्दार घराण्याचे वंशज विजयसिंह व जयसिंह या पोद्दार बंधूंनी इंग्रजांना मेळघाटातील वैराट, माखला, कोट इत्यादी ठिकाणे जिंकून दिल्याबद्दल इंग्रजांनी विजयसिंहाचा मुलगा फतेहसिंह याला इ.स.१८९१ मध्ये मेळघाटातील ९९० गावांची जहागिरी बहाल केली व हा परीसर फतेहसिंह व त्यांचा मुलगा खुमानसिंह यांच्या ताब्यात गेला. खुमानसिंह १९०५ पर्यंत मेळघाटच्या गादीवर असताना काही काळ आमनेर किल्ल्यावर वास्तव्यास होता. भिल्ल चळवळीतील तंट्या भिल्लवर कारवाई करण्यासाठी खुमानसिंहाने या किल्ल्याचा वापर केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!