आड किल्ला
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : ४०२८ फुट
श्रेणी : मध्यम
अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांग तशी सर्वाना परिचित आहे. या डोंगररांगेच्या पुर्व बाजुस औंढा, पट्टा, आड,बितंगगड यासारखे किल्ले वसले आहेत. आड हा या रांगेतील शेवटचा किल्ला. या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला ठाणगाव गाठावे लागते. घोटी- भंडारदरा रस्त्यावरील टाकेद गावातून म्हैसमाळ घाटमार्गे घोटी-ठाणगाव हे अंतर ५२ किमी तर सिन्नरमार्गे ७५ कि.मी आहे. ठाणगाव ते आडच्या पायथ्याशी असलेली वरची आडवाडी हे अंतर सुमारे १० कि.मी. असून पवनचक्क्यांमुळे या सर्व भागात रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. आड गावाजवळ असणाऱ्या या किल्ल्याविषयी कुणाला फारशी माहित नाही. वरच्या आडवाडीतून रस्त्याने थोडे पुढे आल्यावर एखाद्या घराप्रमाणेच दिसणारा महानुभव पंथाचा आश्रम आहे.
...
येथुन एक रूळलेली पायवाट अर्ध्या तासात आपल्याला गडावर घेऊन जाते व तुटलेल्या तटबंदीतुन आपण गडावर प्रवेश करतो. गडावर जाण्याचा हा सर्वात जवळचा मार्ग आहे. या शिवाय गावातून किल्ल्याकडे जाणारी अजुन एक पण थोडी दुरची वाट आहे. आडवाडीच्या बाजुने आड किल्ल्याची एक सोंड खाली गावाकडे उतरते. गावातुन आल्यास वाटेतील धरण पार केल्यावर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात येतो. या मंदिरात दोन विरगळ पहायला मिळतात. येथुन सोंडेवरून थोडा चढ चढल्यावर वाट उजवीकडे वळते आणि गावातुन तासाभरात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून ४०२८ फुट आहे. गडाचा माथा एक विस्तीर्ण पठार असुन दक्षिणोत्तर साधारण ४० एकरवर पसरलेले आहे. आडवाडीच्या बाजुने गडावर जाताना या वाटेवर डाव्या बाजुला कड्यात एक नैसर्गिक विस्तीर्ण गुहा असून आत आडूबाई देवीचे मंदिर आहे. या गुहेला लागुन अजुन एक खोदीव गुहा व शेजारी पिण्याच्या पाण्याचे टाके असून गडावर मुक्काम करायचा असल्यास हि जागा योग्य आहे. येथुन उजवीकडे वळल्यावर गड माथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या १०-१२ पाय-या आहेत. यातील काही पाय-या ढासळलेल्या असल्याने थोडे जपुन चढावे लागते. गडाची बरीच पडझड झाली असुन काही ठिकाणी तुरळक तटबंदी दिसते. गडाच्या माथ्यावर काही उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष दिसुन येतात. यातील एका अवशेषात दगडी शिल्प असुन त्याची मोठया प्रमाणात झिज झाल्याने त्यातील शिल्प ओळखु येत नाही. या मूर्तीसमोर दिपमाळेसारखा एक मोठा दगडी दिवा ठेवलेला आहे. किल्ल्याच्या मधील उंचवट्यावर दोन वाड्यांची जोती असुन यातील एका चौथऱ्यावर समाधी आहे. याशिवाय गडाच्या पश्चिमेला अजुन एका वास्तुचे भिंतीसह अवशेष दिसुन येतात. गडावर सहा ठिकाणी पाण्याची एकुण सोळा टाकी असुन गुहेकडील एक टाके वगळता इतर पाच ठिकाणी जोडटाकी आहेत. या सर्व टाक्यात पाणी जमा करण्यासाठी खडकावर चर खोदलेले आहेत. याशिवाय गडावर एक मोठा साचपाण्याचा तलाव आहे. गडावरील पाण्याची सोय व सर्वत्र विखुरलेले अवशेष पहाता गड नांदता असताना गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. गडावर उत्तरेकडे असलेला दरवाजा कोकण दरवाजा म्हणुन ओळखला जातो. आज या दरवाजाची केवळ चौकट उभी असुन कमानीचे ढासळलेळे दगड आजुबाजुला विखुरलेले आहेत. किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पुर्वेला औंढा , पट्टा, बितनगड, म्हसोबा डोंगर या कळसूबाई रांगेचे दर्शन होते तर पश्चिमेला डूबेरगड दिसतो. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. इतिहासात या गडाबाबत कोणत्याही नोंदी दिसून येत नाहीत.
टीप - खाजगी वहानाने डुबेरगड, आड, पट्टा, औंढा आणि बितनगड हे पाच किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहुन होतात.
© Suresh Nimbalkar