आगरकोट (चौल-राजकोट)
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : रायगड
उंची : 0
श्रेणी : सोपी
रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग तालुक्यात रेवस ते कुंडलिका खाडीपर्यंत समुद्र किनाऱ्यालगत निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग म्हणजे अष्टागर. या अष्टागरात दक्षिण-पूर्वेकडील कुंडलिका खाडीवरचे शेवटचे गाव म्हणजे रेवदंडा. रेवदंडा शहर प्राचीन चौलचाच एक भाग असल्याने या परिसराचा चौल-रेवदंडा असा उल्लेख केला जातो. रेवदंडा किल्ल्यास चौलचा किल्ला समजले जाते पण चौलचा किल्ला राजकोट हा या किल्ल्यापासुन पूर्णपणे वेगळा आहे. रेवदंड्याचा इतिहास हा चौलच्या इतिहासाशी जोडला जातो पण चौलचा इतिहास हा पूर्णपणे वेगळा आहे. सह्याद्रीत उगम पावणारी कुंडलिका नदी चौल-रेवदंडा जवळ अरबी समुद्राला जेथे मिळते त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर प्राचीन काळापासून चौल हे सुरक्षित व प्रसिद्ध बंदर होते. या बंदराच्या रक्षणासाठी तेथे निजामशाही काळात भुईकोट किल्ला व इतर अनेक वास्तु बांधल्या गेल्या. पण पोर्तुगीजानी रेवदंडय़ात आपले बस्तान बसविण्यासाठी रेवदंडा किल्ला बांधला व चौलचे महत्व लोप पावले.
...
पण येथे असलेला चौलचा किल्ला अगदी सतराव्या शतकापर्यंत वापरात होता. पण आजमात्र पर्यटकांना समुद्रकिनारी असलेल्या रेवदंडा किल्ला माहित असुन चौलचा किल्ला मात्र पूर्णपणे विस्मरणात गेला आहे. इतकेच नव्हे तर या किल्ल्याची कोठे माहिती माहिती व उल्लेख येत नसल्याने हा किल्ला दुर्गप्रेमींच्या यादीत देखील दिसुन येत नाही. राजकोट किल्ला पाहण्यासाठी आपण सर्वप्रथम अलिबाग गाठावे. मुंबई-अलिबाग हे अंतर १०० कि.मी.असुन पुणे अलिबाग हे अंतर साधारण १४० कि.मी. आहे. अलिबागपासुन राजकोट किल्ला १६ कि.मी.अंतरावर असुन तेथे जाण्यासाठी बस अथवा रिक्षाने चौलनाका येथे उतरावे. येथे जवळच चौलचे ग्रामदैवत रामेश्वर याचे कोकणी वास्तुशैलीतील कौलारू मंदिर आहे. मंदिराच्या आवारात नंदीमंडप, दीपमाळ व पुष्करणी आहे. मुळ मंदिर कोणी व केव्हा बांधले गेले हे माहित नसले तरी मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार केल्याचे उल्लेख येतात. मंदिराच्या मागे असलेल्या वाडीत दगडी जोत्यावर आंग्रे घराण्यातील पुरुषाची समाधी आहे. रामेश्वराचे दर्शन घेऊन आपण आपल्या गडफेरीस सुरवात करावी. चौलच्या किल्ल्यास भेट देण्यापुर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. रेवदंडा किल्ला हा चौलचा किल्ला तसेच आगरकोट या नावाने देखील ओळखला जातो. चौलच्या किल्ल्याचे नाव राजकोट असुन या किल्ल्याची तटबंदी आग्राव गावाच्या हद्दीपर्यंत असल्याने काहीजण याचा उल्लेख आगरकोट असाही करतात पण कागदोपत्री असा उल्लेख कोठेही दिसुन येत नाही. राजकोट किल्ल्याची जमीनीकडील तटबंदी जवळपास नष्ट झाली असून काही ठिकाणी ती अवशेष रुपात शिल्लक आहे. हे सर्व दगड खाजगी कामासाठी वापरलेले असून किल्ल्यातील वास्तुंचा देखील असाच दुरुपयोग होत आहे. किल्ला विचारल्यास कोणालाही माहित नसल्याने अवशेषांच्या नावाने विचारणा करावी. राजकोट किल्ला हा ९० टक्के खाजगी मालकीत असल्याने या मालकांचा योग्य तो मान राखुन ( डोक्यावर बर्फ व तोंडात साखर) ठेऊन किल्ला पहावा. राजकोट किल्ल्याकडे जाण्यासाठी आग्रावकडे जाणाऱ्या रस्त्याने दादरा भागात यावे. राजकोट किल्ल्याचे अवशेष दादरा या भागापासुन सुरु होतात. येथे शितळादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून उजवीकडे कच्च्या रस्त्याने काटकर आळीकडे वळावे. या वाटेवर सर्वप्रथम तटबंदीची मोठी भिंत नजरेस पडते. येथे पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारक असल्याचा फलक लावलेला आहे. येथुन आत आल्यावर उजवीकडे वळावे. या वाटेने आपण काटकरआळीत पोहोचतो. येथे समोरच एक भव्य कमान पहायला मिळते. हि कमान एखादया भव्य वास्तूची असावी. कमानीसमोर रस्त्याच्या डावीकडे एक दुमजली कमानीदार वास्तु आहे. या वास्तुत प्रवेश करण्यासाठी एक मोठा दरवाजा असुन आत आल्यावर दोन बाजुस तीन-तीन कमानी आहेत. यातील एका कमानीतुन वरील बाजुस जाण्यासाठी जिना आहे. या वास्तुची केवळ एका बाजूची भिंत शिल्लक आहे. या भागात इतर काही उध्वस्त वास्तु आहेत. काटकर आळीत स्थानिकांना येथे असलेल्या मशिदीबाबत विचारणा करावी. काटकरआळीच्या मागील बाजुस खाडीच्या दिशेने १५ कमानीवर तोललेली दगडी बांधकामातील मशीद आहे. या मशिदीतील चार कमानी कोसळलेल्या असून कमानीतील दगडाची देखील झीज झालेली आहे. मशिदीच्या आतील घुमटावर वेगवेगळ्या नक्षी कोरलेल्या आहेत. मशिदीला लागुनच घडीव दगडात बांधलेला एक लहान दर्गा असून त्यात दोन थडगी आहेत. या दर्ग्यात एक अरेबिक तर एक पर्शियन शिलालेख असून त्यात हि आसा/अरीह मशीद बुऱ्हाण निजामशहाने १६ व्या शतकात बांधल्याचा उल्लेख आहे. या मशिदीकडे खाडीजवळ असलेली तटबंदी आग्राव गावाच्या दिशेने साधारण १.५ कि.मी.पर्यंत पसरली आहे. खाडीशेजारी असलेली हि तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असुन या भागात दोन बुरुज पहायला मिळतात. मला या तटबंदीतील एकुण सहा बुरुज पहायला मिळाले. तटबंदीत यापेक्षा जास्त बुरुज आहेत पण खाजणामुळे व प्रवेशबंदीने ते आपल्याला पहाता येत नाहीत. मशीद पाहुन झाल्यावर पुन्हा शितळादेवी मंदिर रस्त्यावर यावे व गुळबादेवी मंदिराकडून कच्च्या रस्त्याने उजवीकडे वळावे. या रस्त्याने जाताना वाटेत एका रांगेत सात कमानी असलेली इमारत पहायला मिळते. यातील एका कमानीतुन आत जाण्याचा मार्ग आहे. हमामखाना म्हणुन ओळखली जाणारी हि वास्तु म्हणजे मुस्लीम राज्यकर्त्यांनी बांधलेले स्नानगृह आहे. अतिशय सुंदर अशी हि वास्तु देखरेखी अभावी मातीमोल झाली आहे. या वास्तुतील दालने, त्यावरील चुन्यात केलेले नक्षीकाम,पाण्याचे हौद व त्यात खापरी नळाने केलेला गरम व थंड पाणी पुरवठा,पाणी गरम करण्याची तसेच दालनात वाफ कोंडण्याची सोय,कारंजे हे सर्व अभ्यासक दृष्टीने पहायलाच हवे. पण या वास्तुची येथील मालकाकडून होणारी हेळसांड या वास्तुच्या नाशाला कारणीभूत ठरत आहे. हमामखान्याजवळ याला पाणीपुरवठा करणारी विहीर असुन या विहिरीचे पाणी आज बागेसाठी वापरले जाते. हमामखाना पाहुन शितळादेवी मंदिराकडून आग्रावकडे जाताना वाटेत काही अवशेष तसेच रस्त्याच्या उजवीकडे खाडीच्या दिशेने किल्ल्याची तटबंदी व त्यातील दोन बुरुज पहायला मिळतात. येथुन पुढे आल्यावर रस्त्यावर एक लहान मंदिर पहायला मिळते. या मंदिराच्या उजव्या बाजुस खाजणाच्या दिशेने किल्ल्याची तटबंदी आहे. या ठिकाणी काही वास्तु अवशेष असून यात एका दुमजली वास्तूची भिंत आहे. या भिंतीत या वास्तुचा दरवाजा वरील मजल्यावर दोन खिडक्या व पाच कोनाडे आहेत. या ठिकाणी तटबंदीत एक दुमजली बुरुज अवशेष रुपात शिल्लक आहे.या ठिकाणी आपली दुर्गफेरी पुर्ण होते. किल्ल्याचा बहुतांशी भाग खाजगी मालमत्ता असल्याने काही मालक आत जाऊन पहायला परवानगी देतात तर काही उगीचच शिष्टपणा दाखवतात. काहीजण छायाचित्र काढू देत नाहीत का ते त्यांनाही ठाऊक नाही. शितळादेवी मंदिर परीसरात तीन मोठे तलाव पहायला मिळतात. किल्ल्याबाहेर सराई गावाजवळ कलावंतिणींचा वाडा म्हणुन ओळखली जाणारी सराई पहायला मिळते. हि सराई चौल येथे आलेल्या व्यापाऱ्यांच्या केवळ रहाण्याची सोय म्हणुन बांधलेली आहे. नावावर जाऊ नये. संपुर्ण किल्ला पहाण्यास साधारण दोन तास लागतात. प्राचीन काळी चौल हे चंपावती तर रेवदंडा हे गाव रेवतीक्षेत्र असल्याची कथा सांगितली जाते. सातवाहन, राष्ट्रकूट, मौर्य, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, निजामशाही, आदिलशाही, पोर्तुगीज, मराठे व सिद्धी अशा अनेक राजसत्तांनी चौलवर आपली सत्ता गाजवली. चौल परिसरात पुरातत्व खात्याने उत्खनन केले असुन त्यांना येथे सातवाहनकालीन अवशेष सापडले आहेत. कान्हेरी येथील चार शिलालेखांत चेमुल म्हणजेच चौल येथील व्यापाऱ्यांनी दिलेल्या दानाची नोंद आहे. सुवर्णकार रोहिणीमित याच्या मुलगा सुलसदत याने पाण्याच्या पोढीचे दान, सुवर्णकार रोहिणीमित याचा दुसरा मुलगा धमणक याने दान म्हणून दिलेला मार्ग, श्रीमुचा मुलगा सिवपुत याने कान्हेरी येथील गुहेचे दान व यश याच्या मुलाने स्मशान गुंफेला जाणाऱ्या पायरी मार्गासाठी दिलेली देणगी असे शिलालेख वाचायला मिळतात. इ.स. १३० पासून ते १५८३ पर्यंत ह्या बंदरातून जगाच्या कानाकोपऱ्यात जहाजे जात येत होती. टॉलेमीच्या इ.स.२४७ मधील पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी या प्रवासवर्णनात या बंदराचा उल्लेख सिमुल्ल या नांवानें येतो तर ह्यूएनत्संग यास चिमोलो म्हणतो. पुढें १२ व्या शतकांत अरब लोक यास सैमूर आणि जैमूर म्हणत होते. दहाव्या शतकात अल मसुदी हा अरबी व्यापारी येथे आला असता झंझ शिलाहार राजा येथे राज्य करत असल्याचे त्याने नमूद केले आहे. भारताला भेट देणारा अफनासी निकीतीन हा पहिला रशियन प्रवासी इ.स.१४६६ ते ७२ या काळात भारतात आला होता. त्याने त्याच्या या प्रवासाची सुरुवात चिव्हीलच्या (चौल) बंदरातुनच केली होती. कालांतराने बंदरात गाळ साचत गेल्याने बंदराचा उपयोग कमी होत गेला. यादव साम्राज्याच्या अस्तानंतर हें शहर मुस्लीम राजवटीखाली आले व त्याच काळात इ.स. १५०५ मध्ये पोर्तुगीज येथे आले. इ.स.१५०८ मध्ये विजापुरकर व पोर्तुगीज याच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव झाला. सन १५१६ त पोर्तुगीजांनीं येथें वखार बांधली. इ.स.१५२१ मध्ये विजापूरच्या सैन्याने चौल बंदरास आग लावली व पोर्तुगीजांचा पराभव केला. यानंतर पोर्तुगीजांनी रेवदंडा गावाचे महत्व ओळखून १५२१ ते १५२४ दरम्यान खाडीच्या मुखावर रेवदंडा किल्ला बांधला व चौलचे महत्व कमी होत गेले. इ.स.१५२८ मध्ये तुर्की जहाजांनी चौलवर हल्ला केला पण पोर्तुगीज व निजामशहा यांच्या सैन्याने तुर्कीचा पराभव केला. इ.स.१५८३ मध्ये चौल बंदरास तटबंदी असल्याचे उल्लेख येतात. म्हणजे या काळात हा किल्ला अस्तित्वात होता. निजामशाहीच्या अस्तानंतर १६ व्या शतकात हा भाग मोंगलांच्या ताब्यांत आला पण त्यांनी तो आदिलशहाच्या ताब्यात सोपवला. इ.स.१६३६ मध्ये आदिलशहाचा चौलवर ताबा असताना त्यांनी राजकोट बांधला अशी नोंद काही ठिकाणी येते पण किल्ल्यातील मशीद तसेच १५८३ मधील चौल बंदराच्या तटबंदीची नोंद पहाता किल्ला निजामशाही पासुनच अस्तित्वात असल्याचे दिसुन येते. इ.स.१६५७-५८च्या सुमारास शिवरायांनी चौल जिंकले पण रेवदंडा मात्र पोर्तुगीजांकडे राहिला. इ.स. १६७२ मध्ये डॉ.फ्रायर याने चौलला भेट दिली असता चौल बाजारपेठ शिवाजी महाराजांच्या ताब्यात असुन मुघलांबरोबर सततच्या लढाईने ती ओस पडल्याचे म्हटले आहे. काही ठिकाणी प्राचीन चौल गावात १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी राजकोट किल्ला बांधल्याचे म्हटले जाते पण त्याला सबळ आधार नाही. २२ जुलै १६८३च्या रात्री संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ६ हजार शिपाई व २ हजार घोडेस्वारांसह रेवदंडा किल्यावर हल्ला केला पण पोर्तुगिजांनी सिद्दींच्या मदतीने तो उधळून लावला. मराठ्यांनी रेवदंड्याला वेढा घातल्यावर तो मोडून काढण्यासाठी पोर्तुगिजांनी फोंड्यावर हल्ला केला. त्यामुळे मराठ्यांना वेढा सोडून जावे लागले. कान्होजी आंग्रेंच्या काळात पोर्तुगिजांनी एका रात्री अचानक आंग्रेनी वसवलेल्या सागरगड जवळील ब्राम्हणगावावर हल्ला केला पण सावध असलेल्या कान्होजीं आंग्रे यांनी पोर्तुगीजांची अशी काही कत्तल केली कि त्यांना रेवदंडा किल्ला गाठणे कठीण झाले. तेव्हा चौलचा सुभेदार हकीम मोतमनखान याने पळणाऱ्या पोर्तुगिजांना राजकोटात आसरा दिल्यामुळे काही पोर्तुगीज बचावले. इ.स.१७३३-३४ च्या शाहु-मोगल करारानुसार राजकोट मोगलांच्या ताब्यात गेला पण त्यावर अंमल संभाजी आंग्रे यांचा होता. पुढे संभाजी आंग्रे व मानाजी आंग्रे यांच्या गृहकलहात मानाजीने किल्ल्याचा ताबा घेतला पण डिसेंबर १७३४ मध्ये संभाजी आंग्रेनी पोर्तुगीजांच्या मदतीने किल्ला परत जिंकला. यावेळी किल्लेदार रायाजी उत्तेकर याला हटवून नवीन किल्लेदार नेमला. इ.स.१७३९ मधील वसई विजयानंतर राजकोट चिमाजीअप्पांच्या ताब्यात आला व चिमाजीअप्पांनी तो परत आंग्रेच्या ताब्यात दिला. राजकोटाचा वारंवार होणारा अडथळा लक्षात घेऊन नानासाहेब पेशव्यांनी राजकोट पाडण्याचा निर्णय घेतला व इ.स.१७४८ मध्ये जानेवारी महिन्यात सरदार बाजीराव बेलोसे यांनी सुरुंग लावून किल्ल्याची जमिनीकडील तटबंदी जमीनदोस्त केली.
© Suresh Nimbalkar