अहीवंत

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ३८८० फुट

श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगर रांगेतील किल्ल्यांचे एक वैशिष्ट आहे. यातील १-२ अपवाद वगळता कोणताही किल्ला आपल्याला २-३ तास चालुन थकविल्या शिवाय गडमाथा गाठु देत नाही. अहिवंतगड हा सातमाळ रांगेतील एक प्रमुख किल्ला. किल्ल्याच्या बाजुस असलेले अचला व मोहनदर या दोन किल्ल्यांची बांधणी बहुधा अहिवंतगडाच्या रक्षणासाठी करण्यात आली असावी. किल्ल्याचा प्रचंड आकार, त्यावरील गुहा व अनेक वाड्यांचे अवशेष, एक मोठा तलाव व खडकात खोदलेली पाण्याची टाकी या सर्व गोष्टी किल्ल्यावर मोठया प्रमाणात राबता असल्याचे दाखवतात. या शिवाय किल्ल्याशेजारी असलेल्या बुधलीच्या आकाराच्या डोंगराला लहान किल्ल्याचे स्वरूप देऊन किल्ल्याची संरक्षण रचना अधीक बळकट करण्यात आली होती. अहीवंतगड व बुध्या डोंगर पहाताना आपल्याला पनवेल जवळील प्रबळगड व कलावंतीण या सुळक्याची आठवण आल्यशिवाय रहात नाही. ... गडावर जाण्यासाठी दरेगाव,बेलवाडी,अचला अशा विविध गावातुन वाटा असल्या तरी दरेगावातून जाणारी वाट हि कमी थकवता कमी वेळात माथ्यावर नेत असल्याने या वाटेने गडावर जाणे हा उत्तम पर्याय आहे. या वाटेने गड चढुन बेलवाडी खिंडीत उतरल्यास कमी वेळात संपुर्ण किल्ला पाहुन होतो. किंवा याचे उलट देखील करता येते. खाजगी वाहनाने बेलवाडी खिंडीत गेल्यास आपण किल्ल्याचा अर्धा डोंगर चढुन जातो. अहिवंतगडचा आकार प्रचंड असल्याने अहिवंत आणि त्याच्या बाजूचा बुध्या डोंगर पहाण्यासाठी ६-७ तास लागतात. दरेगाव हे अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव नाशीकहुन वणीमार्गे ५५ कि.मी.अंतरावर असुन वणी ते दरेगाव हे अंतर १० कि.मी आहे. गावात शिरल्यावर गावामागे पसरलेला C आकाराचा डोंगर म्हणजेच अहिवंतगड. गावातुन किल्ला जरी C आकाराचा दिसत असला तरी या किल्ल्याच्या मागील बाजुस असलेल्या पाच सोंडा वेगवेगळ्या दिशांना पसरलेल्या आहेत. किल्ल्यावर जाणारी वाट मारुती मंदिरामागुन सुरु होते. वाट तशी मळलेली असल्याने चुकण्याचा संभव नाही पण किल्ल्यावर काही वास्तु अगदी दरीच्या काठावर असल्याने दिसत नाही त्यामुळे गावातुन एखादा वाटाड्या घेणे योग्य. अहिवंतगडाकडे जाताना आपल्याला किल्ल्याच्या डोंगराशेजारी दिसणारा सुळका म्हणजे बुध्या डोंगर व त्याशेजारी अजुन एक डोंगर आहे. गड चढायला सुरुवात केल्यावर आपण गावात उतरलेल्या डावीकडील सोंडेवरून बुध्या डोंगर व त्याशेजारी असलेल्या डोंगराला वळसा घालुन बुध्या डोंगर व अहिवंत गडाखालील घळीत येतो. घळ चढुन या दोन डोंगरामधील खिंडीत आल्यावर उजवीकडील वाट अहीवंतगडावर तर डावीकडील वाट बुध्या डोंगरावर जाते. बुध्या डोंगर हा अहीवंतगडाचाच एक भाग असल्यने सर्वप्रथम तो पाहुन घ्यावा. खिंडीतून डाव्या बाजुला बुध्या डोंगरावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या व त्याच्या वरील बाजुस बुरुज दिसतो. या पायऱ्या काही ठिकाणी तुटल्या असल्याने थोडे सांभाळूनच वर चढावे लागते. या बुरूजाशेजारी असलेला गडाचा पूर्वाभिमुख दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन शेजारील बुरुज देखील उध्वस्त झाला आहे. दरवाजाच्या आतील बाजुस एक कोरडे टाके पहायला मिळते. येथुन गडमाथा चढत गेल्यावर वाटेत एका रांगेत कोरलेली तीन कोरडी पडलेली टाकी पहायला मिळतात. वाटेच्या पुढील भागात वळणावर खालील बाजुस एक भलामोठा बुरुज असुन या बुरुजावर गोलाकार बांधकाम दिसते. बुध्याच्या माथ्यावर एक लहान टाके व दोन चौथरे वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाही. गडाचा माथा अतिशय लहान असल्याने अर्ध्या तासात आपण परत खिंडीत पोहोचतो. बुध्या डोंगरास असलेली तटबंदी, बुरुज,पाण्याची टाकी व दरवाजा पहाता हा डोंगर अहीवंतगडाचा उपदुर्ग असावा. आता खिंडीतील उजवीकडील वाटेने कातळात कोरलेल्या काही पायऱ्या चढत कड्यावरून १०-१५ मिनिटात आपण अहिवंतगडच्या माथ्यावर पोहोचतो. या भागात असलेली तटबंदी, बुरुज व दरवाजा कोसळुन त्याचे दगड मोठया प्रमाणात सर्वत्र विखुरले आहेत. कड्यावर असलेला दरवाजा नष्ट झाला असला तरी त्याचे स्थान ओळखण्या इतपत बांधकाम शिल्लक आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहाऱ्याच्या चौकीचे अवशेष दिसतात. माथ्याच्या डाव्या बाजुस एक टेकडीवजा उंचवटा आहे पण त्यावर कोणतेही अवशेष नाहीत. किल्ल्याची समुद्रसपाटी पासुन उंची ३८९० फुट असुन किल्ल्याचा विस्तार साधारण २५० एकरवर पसरलेला आहे. अहीवंतगडाचा विस्तार नजरेत सामावण्याच्या पलीकडे असल्याने सरळ वाटेने समोरील टेकडीच्या दिशेने चालण्यास सुरवात करावी. साधारणपणे आपण १० मिनिटाची पायपीट केल्यावर आपण एका उध्वस्त वास्तुपाशी पोहोचतो. या वास्तुच्या भिंती आजही शिल्लक असुन वरील छप्पर मात्र ढासळलेले आहे. हे बहुधा कोठार असावे. या भागात मोठया प्रमाणात घरांचे अवशेष असुन त्यात काही वाड्यांचे अवशेष पहायला मिळतात. एकुण अवशेष पहाता या भागात मोठया प्रमाणात वस्ती असल्याचे जाणवते. कोठाराच्या पुढील बाजुस उजवीकडे कातळात खोदलेला तलाव असुन तलावाच्या पुढील उंचवट्यावर पत्र्याच्या निवाऱ्याखाली एक हनुमानाची व दुसरी भग्न झालेली सप्तशृंगी देवीची मुर्ती ठेवली आहे. या उंचवट्याच्या अलीकडे एक बुजलेले तळघर दिसुन येते. हे अवशेष पाहुन गडावरील टेकडी उजव्या हाताला ठेउन कडयाच्या काठाने पुढे निघावे. इथे डाव्या बाजुला कडयाखाली कातळात कोरलेली गुहा आहे. ही गुहा वरील बाजुने दिसत नसल्याने गुहा पहाण्यास सोबत वाटाडया असणे गरजेचे आहे. गुहेकडे उतरण्यासाठी कातळात पायऱ्या कोरल्या आहेत. गुहेच्या आतील बाजुस दोन खांब कोरलेले असुन एक कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. या गुहेत १०-१२ जण सहज राहू शकतात पण त्यासाठी थोडे लवकर पोहोचुन गुहा साफ करणे गरजेचे आहे. गुहा पाहुन टेकडीला वळसा घालत आल्यावर जागोजागी घरांचे अवशेष दिसतात. वाटेच्या पुढील भागात पाण्याचे एक अष्टकोनी आकाराचे लहान बांधीव टाके असुन या टाक्यात वर्षभर पिण्यायोग्य पाणी असते. टाक्या शेजारी एक तुटकी दगडी ढोणी असुन त्याशेजारी खंडोबाची भग्न झालेली अश्वारुढ मुर्ती आहे. हे सर्व पाहुन टेकडीवर जावे. टेकडीवर मोठया प्रमाणात घरांचे अवशेष असुन यात विटांनी बांधलेले एक टाके पहायला मिळते. किल्ल्याचा हा सर्वात उंच भाग असल्याने येथुन संपुर्ण किल्ला नजरेस पडतो. येथुन अचला, मोहनदर ,सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या-जावळ्या, धोडप हे किल्ले सहजपणे नजरेस पडतात. आपण आलेल्या विरुद्ध दिशेस टेकडीखाली प्रचंड मोठा बांधीव तलाव नजरेस पडतो. या तलावातुनच गडावर पाणीपुरवठा होत असावा. या तलावाच्या दिशेने खाली उतरल्यावर पुढे जाताना उजव्या बाजुस कड्याखाली कातळात अर्धवट कोरलेली मोठी गुहा आहे. पण ती पहाण्यासाठी सोबत वाटाड्या हवा अन्यथा नेमके ठिकाण कळणे अवघड आहे. गुहेकडे उतरणारी वाट थोडी अवघड असल्याने जपुन जावे लागते. गुहा पाहुन परत फिरल्यावर सरळ जाणारी वाट आपल्याला किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजाकडे घेऊन जाते. या वाटेने जाताना उजव्या बाजुस कड्यावर काही प्रमाणात तटबंदीचे अवशेष दिसतात. किल्ल्याचा हा प्रवेशमार्ग कातळात कोरून काढलेला असुन येथे असलेला दरवाजा व आजुबाजुची तटबंदी व बुरुज पुर्णपणे ढासळलेले आहेत. कधीकाळी किल्ल्यावर येणारा हा मुख्य मार्ग असावा. दरवाजा उतरुन आपण किल्ल्याखालील पठारावर येतो. येथे सपाटीवर कातळात खोदलेले पाण्याचे मोठे पण कोरडे टाके दिसते. टाक्याच्या पुढील बाजुस डावीकडे एक वाट खाली उतरताना दिसते. हि गडाखाली उतरणारी वाट आहे पण पठाराच्या पुढील भागात काही अवशेष असल्याने ते फिरून नंतर या वाटेवर यावे. टाक्यावरून पुढे गेल्यावर मोठया प्रमाणात घराचे चौथरे पहायला मिळतात. हे चौथरे पार करून पुढे आल्यावर पठाराच्या उतारावर एका रांगेत खडकात खोदलेली पाण्याची तीन टाकी दिसतात. यातील दोन टाकी कोरडी पडलेली असुन तिसरे टाके मातीने भरलेले आहे. पठाराचा पुढील भागात उभा कडा असुन या भागात कोणतेही अवशेष नाहीत. येथुन मागे फिरून आधी पाहिलेल्या वाटेने गड उतरण्यास सुरवात करावी. या वाटेने खाली उतरताना कातळात कोरलेली दोन खांब असलेली गुहा दिसते. या गुहेच्या अलीकडे वाटेखाली दुसरी एक अर्धवट बुजलेली गुहा आहे. गावकरी या दोन्ही गुहेत पावसाळ्यात गुरे ठेवत असल्याने या गुहा रहाण्यायोग्य नाही. गुहा पाहुन पुढे आल्यावर आपण गडाच्या उध्वस्त झालेल्या दरवाजात पोहोचतो. आज या दरवाजाचा उंबरठा व त्यातुन खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्या वगळता काहीही शिल्लक नाही. या वाटेने सरळ खाली उतरत गेल्यास आपण बिलवाडी रस्त्यावर उतरतो तर कडयाच्या दिशेने गेल्यास दरेगाव-बिलवाडी रस्त्यावरील खिंडीत येतो. खिंडीतुन दरेगाव बेलवाडी रस्त्याने चालत अर्ध्या तासात आपण दरेगावला पोहोचतो. दरेगाव मारुती मंदिरापासुन सुरुवात करुन बुधा डोंगर आणि अहिवंतगड फिरून दरेगाव बेलवाडी खिंडीत उतरण्यास किमान ६ तास लागतात. सोळाव्या शतकात बागलाण प्रांत निजामशाहीकडे असता शहाजहानने हा प्रांत घेण्याची जबाबदारी शाहिस्तेखानावर सोपवली. शाहिस्तेखानाचा सरदार अलिवर्दीखान याने इ.स.१६३६ मधे अहिवंतगड जिंकून घेतला. शहजादा मुअज्जम व दिलेरखान यांच्या आपसातील भांडणाचा फायदा घेऊन प्रतापराव गुजर यांनी डिसेंबर १६७० मध्ये अहिवंतचा किल्ला जिंकून घेतला. यावर औरंगजेबने १६७१ मध्ये आपला सरदार महाबतखान बरोबर किशनसिंग, सुजाणसिंग, शुभकर्ण बुंदेला, अनुपसिंग, तुर्कताजखान इत्यादी मातब्बर सरदार अहिवंतगडावर पाठवले. महाबतखानने खानदेशचा मोगल सुभेदार दाऊदखानला सोबत घेऊन अहिवंतगडाला वेढा घातला. महाबतखान याने महादरवाजावर तर दाऊदखानने पिछाडीला मोर्चे लावले. एक महिना झाला तरी अहिवंतगड दाद देत नव्हता. या दरम्यान घडलेल्या एका मजेशीर घटनेची नोंद भिमसेन सक्सेनाच्या तारीखे दिल्कुशा या ग्रंथात सापडते. दाऊदखानाच्या छावणीत ज्योतिषीला बोलावुन किल्ला जिंकण्याचा मुहूर्त विचारण्यात आला. यावर ज्योतिषाने साखरेने अहिवंत गडाचा नकाशा काढला व त्यावर महाबतखान व दाऊदखानचे मोर्चे दाखवले. नंतर त्याने एक मुंगळा या साखरेच्या किल्ल्यावर सोडला. हा मुंगळा महाबतखानाने महादरवाजावर लावलेल्या मोर्च्याकडून दाउदखानाच्या मोर्च्याकडे गेला व तिथुन किल्ल्यात प्रवेश केला. यावर ज्योतिषाने सांगितले की महाबतखानाकडून महादरवाजावर जोरदार हल्ला होईल पण ६ दिवसांनी किल्ला दाउदखानाकडून हस्तगत होईल. भीमसेन सक्सेना लिहितो अहिवंतचा किल्ला म्हणजे गगनाला भिडलेला तो सर होईल हे बुध्दीला पटेना. पण ज्योतिषाने सांगितलेले भविष्य सहा दिवसांनी खरे ठरले. किल्ल्यावरील दारूगोळा, धान्य संपत आल्याने मराठ्यानी किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला पण महाबतखान महादरवाजावर निकराने मारा करत असल्याने त्याच्याकडे न जाता दाउदखानाकडे आपला दुत पाठवला. दाउदखानाने मराठ्यांना किल्ल्याबाहेर सुखरुप जाण्याचा मार्ग दिला आणि किल्ला ताब्यात घेतला. भीमसेन लिहतो या वाटाघाटी महाबतखानाच्या पश्चात झाल्याने त्याला भयंकर राग आला. महाबतखानबद्दल कोणीतरी बादशहाकडे चहाडी केली की तो आतून शिवाजीला सामील आहे. संशयी बादशहाने महाबतखानाला सप्टेंबर १६७१ मध्ये परत बोलावले. इ.स.१६८० मध्ये शिवरायांनी तंजावरला व्यंकाजीराजे यास पाठवलेल्या पत्रात ते लिहीतात राजश्री मोरोपंत त्या प्रांती पाठविले होते त्यांनी अहिवंत म्हणजे जैसा पन्हाळा त्याचेबरोबरी समतुल्य आहे दुसरा नाहवागड बागलाण दरम्यान आहे तो कठीण तोही घेतला. हे दोन किल्ले नामांकित पुरातन जागा कब्जात घेतल्या. इ.स. १८१८ मध्ये कर्नल प्रॉर्थर याने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकुन घेतला. कॅप्टन ब्रिग्ज याने १८१८ मध्ये अहिवंत किल्ल्याचे वर्णन विशाल आणि आकारहीन डोंगर असे केले असुन या किल्ल्यावर ५ मनुष्यांची शिबंदी असल्याचे लिहिले आहे. इ.स.१८२० मध्ये जनरल लेक ह्या किल्ल्याबद्दल लिहतो कि ह्या किल्ल्यांची नैसर्गिक तटबंदी इतकी आश्चर्यकारक आहे की मोठ्या परिश्रमाने आणि कौशल्यांने ती तयार केली आहे असे वाटते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!