अवसरीखुर्द
प्रकार : नगरकोट
जिल्हा : पुणे
उंची : 0
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मंचर शहरापासुन ५ कि.मी.अंतरावर अवसरी खुर्द नावाचे एक लहानसे गाव आहे. या गावात गढीसदृश्य काही बांधकाम असल्याचे आम्हाला मंचर शहराची भटकंती करताना कळल्याने आमची पाउले या गावाकडे वळली. अवसरी गावात प्रवेश करताना भैरवनाथ मंदिराजवळ आपल्याला दोन बुरुजात बांधलेले प्रवेशद्वार पहायला मिळते. या दरवाजाचे संपुर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. रस्त्याच्या मधोमध असलेले हे बांधकाम म्हणजे गढीचा दरवाजा कि गावाची वेस हे ठामपणे सांगता येत नाही. नगरकोट म्हणावा तर हा दरवाजा वगळता कोटाचे इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही व गढी म्हणावी तर आत कोणताही वाडा दिसुन येत नाही. या दरवाजाने आत शिरल्यावर डाव्या बाजुस नव्याने बांधलेले भैरवनाथाचे मंदिर असुन उजव्या बाजुस रामवाडा म्हणुन ओळखले जाणारे पेशवेकालीन राममंदीर आहे. रामवाडा म्हणुन ओळखला जाणारा हा वाडा राममंदीर असुन वेशीपासुन काही अंतरावर असलेले हे स्वतंत्र बांधकाम आहे.
...
या मंदिराभोवताली प्राकाराची भक्कम दगडी तटबंदी असुन दरवाजावर नगारखाना पहायला मिळतो. दरवाजातुन आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजुस बैठकीचा सोपा असुन मंदिराच्या आवारात मंदिराचे परंपरागत पुजारी बैरागी यांच्या घराण्यातील पाच महंतांच्या समाध्या आहेत. यातील एका समाधीवर महंत मानदास महाराज बैरागी सन १९०४ कोरलेला शिलालेख आहे. मंदिराची रचना सभामंडप गर्भगृह अशी दोन भागात केलेली असुन गाभाऱ्यात श्रीराम,लक्ष्मण,सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. मंदिरातील पाण्याच्या सोयीसाठी मंदीराच्या आवारातच विहीर आहे. बैरागी यांच्याकडून या मंदिरात प्रतिवर्षी रामजन्मोत्सवाचा उत्सव साजरा केला जातो. प्रतिवर्षी होणाऱ्या या नऊ दिवसांच्या उत्सवासाठी तसेच रोजची पूजा-अर्चा व नैवेद्य याच्या खर्चासाठी पेशव्यांनी बैराग्यांना करून दिलेली सनद श्री.सीताराम गिरिधारी बैरागी यांच्याकडे आहे. बैरागी यांना इनाम म्हणून मिळालेल्या २६ एकर माळरानावर आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उभे असल्याचे मंदीरातील पुजारी सांगतात. सरदार मल्हारराव होळकर यांच्या सैन्यात संताजी हैबतराव वाघ हे एक महत्वाची असामी होते. संताजी वाघ हे १७६१ च्या पानिपत युद्धात धारातीर्थी पडले. सन १७६५ मध्ये होळकरांकडून संताजी वाघ यांच्या वंशजांना महाराष्ट्रातील काठापूर(बुद्रुक), काठापूर(खुर्द), अवसरी(बुद्रुक) या गावांची जहागिरी देण्यात आली असा या गावाचा उल्लेख वाचनात येतो.
© Suresh Nimbalkar