अवचितगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : ९७४ फुट

श्रेणी : मध्यम

कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजूबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला किल्ला म्हणजे अवचितगड. नागोठणे बंदर ते सवाष्णी घाट या मार्गावर असलेल्या तळगड-घोसाळगड-बिरवाडी या संरक्षक दुर्ग साखळीतील एक महत्वाचा किल्ला. कुंडलिका खाडीच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा किल्ला त्याभोवती असलेल्या घनदाट जंगलामुळे दुर्गम झाला आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडे अलीबाग व पेण आहे तर दक्षिणेकडे रोहा व मुरुड तालुका आहे. रोहा तालुक्यात असलेल्या या गडावर जाण्यासाठी गडाच्या उत्तर व दक्षिण पायथ्याशी असलेल्या मेढा व पिंगळसाई या दोन्ही गावातून वाटा आहेत. पुढे या दोन्ही वाटा किल्ल्याच्या माचीखालील खिंडीत एकत्र येतात. पिंगळसई गाव रोह्याहुन ४ कि.मी.वर तर मेढा गाव ६ कि.मी अंतरावर आहे. या दोन्ही वाटांनी साधारण एका तासात आपण किल्ल्याखालील खिंडीत पोहोचतो. किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावातुन पुरेसे पाणी सोबत घेऊन आपली भटकंती सुरु करावी. ... खिंडीत आपल्याला काही विरगळ व झीज झालेली शिल्प पहायला मिळतात. खिंडीतुन १० मिनिटांचा उभा चढ चढुन आपण किल्ल्याच्या उध्वस्त पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. मुख्य दरवाजा व त्याच्या आसपासची बुरुज असलेली तटबंदी ढासळलेली असुन केवळ आतील दरवाजाची कमान आजही तग धरून उभी आहे. या ढासळलेल्या अवशेषात एक शरभ शिल्प पहायला मिळते. या दरवाजाने आत शिरल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. दरवाजासमोर एका मोठया वास्तुचा चौथरा असुन हि बहुदा गडाची सदर असावी. किल्ल्याचा दोन्ही बाजुनी निमुळता होत जाणारा माथा समुद्रसपाटीपासुन ९६५ फुट उंचावर असुन दक्षिणोत्तर ७ एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याच्या दोन्ही बाजुची टोके बुरुज बांधुन बंदिस्त केलेली असुन मध्यभागी असलेल्या लहानशा उंचवट्याला तटबंदी बांधुन त्याचे बालेकिल्ल्यात रुपांतर केले आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडे वळुन सर्वप्रथम उत्तरेकडील भाग पाहुन घ्यावा. या भागात असलेल्या उंचवट्यावर काही दगडी बांधकाम पहायला मिळते. गडाच्या उत्तर टोकावरील बुरुजाचे बांधकाम आजही काही प्रमाणात शिल्लक असुन बुरुजावर मध्यम आकाराची तोफ ठेवण्यात आली आहे. गडाचा हा भाग पाहुन झाल्यावर मागे फिरून दरवाजाकडे यावे. येथुन सरळ जाणारी वाट आपल्याला बालेकिल्ल्यात घेऊन जाते. या वाटेवर असलेला बालेकिल्ल्याचा दरवाजा पूर्णपणे नष्ट झाला असुन त्याचे अवशेष आसपास विखुरलेले आहेत. बालेकिल्ल्याचा बहुतांशी भाग हा येथील भल्या मोठया द्वादशकोनी आकारात बांधलेल्या तलावाने व्यापलेला आहे. शेवाळाने भरलेल्या या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. तलावाच्या पुढील भागात पत्र्याच्या निवाऱ्याखाली शंकराचे मंदिर असुन या मंदिरात शिवलिंग,गणपती व इतर काही देवतांच्या मूर्ती पहायला मिळतात. मंदिराच्या पुढील भागात एका उध्वस्त वास्तुचा चौथरा आहे. मंदिराच्या खालील बाजुस उतारावर कातळात कोरलेली पाण्याची सात लहानमोठी टाकी असुन यातील एका टाक्याच्या काठावर असलेल्या घुमटीत पिंगळाई देवीचे स्थान आहे. यातील एका टाक्यातील पाणी गाळून पिण्यायोग्य आहे. टाक्याजवळ तीन फुट उंचीचा एक स्तंभ असुन या स्तंभावर एका बाजुस श्री गणेशाय नम: शके १६२३ माघ अशी अक्षरे तर दुस-या बाजूस ढाल तलवार घेतलेल्या वीराचे अस्पष्ट शिल्प आहे. शिलालेखावर इ.स.१७०१ दर्शविणारा हा स्तंभ बाजी पासलकरचा स्मृतिस्तंभ म्हणून ओळखला जातो. टाक्याजवळ असलेल्या भिंतीला लागुन एक भग्न शिल्प ठेवलेले आहे. टाक्यांजवळील बालेकिल्ल्यांच्या तटबंदीतील कमानीखालून जाणारी वाट आपल्याला गडाच्या दक्षिण दिशेला घेऊन जाते. य वाटेने जाताना काही उध्वस्त घरांचे अवशेष पहायला मिळतात. गडाची दक्षिण बाजु तटाबुरुजांनी बंदीस्त केली असुन त्याच्या मध्यभागी टेहळणीसाठी बुरूज बांधलेला आहे. या बुरूजावर जाण्यासाठी तटबंदीला लागून पाय-या बांधलेल्या असुन या बुरुजावर एक चौरस फूट आकाराचा शिलालेख आहे. त्या बुरुजाच्या भिंतीत एक शिलालेख आहे. त्यांतील मजकूर असा : “श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा.” शके १७१८ म्हणजे इ.स. १७९६ साल. चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. याचा अर्थ पेशवेकाळात या दिवशी या बुरुजाची अथवा येथील भागाची बांधणी करण्यात आली असावी. या बुरुजावरुन नागोठणे खिंड, बिरवाडी किल्ला, कुंडलिका नदीचे खोरे इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. या तटबंदीच्या दोन्ही टोकावर असलेले बुरुज पुर्णपणे कोसळलेले असुन यातील दरवाजा केवळ आपले अस्तीत्व दर्शवीत आहे. या दरवाजाने बाहेर पडल्यावर आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकावर पोहोचतो. गडाचे दक्षिण टोक व त्यापुढे असलेला डोंगर यांच्यामध्ये खंदक खोदुन खंदका पलीकडचा डोंगर किल्ल्याच्या डोंगरापासुन वेगळा केलेला आहे. किल्ल्याचा हा भाग पाहुन झाल्यावर आल्यावाटेने मागे फिरावे. सात टाक्यांच्या समुहापासून थोडे पुढे आल्यावर डाव्या बाजुस तटबंदीला लागुनच एक चौकोनी आकाराची खोल विहीर पहायला मिळते. या विहिरीपासुन थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्यात प्रवेश करण्याचा तिसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या बाहेरील बाजुस मध्यम आकाराची अजून एक तोफ पहायला मिळते. तोफेच्या पुढील भागात दरीच्या काठावर कातळात कोरलेले पाण्याचे एक टाके पहायला मिळते. पावसाळा वगळता हे टाके कोरडेच असते. या टाक्याकडून उजवीकडे वळल्यावर आपण गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते.संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. गडावरून तैलबैला, सुधागड, सरसगड, घनगड, सुरगड, सवाष्णीचा घाट परिसर न्याहळता येतो. अवचितगडाचा किल्ला हा शिलाहारांच्या काळात लष्करी ठाणे म्हणून बांधला गेला असावा असे दिसते पण इतिहासात मात्र सतराव्या शतकापासून अवचितगडाचे उल्लेख येतात. निजामशाहीत सुभ्याचे ठिकाण असलेले हे ठिकाण शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत आदिलशहाच्या ताब्यात होते. शिवाजी महाराजांच्या सैन्याने इ.स. १६५८ साली किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. चौल-रेवदंड्याचे पोर्तुगीज व व जंजिऱ्याचा सिद्धी यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची लष्करीदृष्ट्या पुनर्बांधणी करण्यात आली. किल्ल्यावर असलेल्या एका शिल्पाचा संबंध मोसे खोऱ्यातील बाजी पासलकर यांच्याशी जोडला जातो. इंग्रजांबरोबर झालेल्या मराठ्यांच्या युद्धामध्ये कर्नल प्रॉथर याने हा किल्ला प्रोथेरने फेब्रुवारी १८१८ मध्ये जिंकून घेतला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!