अळकुटी

प्रकार : गढी

जिल्हा : अहमदनगर

उंची : 0

श्रेणी : सोपी

अहमदनगर जिल्ह्यातील आळे-पारनेर रस्त्यावर आळे फाट्यापासून २२ कि.मी.अंतरावर तर शिरूर पासुन ४२ कि.मी. अंतरावर अळकुटी हे ऐतिहासिक गाव आहे. अळकुटी गावास उत्तर व दक्षिण भागात दोन वेशी असून त्याला जोडून पूर्वी तटबंदी व आठ बुरूज होते असे स्थानिक सांगतात. या ऐतिहासिक खुणा आता नष्ट झाल्या आहेत. गावात सरदार कदमबांडे पाटील यांनी साधारण अठराव्या शतकात बांधलेली मजबुत किल्लेवजा गढी आहे. गढी आजही कदमबांडे पाटील यांच्या वंशजांच्या ताब्यात असुन गढीच्या आतील वाडयाची पुर्णपणे पडझड झाली आहे. गढीचे भव्य प्रवेशद्वार पुर्वाभिमुख असुन क्षेत्रफळ दिड एकरपेक्षा कमी आहे. याशिवाय गढीच्या पुर्वेला दुसरा लहान दरवाजा असुन सध्या तो विटांनी बंद करण्यात आला आहे. मुख्य दरवाजाच्या कमानीवर कमळपुष्पे व शरभशिल्पे कोरलेली असुन दरवाजा वरील भागात विटांनी बांधलेली सुंदर दुमजली इमारत आहे. दरवाजाच्या वरील भागात कधीकाळी नगारखाना अथवा मंडप असावा. ... मुख्य दरवाजाचे बांधकाम लालसर रंगाच्या दगडांनी केलेले असुन दरवाजाची लाकडी दारे मात्र काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. तटबंदीची उंची साधारण तीस फुट असुन तटबंदीचा खालचा १५ फुटांचा भाग घडीव दगडांचा तर वरील १५ फुटांचा भाग विटांनी बांधलेला आहे. तटबंदीची रुंदी ८ फुट असुन संपुर्ण तटबंदी व बुरुजाच्या वरील भागात चर्या बांधलेल्या आहेत. गढीचा आकार चौकोनी असुन गढीच्या चार टोकांना चार दुमजली बुरुज आहेत. तटबंदीत बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या आहेत. गढीच्या दरवाजातून आत शिरल्यावर आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन समोरच चौसोपी वाड्याचे अवशेष दिसतात. यातील एका जोत्यावर एक सोपा आजही उभा असुन त्याच्या तुळयांच्या बाहेरील भागावर कोरीवकाम केलेले आहे. कदमबांडे यांच्या वाड्यात राहणाऱ्या वंशजांकडून वाड्याचे भुतकाळातील भव्यतेचे वर्णन ऐकायला मिळते. वाड्यात २५ x २५ आकाराचे तळघर आहे. गढीच्या मध्यभागी एक ४०-५० फुट खोल व ५-६ फुट रुंद अशी एक विटांनी बांधलेली विहीर असुन या विहिरीचे पाणी त्या काळी पाटाने गढीत व खापरी नळाने संपुर्ण वाड्यात फिरवले होते. या खापरी नळाचे अवशेष आजही पहायला मिळतात. विहिरीच्या समोरील बाजूस एक दगडी ढोणी व चुन्याचा घाना दिसुन येतो. या घाण्याचे चाक गढीच्या बाहेर मुख्य दरवाजाशेजारी आहे. मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी आतील बाजुने डावी व उजवीकडून जिने आहेत यातील डाव्या बाजुचा जिना बुजवलेला आहे. उजव्या बाजुच्या जिन्याने तटावर आले असता गढीचा आतील भाग व आजुबाजुचा प्रदेश नजरेस पडतो. तटबंदीची फांजी दगडांनी बांधुन काढलेली असुन संपुर्ण गढीची तटबंदी सुस्थितीत आहे व तटबंदीवरून संपुर्ण गढीला फेरी मारता येते. यातील आग्नेय दिशेच्या बुरुजातील पाय-या सुस्थितीत असुन त्याच्या वरील बांधकामात खळगा दिसुन येतो. हि बहुदा निशाण फडकविण्याची जागा असावी. इतर तीन बुरुजांच्या आतील भागाची मोठया प्रमाणात पडझड झाली आहे. गढीच्या आतील भागातील वास्तू मोठया प्रमाणात पडझड झाल्याने मातीखाली गाडल्या गेल्या आहेत. संपुर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो. गढीच्या बाहेर कमळाजी कदमबांडे यांनी इ.स.१७५० मध्ये बांधलेले शिवमंदीर आहे. सातवाहन काळी कल्याण-नाणेघाट-जुन्नर-पैठण असा वाहतुकीचा मार्ग होता. अळकुटी हे त्या मार्गावरील महत्त्वाचे ठाणे. अंबरिष ऋषींची तपोभूमी म्हणून या गावाचे पूर्वीचे नाव अमरापूर होते. इ.स.दुस-या व तिस-या शतकात या भागात कपड्याचा व्यापार चाले. संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे आळंदीस जाताना अमरापूर येथे थांबल्याचा उल्लेख आढळतो. पुढे हे गाव आवळकंठी म्हणून ओळखले जाऊ लागले. ब्रिटिशांनी उच्चारण्यास सोपे म्हणून त्याचे नाव अळकुटी केले. शहाजीराजे भोसले आणि कृष्णाजी व व्यंकोजी कदमबांडे हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते. निजामशाहीचा अस्त झाल्यावर कदमबांडे मोघलांचे जहागीरदार झाले व मोगल सत्तेकडून स्वत:चे पायदळ आणि घोडदळ बाळगून अळकुटी गावी जहागीरदार म्हणून कारभार पाहू लागले. छत्रपती शाहुमहाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर अमृतराव कदमबांडे त्याना मिळाले. त्यानंतर अमृतराव व कांताजी यांनी गुजरात स्वारीतून प्रचंड धन प्राप्त केले. मल्हारराव होळकर हे सरदार कांताजी कदमबांडे यांच्या घोडदळात होते आणि तेथून त्यांच्या पराक्रमाचा उदय झाला. बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत गुजरात मोहिमेतील पराक्रमाबद्दल सरदार कांताजी कदमबांडे यांना धुळे, रनाळा, कोपर्ली, तोरखेड भाग जहागिरी म्हणून मिळाला. त्यांचे पराक्रमी बंधू रघोजीराव हे कांताजीपुत्र मल्हारराव सोबत तोरखेडला स्थायिक झाले तर त्यांचा दुसरा पुत्र कमळाजी हा अळकुटी येथे राहिला. शाहुराजांनी मल्हारराव यांच्यासोबत त्यांची कन्या गजराबाई हिचे लग्न लावून दिले आणि भोसले-कदमबांडे यांची सोयरीक झाली. कमळाजी यांनी खर्ड्याच्या लढाईत पराक्रम गाजवला. त्यांनी इ.स.१७५० मध्ये वाड्याजवळ सुंदर शिवमंदिर बांधले. त्यात देवनागरीत खालीलप्रमाणे शिलालेख आहे.– श्री सीवचरणी दृढभाव कमळाजी सुत रघोजी कदमराव पाटील मोकादम मौजे अमरापूर ऊर्फ आवळकंठी प्रगणे कर्डे सरकार जुन्नर शके १६७२ श्री मुखनाम संवत्सरे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा र _ _ __ _ _शुभं भवतु . असे हे वैभवशाली इतिहास लाभलेले अळकुटी गड-किल्ले पाहणाऱ्यांना फारसे परिचित नाही मात्र इतिहासातील अनेक नोंदी अळकुटी गावावर असल्याने एकदा तरी त्याला भेट द्यायलाच हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!