अलंग

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नगर

उंची : ३९१५ फुट

श्रेणी : अत्यंत कठीण

महाराष्ट्राला राकट देशा,कणखर देशा, दगडांच्या देशा का म्हणतात याचा अनुभव घ्यायचा असेल असेल तर सह्याद्रीमधील AMK म्हणजेच अलंग-मदन-कुलंग या नावाने प्रसिध्द असलेली भटकंती करायलाच हवी. (अलीकडे या भागातील भटकंतीचा काही धंदेवाईक लोकांनी बाजार मांडला आहे हि गोष्ट खेदाने येथे नमूद करावीशी वाटते ) नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत हे तीन किल्ले अगदी कळसुबाईच्या शेजारी उभे आहेत. भटकंतीचा थरार अनुभवायला लावणारे हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे. गिर्यारोहणाच्या क्षेत्रात हि भटकंती महाराष्ट्रातील कठीण भटकंतीपैकी एक म्हणुन गणली जाते. हि भटकंती तीन किल्ल्याची म्हणुन गणली जात असली तरी आपली आजची भटकंती मात्र अलंग गडापुरती मर्यादीत आहे. ... अलंगगडावर जाण्यासाठी आंबेवाडी-उडदवणे अशा दोन वाटा असल्या तरी आंबेवाडी गावातून जाणारी वाट अलंग व मदन या दोन्ही गडाकडे जाणारी असुन तुलनेने कमी वेळ घेणारी आहे मात्र गिर्यारोहण साहित्य व प्रस्तरारोहण तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. अलंग किल्ल्यावर जाण्यासाठी कसारा- इगतपुरी-घोटी-पिंपळनेर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस.टी. सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ किमी चे अंतर आहे. घोटीवरुन पहाटे आंबेवाडी ला ६.०० वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग, मदन आणि कुलंग या तीन किल्ल्याचे दर्शन उरात धडकी भरवतात. गावातून अलंग आणि मदन किल्ल्याच्या खिंडीपर्यंत जाण्यासाठी ३ तास लागतात. या वाटेने जाताना काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या असुन वाटेत एका ठिकाणी शिळेवर वनदेवता शिल्प व त्या शेजारी त्रिशूळ कोरलेले आहे. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला, तर उजवीकडचा मदन किल्ला. उडदवणे मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी घोटी- भंडारदरा मार्गे घाटघरला जावे. तेथुन उडदवणे मार्गे १ तासात आपण किल्ल्याखालच्या पठारावर पोहचतो. येथून अलंगचा कडा डावीकडे ठेवत १ तासात आपण किल्ल्यावरून येणाऱ्या तिसर्याु घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी येतो. या बेचक्यातून थोडे वर गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण करावे लागले. पुढे थोडी सपाटी पार केल्यानंतर दगड पडुन बंद झालेला गडाचा मुख्य दरवाजा समोर येतो. या दरवाजाच्या शेजारून वर जावे लागते. येथुन डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. या वाटेने तासाभरात आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. या वाटेने पायथ्यापासुन गुहेपर्यंत येण्यास ६ तास लागतात. आंबेवाडीमार्गे जाताना खिंडीतून डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सर्वप्रथम एका गुहा सामोरी येते. या गुहेशेजारी कातळात कोरलेले पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. या गुहेच्या पुढील भागात २५ फुटाचे सोपे प्रस्तरारोहण केल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर एक ५० ते ६० फूटाचा सरळसोट तुटलेला कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करू नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ५ तास लागतात. कातळकडा चढून आपला कड्यावरील गुहेत प्रवेश होतो. येथुन पुढे कातळात कोरलेल्या धोकादायक पायऱ्या पार करून आपण गडाच्या माचीवर पोहोचतो. गडाची माची म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. माथ्यावर आल्यावर समोर बालेकिल्ल्याच्या पोटात खोदलेल्या दोन गुहा तर उजवीकडे मदन व कुलंग नजरेस पडतात. उजवीकडे मदनच्या दिशेने असलेल्या पठारावर फेरी मारली असता काही तुरळक अवशेष व एक मोठ्या वास्तूचा चौथरा पहायला मिळतो. येथुन गुहेकडे जाताना वाटेत पडक्या भिंतीच्या आडोशाने ठेवलेले एक शिवलिंग व त्यापुढे पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्या पार करून आपण गुहेजवळ पोहोचतो. या दोन गुहेत ३० ते ४० जणांची राहण्याची सोय होते. गुहांच्या शेजारी पाण्याच्या टाक्या आहेत पण त्यातील पाणी मात्र शेवाळलेले आहे. गुहेच्या डावीकडे असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढुन आपण गुहेच्या वरील भागात असलेल्या बालेकिल्ल्यावर पोहोचतो. वर आल्यावर सर्वप्रथम बालेकिल्ल्याचा डावीकडील भाग पाहुन घ्यावा. या भागात मोठ्या प्रमाणात असलेले घरांचे उध्वस्त अवशेष पहाता गडावरील मुख्य वस्ती याच भागात असावी. या ठिकाणी उतारावर कातळात कोरलेला ११ टाक्यांचा समूह असुन ही टाकी भरल्यावर यातुन ओसंडणारे पाणी अडविण्यासाठी पुढे आडवी भिंत घातलेली आहे. यातील एका टाक्यावर झीज झालेला शिलालेख आहे. बालेकिल्ल्याच्या उजवीकडील भागात घडीव दगडात बांधलेली एका मोठी इमारत आजही तिच्या भिंतीसह उभी आहे. हि बहुदा गडाची सदर असावी. साधारण २० फुट उंच व ५० फुट लांब असलेली हि इमारत मदन व अलंग किल्ल्यावरून देखील सहजपणे दिसून येते. या इमारतीच्या पुढील भागात पाण्याने भरलेली काही टाकी पहायला मिळतात. या टाक्यांच्या आसपास काही वास्तूंचे अवशेष विखुरलेले आहेत. पुढे कळसुबाईच्या दिशेने गेल्यास उतारावर एक पडके शिवमंदिर व जवळच एक मराठी भाषेतील एक शिलालेख आहे. येथुन पुढे किल्ल्याच्या टोकावर जाताना काही घरांचे अवशेष व कातळात कोरलेली पण माती पडुन बुजून गेलेली पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याच्या टोकावर एक छोटेसे उध्वस्त मंदिर आहे. किल्ल्यावरून पूर्वेला कळसूबाई,औंढा,पट्टा, बितनगड,उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबा, खुट्टा सुळका , रतनगड, कात्राबाईचा डोंगर इतका दूरवरचा परिसर दिसतो. किल्ला फिरण्यासाठी पूर्ण दिवस जात असल्याने गडावर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी गड उतरणे सोयीचे ठरते. किल्ल्यावरील गुहा,पाण्याची टाकी यावरून हे किल्ले फार प्राचीन म्हणजे सातवाहन काळापासुनच असावेत पण यांचा उल्लेख मिळतो तो इ.स.१६७०च्या सुमारास. कांचनबारीच्या लढाईनंतर मराठ्यांनी केलेल्या धडक मोहीमेत जे किल्ले काबीज केले त्यात अलंग-कुलंग-त्रिंगलवाडीचा उल्लेख सापडतो. इ.स.१८१८ मध्ये शेवटच्या इंग्रज मराठे युद्धात उभ्या कड्यात खोदलेल्या पायऱ्यांचा मार्ग कर्नल मक्डोवेल याने या पायऱ्यांवर सुरुंग पेरून व तोफा डागून तो नष्ट करून टाकला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!