अमदाबाद
प्रकार : गढी
जिल्हा : पुणे
उंची : 0
पुणे नगर जिल्ह्यांची भटकंती करताना या दोन्ही जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आपल्याला अनेक गढ्या पहायला मिळतात. यातील काही गढ्या परीचीत तर काही गढ्या पुर्णपणे अपरिचित आहेत. उत्तर हिंदुस्थानाच्या माळवा प्रांतातील परमार ऊर्फ पवार हे रजपुत घराणे शिवकाळापुर्वी दक्षिणेत आले. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर देखील या घराण्याच्या अनेक गढी व वाडे आहेत. काळाच्या ओघात नष्ट होऊ घातलेली अशीच एक पवारांची गढी आपल्याला पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या अमदाबाद गावात पहायला मिळते. अमदाबाद गाव शिरूर या तालुक्याच्या ठिकाणाहुन १४ कि.मी.अंतरावर तर पुणे शहरापासुन ६० कि.मी.अंतरावर आहे. गावात गढी कोणाला फारशी माहित नसल्याने आपण नदीकाठचे समाधी मंदिर विचारले असता सहजपणे या गढी जवळ येऊन पोहोचतो. येथे नदीकाठी १० फुट उंचीच्या घडीव दगडात बांधलेल्या दोन चौकोनी चौथऱ्यावर दोन समाधी आहेत. यातील एक समाधी अष्टकोनी आकाराची तर दुसरी समाधी चौकोनी आकाराची आहे. चौकोनी आकाराची समाधी हुबेहुब सिंहगडावरील राजाराम महाराजांच्या संमाधीसारखी असुन समाधीच्या चौथऱ्यावर कमळाची फुले कोरलेली आहेत. दोन्ही समाधी चौथऱ्यावर जाण्यासाठी घडीव दगडात बांधलेल्या पायऱ्या असुन चौथऱ्यावरून समाधीस्थानाला फेरी मारता येते.
...
यातील एका समाधीच्या आतील बाजुस शिवलिंग स्थापन केलेले असुन दुसरी समाधी मोकळी आहे. अष्टकोनी आकाराच्या समाधी शेजारी महादेवाचे मंदिर असुन दोन्ही समाधीच्या मागील बाजुस नदीचा घाट आहे. या दोन्ही समाधीचा आकार व घडण पाहता या कुणी मोठ्या सरदार घराण्याच्या समाधी असाव्यात हे सहजपणे लक्षात येते. या घाटाच्या वरील बाजुस गढीची भिंत व त्यातील दरवाजा आपल्याला खुणावतो पण सर्व प्रथम आपण नदीचा घाट पाहुन घेऊ. नदीचा घाट चागलाच प्रशस्त असुन घाटावर पाणी पिण्यासाठी विहीर बांधलेली आहे. घाटाच्या वरील बाजुस तटाला लागून पुजाविधी करण्यासाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. या ओवऱ्याशेजारी घडीव दगडात बांधलेली विहीर असुन या विहिरीवर असलेले रहाटाचे दगडी खांब पहाता येथुन गढीला पाणीपुरवठा केला जात असावा. नदीच्या दिशेला पायऱ्यांच्या तळाशी दोन गोलाकार बुरुज असुन या दोन्ही बुरुजात घोड्यांची दगडी मुखे बसवलेली आहे. या बुरुजातील चौकोनी कोनाड्यात श्री गणेशाची स्थापना केलेली आहे. नदीचा घाट पाहुन झाल्यावर आपला मोर्चा गढीच्या दरवाजाकडे वळवावा. चौकोनी आकाराची हि गढी पावणे दोन एकरवर पसरलेली असुन गढीच्या चार टोकास चार गोलाकार बुरुज आहेत. यातील दोन बुरुजाच्या आत कोठारासारखी दालने आहेत. गढीचा दरवाजा तटबंदीच्या मध्यभागी उत्तरदिशेला बांधलेला असुन त्याची कमान आजही चांगल्या अवस्थेत आहे. दरवाजावरील अवशेष पहाता या दरवाजाच्या वरील भागात देखील बांधकाम असल्याचे दिसुन येते. गढीची तटबंदी घडीव दगडात बांधलेली असुन आठ ते दहा फुट उंच आहे पण काही ठिकाणी तटाची पडझड झालेली आहे.गढीच्या आतील भागात शेती केली जात असल्याने आतील अवशेष पुर्णपणे नामशेष झालेले आहेत. शिल्लक असलेल्या तटावरून फेरी मारताच आपली गढीची भटकंती पुर्ण होते. नदीकडील हे अवशेष वगळता गावजवळ आपल्याला अजून एक समाधी व चुन्याच्या घाण्याचे चाक पहायला मिळते. नदीकाठच्या रम्य परिसरावर वसलेल्या या गढीला एकदा अवश्य भेट दयायला हवी. मध्य भारतातील माळवा प्रांतात असलेले परमार घराण्याचे राज्य इ.स.१३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर लयास गेल्यावर धारच्या परमार घराण्याचे वंशज निरनिराळ्या प्रांतात जाऊन स्थायिक झाले. त्यातील एक शाखा महाराष्ट्रात आली व पवार म्हणुन उदयास पावली. प्राचीन राजधानी धार येथून आल्यामुळे हे घराणे धार पवार म्हणून इतिहासात प्रसिद्धिस आले. शंभूसिंग परमार ऊर्फ साबूसिंग पवार यांना या घराण्याचे मूळ पुरुष मानले जाते. इ.स.१६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली त्यावेळी साबुसिंग पवार महाराजांसोबत होते. साबुसिंग यांना कृष्णाजी नावाचा पुत्र होता. महाराजांनी विजापूरकरांच्या मुलखावर केलेल्या स्वाऱ्यात कृष्णाजी पवार सामील होते. अफझल खानच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजलखान ह्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत कृष्णाजी पवार यांचे नाव पुढे येते. कृष्णाजी पवारांच्या मृत्युनंतर त्यांचे तीन पुत्र बुबाजी, रायाजी व केरोजी शिवाजी महाराजांच्या सेनेत सामील झाले. बुवाजी पवार यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मुलुखाचा बंदोबस्त करताना लढाया करून अनेक बंडे मोडून काढली. राजाराम महाराजांनी टाकलेल्या विश्वासामुळे बुबाजी व केरोजी यांच्या फौजानी मोगलांच्या वऱ्हाड आणि गंगाथडी मुलखात घौडदौड करून चौथाई वसुल करत मोगल फौजेस हैराण करून सोडले व मराठ्यांचा दरारा वाढवला. या कामगिरीमुळे राजाराम महाराजानी जिंजीहून महाराष्ट्रात परत आल्यावर बुबाजीस विश्वासराव हा किताब व सरंजाम तर केरोजीस सेना सेनाबारासहस्त्री हि पदवी व वस्त्रे दिली. मलठण, सुपे, कवठे यमाई, आमदाबाद, हिंगणी, गणेगाव, चितेगाव, नगरदेवळे हि गावे त्यांना सरंजामी वतने होती. यातील पवारांचे एक वंशज बळवंतराव पवार हे अमदाबाद येथे वास्तव्यास होते. त्यांनी गावात घोड नदीला घाट तसेच रहाण्यासाठी नदीच्या काठावर किल्लेवजा गढी बांधली. छत्रपती राजाराम महाराजांनी दिलेल्या विश्वासराईच्या सरंजामाच्या वाटणीत बळवंतराव पवार अमदाबादकर यांचा उल्लेख येतो.
© Suresh Nimbalkar