अभोणा

प्रकार : गढी

जिल्हा : नाशिक

उंची : 0

श्रेणी : सोपी

महाराष्ट्रातील सर्वात जास्त किल्ले असणारा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. या जिल्ह्यात आपल्याला बलदंड अशा दुर्गासोबत काही लहानमोठ्या गढी देखील पहायला मिळतात. यातील काही गढी काळाच्या ओघात नष्ट झाल्या असुन काही गढी आपल्या अंगावर उरलेसुरले अवशेष सांभाळत काळाशी झुंजत आहेत. बागलाण प्रांताची भटकंती करताना आपल्याला अभोणा येथे ठोके राणीची गढी म्हणुन ओळखली जाणारी एक गढी पहायला मिळते. हि ठोके राणी म्हणजे नक्की कोण हे सहजपणे लक्षात येत नाही पण इतिहासाची पाने चाळली असता हि ठोके राणी म्हणजे अभोणा गावचे देशमुख ठोके यांची कन्या सरसेनापती उमाबाई दाभाडे. पेशवाईत महीला सरसेनापती उमाबाई खंडेराव दाभाडे यांनी गाजवलेल्या पराक्रमाने त्यांच्या माहेराला म्हणजे अभोणा गावाला एक ओळख मिळालीआहे. अभोणा गाव नाशिकपासून ६० कि.मी.अंतरावर असुन कळवण या तालुक्याच्या ठिकाणाहुन १४ कि.मी.अंतरावर आहे. नाशिकहून सप्तश्रृंगीकडे जाताना नांदुरी गावातुन अभोणा गावाकडे जाणारा फाटा लागतो.मध्ययुगीन काळात गिरणा नदीच्या काठावर वसलेले अभोणा ही या भागासाठी बाजारपेठ होती. ठोके यांची गढी गावात लोकांना माहित असल्याने आपण सहजतेने या गढीजवळ पोहोचतो. ... हि गढी थेट नदीच्या काठावर असल्याने नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्याने या गढीचे बहुतांशी नुकसान केले आहे व उरलेली कसर स्थानिकांनी भरून काढलेली आहे. आज गढीची केवळ नदीच्या दिशेला असलेली तटबंदी शिल्लक असुन त्यातील एकमेव बुरुज शिल्लक आहे. हा बुरुज बऱ्यापैकी उंच असुन या बुरुजावरून संपुर्ण गढी व दूरवर पसरलेले गिरणा नदीचे पात्र नजरेस पडते. महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व नैसर्गिक व मानवी आपत्तींना तोंड देत गढीचा दरवाजा व त्याचे बांधकाम आजही चांगल्या स्थितीत आहे. या दरवाजाची उंची साधारण २५ फुट असुन कमानीची उंची १५ फुट आहे. उत्तराभिमुख असलेल्या या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या असुन दरवाजावर मोठ्या प्रमाणात कोरीव काम केलेले दगड आहेत. गढीच्या या दरवाजा वरून आपल्याला गढीच्या आकाराची व तटबंदीच्या उंचीची कल्पना येते. गढीच्या बाहेरील बाजुस हनुमानाचे मंदिर असुन या मंदिराच्या आवारात पाच समाधी चौथरे आहेत. या शिवाय गिरणा नदीपात्रात मध्ययुगीन काळात बांधलेली एक दगडी वास्तु असुन हि वास्तु सतीचा डोह म्हणुन ओळखली जाते.हि वास्तु म्हणजे एक रुंद दगडी भिंत असुन या भिंतीच्या दोन्ही बाजुस बुरुजासारखे गोलाकार बांधकाम केलेले आहे. या भिंतीत सहा कोनाडे असुन त्यात गणपती व इतर देवतांच्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. हे बहुदा सतीदहनाचे ठिकाण असावे. गढीच्या मागील बाजूला नदी काठावरच गिर्जेश्वर महादेव मंदिर व त्यापुढे गोपालकृष्ण मंदिर आहे. याशिवाय गावात दोन बारवा आहेत पण उपसा व देखरेखीअभावी त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. गढी व आसपासचा परीसर पहाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. ठोके यांचे वंशज गावातच रहायला असुन त्यांच्याकडे सोन्याची मूठ असलेली तलवार असल्याचे ऐकण्यात आले पण वेळेअभावी आम्हाला तेथे जाता आले नाही. ठोकें यांचे पूर्वीचे वैभव आज नसले तरी त्यांना मिळणारा मान मात्र कायम आहे. गावात होळीचा कार्यक्रम ठोके यांच्या घरातील होलीका पूजनानंतरच सुरू होतो. ठोकेंच्या घरातील देवीच्या मूर्तीची दसऱ्याला दरवर्षी मिरवणूक काढली जाते. उमाबाईंनी दाभाडे व ठोके देशमुख घराण्याचा इतिहास अनुभवण्यासाठी अभोण्याची सफर एकदा करायलाच हवी. पेशवेदप्तरातील ठोके घराण्याच्या कागपत्रांवरून या घराण्याचे पेठ संस्थानचे लक्षधीर राजे, बाजी आटोळे, सिन्नरचे देशमुख, कुंवर बहाद्दर, मुदोनकर भावसिंग ठोके यांच्याशी आप्त संबंध असल्याचे दिसते. ठोके यांना अभोणा व आसपासच्या १८ गावांची वतनदारी मिळाली होती. अभोण्याचे देवराव व हरिसिंग ठोके हे दोन सरदार तळेगावच्या खंडेराव दाभाडेंचे विश्वासू होते. अभोण्याच्या ठोके घराण्यातील ३ मुली दाभाडे घराण्यात दिल्या होत्या. यात सेनापती दाभाडेंचा तीन नंबरचा मुलगा सेनाखासखेल सवाई बाबुराव दाभाडे यांची एक पत्नी ही हरिसिंग ठोके यांची बहीण अभोणकर ठोके घराण्यातील होती. तर सेनापती यशवंतराव (दुसरा दत्तक) याची पत्नी लक्ष्मीबाई ही हरिसिंग ठोकेंची मुलगी होती. इ.स. १७०४ मध्ये अभोण्याच्या देवराव ठोकेंची मुलगी उमाबाई छत्रपती शाहूंचे सरसेनापती खंडेराव दाभाडेंच्या घरात सून म्हणून गेली. खंडेरावांच्या निधनानंतर उमाबाईंचा मुलगा त्रिंबकरावांकडे सरसेनापतिपद शाहूंनी सोपविले. मात्र गुजरातच्या सुभ्यावरून त्रिंबकराव व बाजीराव पेशवे यांच्यात संघर्ष झाला. यावर मात करण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी उमाबाईंच्या माहेरकडचे दलपतराव ठोके,भावसिंगराव ठोके, बजाजी आटोळे, कवडे व सिन्नरचे देशमुख, कुंवर बहादुर यांच्यासह ठोकेंच्या सर्व जवळच्या मंडळींना फोडून आपल्या पक्षात सामील केले. २५ नोव्हेंबर १७३० रोजी भावसिंग ठोके याला बाजीरावांनी सरंजाम व कुंवर बहादुर याला वस्त्रे दिली. निजामाची चाकरी सोडून बाजीरावांच्या पदरी आलेल्या भावसिंग ठोकेने बागलाण परिसरात धुमाकूळ घालायला सुरूवात केली. यावर निजामाने शाहुना पत्र लिहीत भावसिंग ठोके यांना मराठ्यांच्या चाकरीत ठेवू नये अशी विनंती केली. निजामाची मर्जी राखावी म्हणून छत्रपती शाहूंनी पेशव्यांना भावसिंग ठोके यास चाकरीत ठेवू नये असे सुचवले पण तसे घडले नाही. अंतर्गत वादातून झालेल्या डभईच्या युद्धात १ एप्रिल १७३१ मध्ये पेशव्यांच्या पदरी असलेल्या भावसिंगराव ठोकेने सेनापती त्रिंबकरावांवर बारगिरास सांगून गोळी झाडली. यात त्रिंबकरावांचा मृत्यू झाला अन्‌ येथूनच हरिसिंग ठोकेंची मुलगी उमाबाईं यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्रिंबकरांवांच्या मृत्युने उमाबाई दुखावल्या पण या प्रकरणात बाजीराव पेशव्यांना माफी देण्यासाठी शाहूमहाराज स्वत: पेशव्यांना घेऊन तळेगावास आले. छत्रपती स्वत: आल्याने उमाबाईंना पेशव्यांना माफ करावे लागले. त्यानंतर छत्रपती शाहूंनी त्रिंबकरावांचा लहान भाऊ यशवंतराव यांना सरसेनापतिपद तर धाकटा बाबुराव याला सेनाखासखेल हे पद दिले. मात्र हे दोघे अल्पवयीन असल्याने सरसेनापती व सेनाखासखेल या दोन्ही पदांची धुरा उमाबाईंच्या हाती आली. त्यांच्या कामगिरीवर खूश होऊन छत्रपती शाहू महाराज यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून त्यांना पायात सोन्याचे तोडे घालण्याचा मान दिला. शाहू महाराजांच्या निधनानंतर उमाबाई दाभाडे कोल्हापूरच्या राणी ताराबाईं सोबत गेल्या. उमाबाई,ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला. १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदैत ठेवली पण उमाबाईंनी पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले. उमाबाईंची तब्येत नंतरच्या काळात खालावली. २८ नोव्हेंबर १७५३ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. उमाबाईं दाभाडे यांनी सप्तश्रृंगी देवीच्या गडावरील पायऱ्या बांधल्याची नोंद इतिहासात मिळते. इतिहास संदर्भ- रमेश पडवळ,अभोणा
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!