अनंतपुर
प्रकार : भुईकोट
जिल्हा : बेळगाव
उंची : 0
श्रेणी : सोपी
अनंतपुर हे बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात असलेले छोटेसे शहर. सध्या कर्नाटकात असलेला हा भाग कधीकाळी जत संस्थानात सामाविष्ट होता. स्वतंत्रपुर्व काळात जत हे एक स्वतंत्र संस्थान होते. या संस्थाना अंतर्गत जत व डफळापूर, अनंतपुर, उमराणी यासारखी लहानमोठी शहरे आणि ११७ खेडी समाविष्ट होती. जत व आसपासच्या परिसराचा इतिहास म्हणजे जत संस्थानाचे राजे डफळे सरदार यांचा इतिहास. डफळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी १६८०च्या सुमारास आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले. प्रशासकीय कारभारासाठी त्यांनी संस्थानात काही गढ्या व छोटे किल्ले बांधले. सतराव्या शतकात जत शहरापासुनकाही अंतरावर असलेल्या अनंतपुर गावात त्यांनी एक भक्कम व मजबुत असा भुईकोट बांधल्याचे सांगीतले जाते.
...
अनंतपुर किल्ला जत या संस्थानाच्या राजधानी पासुन २६ कि.मी.अंतरावर तर उमराणी व डफळापूर या संस्थानातील महत्वाच्या ठिकाणापासुन अनुक्रमे २२ व १० कि.मी. अंतरावर आहे. संस्थानाच्या मध्यवर्ती भागात असलेला हा किल्ला संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्वाचा असल्याने संपुर्ण किल्ल्याभोवती खंदक खोदुन त्याला अधिक मजबुत करण्यात आले. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेला हा किल्ला सांगली-सलमलगेवाडी महामार्गावर सांगली पासुन ६० कि.मी.वर तर महाराष्ट्र सीमेपासुन केवळ ३ कि.मी.अंतरावर आहे. डफळापूरहुन अनंतपुर गावाकडे जाताना अनंतपुर गाव येण्यापुर्वीच किल्ल्याचे मोठमोठे गोलाकार आकाराचे बुरुज आपले लक्ष वेधुन घेतात. खाजगी वाहन असल्यास अनंतपुर गावाबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीकडून आपल्याला थेट खंदकापर्यंत जाता येते. कधीकाळी आत व बाहेर असा दोन्ही बाजुंनी बांधुन काढलेला हा खंदक आज मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. या खंदकात उतरूनच किल्ल्याच्या तटबंदीला वळसा घालत मुख्य दरवाजाकडे जाणारा मार्ग आहे . हा मार्ग किल्ल्यावरून पुर्णपणे माराच्या टप्प्यात आहे. या वाटेसमोरच किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज असुन या बुरुजावरून किल्ल्याच्या वाटेवर, मुख्य दरवाजावर तसेच संपुर्ण किल्ल्याच्या अंतर्गत भागात लक्ष ठेवता येते. चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण ५ एकर परिसरात पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत एकुण ९ बुरुज आहेत. या बुरुजांची व तटबंदीची रचना वैशिष्टपुर्ण आहे. चार टोकाला चार मोठे बुरुज असुन या दोन बुरुजांच्या मध्यभागी प्रत्येकी एक लहान बुरुज आहे. साधारणपणे दोन बुरुजांना जोडणारी तटबंदी हो एका सरळ रेषेत असते पण येथे मात्र किल्ल्याची तटबंदी गोलाकार असुन मोठ्या बुरुजाच्या मध्यावर असलेले चार लहान बुरुज अंतर्गत भागात जोडुन आत बालेकिल्ला बांधण्यात आला आहे. बालेकिल्ल्यातील एका लहान बुरुजाशेजारी खंदकात दुसरा लहान बुरुज बांधुन या दोन बुरुजामध्ये किल्ल्याचा मुख्य दरवाजा बांधण्यात आला आहे. खंदकात उतरणाऱ्या या वाटेच्या सुरवातीस असणारा दरवाजा पुर्णपणे कोसळला असुन आज त्याचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. या वाटेने आपण किल्ल्याच्या पुर्वाभिमुख मुख्य दरवाजात पोहोचतो. दोन बुरुजामध्ये असलेला किल्ल्याचा हा दरवाजा घडीव दगडांनी बांधलेला असुन फांजीवरील बांधकाम मात्र विटांनी केले आहे. दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजुस फुलांची नक्षी असुन आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांना बसण्यासाठी बैठक व राहण्यासाठी देवड्या आहेत. या दरवाजातून तटबंदीला वळसा घालत आपण बालेकिल्ल्याच्या पश्चिमाभिमुख दरवाजात पोहोचतो. या दरवाजाची केवळ कमान शिल्लक असुन आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. बालेकिल्ल्यात एका चौसोपी वाड्याचा घडीव दगडात बांधलेला चौथरा असुन या चौथऱ्यावर समाधीवजा लहान शिवमंदिर आहे. हे मंदीर आपल्याला सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीची आठवण करून देते. वाडयाच्या आवारात चौकोनी आकाराची एक बांधीव विहीर पहायला मिळते. किल्ल्यात फिरताना अजुन एक खोल विहीर तसेच काही वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याच्या दरवाजाचे व सर्व बुरुजाचे बांधकाम ओबडधोबड दगडांनी चुन्यामध्ये केले असले तरी रचीव तटबंदीचे बांधकाम मात्र पांढऱ्या मातीमध्ये केले आहे. हि तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळली असल्याने संपुर्ण किल्लाभर पांढरी माती पसरली आहे. किल्ल्यातील सर्वात उंच बुरुजावर जाण्यासाठी गोलाकार मार्ग असुन बुरुजात शिरण्यासाठी दरवाजा आहे. या बुरुजावर ध्वज उभारण्यासाठी तसेच तोफ ठेवण्यासाठी गोलाकार कठडा बांधलेला दिसुन येतो. इतर तीन बुरुजावर देखील अशीच रचना असावी पण बुरुजाची पडझड झाल्याने काळाच्या ओघात ती नामशेष झाली आहे. या बुरुजावरून संपुर्ण किल्ला एका नजरेत पहाता येतो. संपुर्ण किल्ला फिरायला एक तास पुरेसा होतो. महाराष्ट्राच्या सीमेवर आजही बऱ्यापैकी टिकुन असलेला हा भुईकोट त्याच्या बांधकाम वैशिष्ठ्यासाठी एकदा तरी पाहायलाच हवा.
© Suresh Nimbalkar