अडावद
प्रकार : गढी
जिल्हा : जळगाव
उंची : 0
मध्ययुगीन काळापासुन म्हणजे फारुकी राजवटीपासून खानदेशातील एक महत्वाचे शहर म्हणजे अडावद. अनेक कागदपत्रात असलेले या शहराचे नाव त्याचे त्या काळातील महत्व अधोरेखित करतात. अशा महत्वाच्या शहराला कोट अथवा गढी असणे स्वाभाविकच आहे व तसे उल्लेख काही कागदपत्रात देखील येतात. ५० वर्षापुर्वी लिहिल्या गेलेल्या काही पुस्तकात अडावद येथील उपविभागीय कचेरीजवळ गढी असल्याचे उल्लेख येतात. जळगाव जिल्ह्याची भटकंती करताना आम्ही अडावद येथील या गढीचा व तिच्या अवशेषांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण हाती काहीच लागले नाही. अंकलेश्वर-बुऱ्हानपूर महामार्गावर असलेले अडावद शहर चोपडा या तालुक्याच्या ठिकाणाहुन १५ कि.मी.अंतरावर तर जळगाव शहरापासुन ३२ कि.मी.अंतरावर आहे. मुळचे अडावद शहर आता इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे कि त्यात असलेल्या प्राचीन वास्तु वा त्यांचे अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत.
...
अडावद शहराबाहेर असलेल्या एका जुन्या कब्रस्थानात फारुकी राजवटीतील एक पर्शियन शिलालेख पहायला मिळतो. या शिवाय अडावद गावात लाकडी कोरीकामाने नटलेली श्रीराम मंदिर व गोपालकृष्ण मंदिर अशी दोन मंदीरे पहायला मिळतात. या शिवाय अडावद गावात जुने तेलाच्या घाण्याचे अवशेष व प्राचीन बारव असुन ते पाहण्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी लागते. अडावद शहर फिरायचे असल्यास अर्धा दिवस पुरेसा होतो पण गढी अथवा कोट यासारख्या कोणत्याच वास्तुचे अथवा त्यांच्या अवशेषांचे दर्शन होत नाही.
© Suresh Nimbalkar