अजिंक्यतारा

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सातारा

उंची : ३२९० फुट

श्रेणी : सोपी

सातारा शहराच्या पार्श्वभुमीवर उभा असलेला अजिंक्यतारा उर्फ सातारचा किल्ला म्हणजे सातारा शहराचा पाठीराखा. स्वराज्याची चौथी राजधानी असलेला हा किल्ला सातारा शहरालगत असल्याने किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहे. शहरातील अदालत वाड्याकडून गडावर जाण्यासाठी पक्की सडक असुन खाजगी वाहनाने थेट गडाच्या मुख्य दरवाजात जाता येते. याशिवाय गावातुन इतर काही पायवाटा या दरवाजात येतात. पायथ्यापासुन गडावर चालत येण्यास पाऊण तास पुरेसा होतो. कड्यालगत असलेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा दोन बुरुजामध्ये बांधलेला असुन याचे एकुण बांधकाम पहाता याची रचना शिवकालानंतर झाली असावी. पश्चिमाभिमुख असलेल्या या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन दरवाजाची कमान शिल्पांनी व कोरीवकामाने सजवलेली आहे. या कमानीवर पायाखाली हत्ती घेतलेले शरभ, कीर्तिमुख, गरुड, हनुमान, गणपती यासारख्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. ... या दरवाजाच्या दिंडी दरवाजाने आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांच्या देवड्या असुन त्याच्या जोत्यावर मानवी शिल्पे कोरलेली आहेत. येथुन पुढे जाणारा मार्ग पुर्णपणे तटबंदीने बंदिस्त केलेला असुन २०-२५ पायऱ्या चढुन गेल्यावर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. या दरवाजाचे बांधकाम हा किल्ल्याच्या मुळ बांधकामातील दरवाजा असल्याची जाणीव करून देतो. या दरवाजाने आत शिरल्यावर १०-१२ पायऱ्या चढुन आपला गडावर प्रवेश होतो. समुद्रसपाटीपासुन ३२९० फुट उंच असलेला त्रिकोणी आकाराचा गडमाथा पुर्वपश्चिम साधारण ६५ एकरवर पसरलेला आहे. दरवाजाच्या या भागात उजवीकडे मारुती मंदिर, महादेव मंदिर तर पुढे काही अंतरावर चुन्याचा घाणा पहायला मिळतो. गडाच्या बहुसंख्य वास्तु या गडाच्या मध्यात असुन या भागात आकाशवाणी, दूरदर्शन आणि पोलीस विभाग यांचे प्रक्षेपण मनोरे उभारलेले आहेत. या मनोऱ्याकडे जाण्यासाठी पक्की वाट बांधलेली आहे. या वाटेने सरळ गेल्यावर डावीकडे जाणारी वाट आपल्याला मंगळादेवी मंदिराकडे घेऊन जाते. वाटेतील पडक्या कमानीतुन आत शिरल्यावर घडीव दगडात बांधलेला राजवाड्याचा चौथरा दिसतो. या चिरेबंदी वास्तुचे छत जरी कोसळलेले असले तरी त्याच्या उर्वरित अवशेषांवरून त्याची भव्यता लक्षात येते. कधीकाळी रणरागिणी ताराराणीचे या राजवाडयात वास्तव्य होते. या वाडय़ाशेजारी महादेवाचे एक मंदिर आहे. या भागात असलेले घरांचे अवशेष पहाता गडावरील मुख्य वस्ती याच भागात असावी. या वास्तु अवशेषात दोन बळद पहायला मिळतात. येथुन सरळ जाणारी वाट आपल्याला मंगळाईदेवीच्या मंदिरात घेऊन जाते. मंदिराच्या आवारात काही विरगळ ठेवलेल्या आहेत. गडाचा हा ईशान्य भाग असुन मंदिरासमोर मंगळाई बुरूज आहे. येथुन तटबंदीच्या काठाने आपल्या गडफेरीस सुरवात करावी. वाटेने सरळ पुढे आल्यावर तटाजवळ एक दगडी कोठार पहायला मिळते. कोठार पाहुन सरळ पुढे आल्यावर वाटेत दोन तलाव व एक विहीर आहे. हे पाहून सरळ पुढे आल्यावर आपण गडाच्या दक्षिण भागात येतो. या ठिकाणी गडावर येणारा दुसरा प्रवेशमार्ग असुन हा मार्ग दोन दरवाजांनी बंदीस्त केलेला आहे. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड महामार्गावरून येते. दरवाजा पाहून पुढे आल्यावर तटाजवळ भिंत घालुन पाणी अडवलेला अजुन एक तलाव नजरेस पडतो. या तलावाच्या काठावर महादेवाचे लहान दगडी मंदीर उभारलेले आहे. तटबंदीवरून प्रदक्षिणा करताना आसपासचा प्रदेश पहात आपण किल्ल्याच्या प्रवेश केलेल्या दरवाजापाशी पोहोचतो. या संपुर्ण गडफेरीत आपल्याला लहानमोठे आठ तलाव पहायला मिळतात पण उन्हाळ्यात मात्र हे सर्व तलाव कोरडे पडतात. या सर्व तलावांची नावे ज्ञात आहेत पण कोणत्या तलावाचे कोणते नाव हे ठोसपणे माहित नसल्याने त्याचा उल्लेख केलेला नाही. किल्ल्याच्या माचीवर डफळ्यांची घोड्यांची पागा, अक्कलकोटकरांचा वाडा, पिंगळ्यांचा वाडा व शेख मिराची घोड्यांची पागा या शाहुकालीन वास्तुंचे उल्लेख येतात पण आज त्यांची नेमकी स्थान निश्चिती करता येत नाही. किल्ल्यावरून पूर्वेला नांदगिरी, जरंडा, कल्याणगड, चंदन-वंदन हे किल्ले आणि पश्चिमेला यवतेश्वर तर दक्षिणेला सज्जनगड दिसतो. संपूर्ण गड फिरण्यासाठी साधारण… दीड तास लागतो. सातारचा किल्ला म्हणजे मराठ्यांची चौथी अधिकृत राजधानी होय. पुरंदरवर सुरु झालेला स्वराज्याचा कारभार राजगड-रायगड-जिंजी असा प्रवास करत सातारा किल्ल्यावर येऊन स्थिरावला. सतारे या किल्ल्याच्या नावावरून शहरास सातारा नाव पडले आहे. या नावाविषयी अनेक कथा असून किल्ल्यावरील सप्तऋषींच्या मंदिरामुळे किंवा किल्ल्यास असलेले सतरा बुरूज यांतील सतरा शब्दाचा अपभ्रंश होऊन सातारा हे नाव रुढ झाले असावे. किल्ल्याचे मुळ नाव सप्तर्षी किंवा सातदरे असे होते. छत्रपती शाहू यांच्या पत्रव्यवहारातुन या किल्ल्याचा उल्लेख सतारे नावाने आढळतो. साताऱ्याचा किल्ला शिलाहारवंशीय राजा भोज याने इ.स. ११५० मध्ये बांधल्याचे मानले जाते. साताऱ्याचा प्रथम लिखित उल्लेख बहमनी सुलतान पहिला मुहंमदशाह (१३५८ – १३७५ ) याच्या काळात येतो. त्याने या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. बहमनी सत्तेचे विभाजन झाल्यानंतर हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली आला. या काळात किश्वरखान या सरदाराने पहिल्या आदिलशाहची (१५५७– १५८०) विधवा बेगम चांदबीबी ही निजामशाहशी संगनमत करीत असल्याच्या संशयावरून तिला सातारा किल्ल्यात कैदेत ठेवले (१५८२) परंतु त्याच वर्षी किश्वरखानाचा पाडाव झाल्याने तिची सुटका झाली. पुढे आदिलशाहीत दिलावरखान याने कटकारस्थाने केली, म्हणून त्यास या किल्ल्यात ठेवण्यात आले होते (१५९२). तो या किल्ल्यातच मरण पावला. तसेच मुधोजी आणि बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते. स्वराज्याचा विस्तार करताना शिवाजी महाराजांनी २७ जुलै १६७३ रोजी हा ताब्यात घेतला. कर्नाटक मोहिमेच्या आधी १६७५ मध्ये ते आजारी पडले असताना त्यांचा १ डिसेंबर १६७५ ते २५ जानेवारी १६७६ असा दोन महिने या किल्ल्यावर मुक्काम होता. याच काळात रघुनाथ हणमंते त्यांना भेटले आणि कर्नाटक मोहिमेची योजना निश्चित झाली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात आला. छत्रपती राजारामांनी विशाळगडहून मराठ्यांची राजधानी येथे आणली. (१६९८). इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मोगलांनी गडाच्या तटाखाली दोन सुरुंग पेरले आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले, मात्र काहीही इजा न होता ते वाचले. तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. त्यामुळे मोठा तट पुढे घुसणाऱ्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील रसद संपल्याने २१ एप्रिल १६९९ रोजी मराठ्यांनी किल्ला मोगलांच्या हवाली केला. २४ एप्रिल १७०० रोजी औरंगजेबाने स्वत: हा किल्ला फिरून पाहिला व त्यास अजमतारा हे नाव दिले. महाराणी ताराबाई यांचे सरदार परशुराम त्र्यंबक यांनी मोगलांकडून तो परत मिळविला (१७०६) आणि त्याचे नाव अजिंक्यतारा करण्यात आले. छत्रपती शाहूंनी मोगलांच्या कैदेतून मुक्त झाल्यावर (१७०७) अजिंक्यतारा काबीज करून तेथे स्वतःस राजाभिषेक केला (१७०८) आणि अजिंक्यताऱ्याला मराठय़ांच्या राजधानीचा मान मिळाला. इ.स. १७१९ मध्ये महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना किल्ल्यावर आणण्यात आले. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणूनच केला जात असे. इ.स. १७३० मध्ये ताराराणीसाहेब आणि इ.स. १७४१ मध्ये अर्काटचा नवाब चंदासाहेब या किल्ल्यावर कैदेत होते. दुसऱ्या शाहुराजाच्या निधनानंतर फितुरीमुळे किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला. त्यानंतर सातारा संस्थान विलीन होईपर्यंत (१८४९) तो सातारा येथील राजांच्या ताब्यात होता.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!