अजमेरा

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : २६१५ फुट

श्रेणी : मध्यम

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका पुर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकजण या भागाचा उल्लेख बागलाण असाच करतात. याच बागलाणात साल्हेर-सालोटा यासारखे मोठे किल्ले वसले आहेत तर दुंधेश्वर डोंगररांगेवर कऱ्हा- दुंधा-बिष्टां-अजमेरा यासारखे लहान व अपरिचित किल्ले वसले आहेत. दुर्गम असलेल्या या भागात दळणवळणाची सोय फारच कमी आहे. त्यामुळे या भागात फिरताना खाजगी वाहनाचा वापर केल्यास हे चार किल्ले दोन दिवसात सहजपणे पाहून होतात. आपली आजची दुर्ग भटकंती असलेला अजमेरा हा असाच एक अपरीचीत किल्ला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले अजमेर सौंदाणे हे गाव नाशिकहुन ९८ कि,मी,अंतरावर आहे तर सटाणा या तालुक्याच्या ठिकाणाहुन १० कि.मी.अंतरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पहाडेश्वर मंदीर हे किल्ल्याच्या पायथ्याचे ठिकाण अजमेर सौंदाणे गावापासुन ४ कि.मी.अंतरावर आहे. ... खाजगी वाहन असल्यास ठीक अन्यथा हे अंतर पायी पार करावे लागते. पहाडेश्वर मंदिर व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश अतिशय सुंदर आहे. गडावर जाण्यासाठी मुक्काम करायचा झालास या मंदिरात मुक्काम करता येईल पण जेवणाची सोय मात्र स्वतःला करावी.लागे. पहाडेश्वराचे दर्शन घेऊन व गडावर पाण्याची सोय नसल्याने येथुन पाणी घेऊनच गडाकडे निघावे. शक्य झाल्यास अजमेरा किल्ला गाईड घेऊनच पाहावा कारण गडावर जाण्यास ठळक अशी वाट नाही. पहाडेश्वर मंदिराला लागुन असलेल्या डोंगर सोंडेवरूनच किल्ल्यावर जाणारी वाट सुरू होते. या वाटेवर दोन ठिकाणी मुरुमाचा घसारा आहे. या वाटेने अर्ध्या तासात आपण माचीसारख्या टप्प्यावर पोहोचतो. येथे वाटेतच एका दगडावर कोरलेले शिवलिंग आहे. समोर एक डोंगर असुन त्याच्या अर्ध्या उंचीवरील गुहेत आदिवासींचा डोंगरदेव आहे. हि वाट पुढे जाताना दिसते पण या वाटेने न जाता डोंगराच्या वरील बाजुस देखील एक पायवाट दिसते त्या वाटेकडे वळावे. डाव्या बाजूला अजमेरा किल्ल्याचा डोंगर आणि उजव्या बाजूला डोंगरदेवाचा डोंगर ठेउन हि पायवाट वरवर जात रहाते. या वाटेने साधारण अर्ध्या ते पाऊण तासात आपण किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजापाशी पोहोचतो. गडाचा दरवाजा आजमितीस अस्तित्वात नसुन या ठिकाणी उजव्या बाजूला उध्वस्त गोल बुरुजाचे आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. येथुन गडप्रवेश करून थोडे पुढे गेल्यावर गडाचा आटोपशीर माथा नजरेस पडतो. साधारण अर्धगोलाकार आकाराचा हा माथा दक्षिणोत्तर १० एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटीपासुन २६१५ फुट उंचावर आहे. गडावर आपण जेथुन प्रवेश केला त्याच्या समोरच टोकाला उंचावर झेंडा लावलेला दिसतो. हाच झेंडा आपल्याला गडाखालुन दिसत असतो. झेंड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला एक उंचवटा दिसतो त्या ठिकाणी एका भल्यामोठ्या वाड्याचे व सदरेचे उध्वस्त अवशेष आहेत तर डाव्या बाजूला पावसाळी तलाव आहे. या पायवाटेने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला उघड्यावरच महादेवाची पिंड आणि नंदी आहे. महादेवाचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर उजव्या बाजूला दुसरा कोरडा पडलेला तलाव आहे. तलाव पाहून पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजुला दोन पाण्याची टाकी दिसतात त्यातील एक टाके बुजलेले असून दुसरे टाके पाण्याने भरलेले आहे पण पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. टाके पाहून गडाच्या टोकावरील उंचवट्यावर असलेल्या झेंड्यापाशी पोहोचावे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. अजमेरा गडाचा गडमाथा लहान असल्याने गड पाहाण्यासाठी अर्धा तास पुरतो पण पायथ्यापासुन गडावर येण्यास दिड तास लागतो. माथ्यावरुन साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, रतनगड, तांबोळ्या, मांगी-तुंगीचे सुळके, बिष्ठा, डेरमाळ, पिसोळ, कऱ्हा तसेच दुंधागड दिसतात. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते. हा किल्ल्याचा डोंगर सुटा उभा असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. किल्ल्यांबद्दल इतिहास धुंडाळला असता फारशी माहिती मिळत नाही. १९८५ साली नाशिकला वैनतेय गिर्यारोहण – गिरिभ्रमण या संस्थेने केलेल्या भ्रमंती आणि कागदपत्रांच्या आधारे अशा बऱ्याचश्या किल्ल्यांची माहिती लोकांसमोर आणली व एका शोध मोहिमेत अजमेरा गडाचे स्थान निश्चित केले. अजमेर गडापासून पाच कि.मी. अंतरावरील देवळाणे गावात प्राचीन असे शिवमंदिर असुन हे मंदिर व या शिवमंदिरावरील शिल्पे प्रेक्षणीय आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!