अजंठा
प्रकार : बौद्ध लेणी
जिल्हा : औरंगाबाद
औरंगाबादपासून सुमारे १०२ किलोमीटर अंतरावर घोड्याच्या नालेसारख्या आकारातील पर्वतात वाघुर नदीच्या काठावर अजिंठा लेण्या कोरण्यात आल्या आहेत. जळगाव रेल्वे स्थानकापासुन अजिंठा लेण्या ५९ किलोमीटर अंतरावर असुन अजिंठा गावापासुन ११ कि.मी. अंतरावर आहेत. गाड्यांनी होणारे प्रदूषण टाळण्यासाठी या लेण्यांना भेट देण्यास ४ कि.मी. अंतरावर सीएनजी बस व्यवस्था केलेली आहे. लेणी पहाण्यासाठी प्रत्येकी १० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. इ.स.पूर्व २०० ते ६५० या वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात कोरलेल्या या लेण्या त्यांतील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. या एकूण ३० लेण्या असुन त्या सर्व बौद्धधर्मीय आहेत. तत्कालीन वास्तुशास्त्र, भित्तीचित्रे आणि शिल्पकलेचा आदर्श नमुना असलेल्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धांना अर्पण केलेली चैत्य दालने आणि प्रार्थनागृहे आणि ध्यान व धार्मिक साधनेसाठी बौद्ध भिख्खु वापरत असलेले विहार आणि आश्रम आहेत.
...
लेण्यांमधील भिंती आणि छतांवर काढलेल्या देखण्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग आणि बौद्ध देवता यांचे व्यापक चित्रण आढळते. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृहे आहेत व १२, १३ ही लेणी आणि १५-अ क्रमांकाचे लेणे विहार आहे. हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत. १, २, १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफांमधील भित्तीचित्रांना कोणतीही हानी न पोहोचल्याने तेथील चित्रे सुस्पष्ट व सजीव वाटतात. प्रथम क्रमांकाच्या गुंफेत असलेले विख्यात बोधीसत्व पद्मपाणी म्हणजे कोमल दयेचे अदभूत रेखाचित्रण आहे. येथील सुंदर मूर्तीच्या नाजुक हातात कमलपुष्प दिसते. याच गुंफेत अवलोकितेश्वराची दागदागीन्यांनी मढलेली सुवर्णमूर्ती पहायला मिळते. त्यातील स्त्रिया, राजकुमारी, दासी सगळ्याच शोभिवंत असुन त्यांचे पोषाखही कलात्मक आहेत. नृत्यमग्न ललना आणि वादक यांचा सजीव देखावाही येथे आहे. तत्कालीन वेशभुषा, केशभुषा, दागदागीने, वस्त्रे, संगीत साधने, चालीरीती आणि स्थापत्यशास्त्राचे तपशीलवार विवेचन यातुन मिळते. लेणी क्र. १ चा हा विहार वाकाटक राजा हरिषेण याने खोदविला. दुसऱ्या क्रमांकाच्या गुंफेत राणी माया हिच्या स्वप्नाचा सविस्तर वृत्तांत चित्रित केला आहे. त्यात शुभ्र हत्ती प्रकर्षाने उठुन दिसतात. शाही ज्योतीष्यांनी या स्वप्नाचा संबंध तेजस्वी पुत्राच्या जन्माशी लावल्याचेही कळते. या गुंफेत अनेक बुद्धमूर्ती ओळीने मांडल्या आहेत. लेणी क्र. १६ व १७ हरिषेण राजाचा अमात्य वराहगुप्त याने खोदविली असा शिलालेख या लेण्यांमध्ये आहे. या विहाराच्या ओसरीत सालंकृत स्तंभ असून स्तंभांवर तसेच ओसरीच्या भिंतीवर बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग, हत्ती, घोडे इ. पशू कोरलेले आहेत तसेच नक्षीदार कलाकुसर केली आहे. ओसरीतले छत व भिंती पूर्वी रंगवलेल्या असाव्यात पण आज त्यांचे केवळ अवशेष दिसतात. प्रशस्त सभामंडप, स्तंभावरचे अतिशय देखणे कोरीवकाम, समोरील गर्भगृहातील बुद्धाची प्रसन्न मूर्ती आणि सभामंडपातील सर्वच बाजूंना रंगवलेली चित्रे अशी याची रचना. भिंतीवरच्या चित्रांमध्ये जातक कथांमधली घटना कोरलेल्या आहेत. शिबी राजाची कथा, महाजनक जातक कथा, बुद्धशत्रू मार याचा बुद्धाला मारायला येणारा प्रसंग आणि पद्मपाणी, वज्रपाणी बोधीसत्वाच्या प्रतिमा आदी चित्रे या विहारांत रंगवलेली आहेत. १७ क्रमांकाच्या गुंफेत आकाशात विहार करणारी अप्सरा असुन तिच्या पोषाखावर नाजुक कलाकुसर आणि अंगावर अनेक दागदागीने दिसतात. १९ क्रमांकाच्या गुंफेच्या विस्तीर्ण दर्शनी भागात धनुष्याकृती गवाक्षे ओळीने पहायला मिळतात.येथे एक संपूर्ण चैलगृह असुन त्याच्या एका टोकाला उभी बुद्धमूर्ती आहे. येथील बैठी नागराजाची मूर्ती आणि त्याच्या सोबत असलेली स्त्री दासी विशेष नोंद घेण्याजोगी आहे. २५, २६ क्रमांकाच्या लेण्यांमध्ये बुद्धाच्या जीवनातील प्रसंग मूर्तीरूपात कोरलेले आहेत पण त्यातील रंगीत भित्तीचित्रे अपूर्णावस्थेत आहेत. विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृहे हे पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली. बऱ्याच विहारांना सोपा व अंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. सुमारे ७०० वर्षे वापरात असलेल्या अजिंठा लेण्या नंतरच्या काळात काही कारणांमुळे ओस पडल्या. सुमारे १००० वर्षाहून अधिक काळ लेण्या अज्ञात राहिल्या. ब्रिटिश लष्करी अधिकारी जॉन स्मिथ २८ एप्रिल १८१९ मध्ये शिकारीसाठी अजिंठा लेणीच्या पर्वतावर आला असता त्याला या डोंगरात काहीतरी बांधकाम असल्याची शंका आली. त्याने नोकरांच्या मदतीने शोध घेतला असताना त्याला या लेण्या दिसून आल्या. बरीच स्वच्छता केल्यावर त्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या. अमग्डॅलॉईड प्रकारच्या खडकात या लेण्या कोरण्यात आल्या आहेत. यांची उंची ५६ मीटर असून सुमारे ५५० मीटरपर्यंत घळीच्या आकारात पसरलेल्या आहेत. येथील चित्रे काढताना प्रथम धातुमिश्रित माती घेण्यात आली. त्यात दगडांचे बारीक कण, वनस्पतींचे तंतु, तांदळाचा भुसा, गवत, बारीक वाळू आदी वापरुन दगडांवर कॅनव्हास तयार करण्यात आला. त्यानंतर तो लिंबू पाण्याने धुण्यात आला. रंग देण्याची पद्धत साधी आणि सुटसुटीत होती. आधी आऊटलाईन काढली जाई. त्यानंतर वेगवेगळे रंग चिकटविले जात असे. यासाठी विशिष्ट पद्धतीची रंगसंगती वापरण्यात आलेली नाही. आवश्यकतेप्रमाणे रंगात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या शैलीने जगात वेगळेपण टिकवून ठेवले आहे.
© Suresh Nimbalkar