अजंठा दुर्ग
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : औरंगाबाद
उंची : १८५७ फुट
श्रेणी : सोपी
अजंठा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ती जगप्रसिद्ध अजंठा लेणी. या अजंठा लेण्यांचा प्रभाव पर्यटकावर इतका आहे की या लेण्यापुढे या भागातील इतर ऐतिहासिक वास्तु पुर्णपणे दुर्लक्षित झाल्या आहेत. आपल्यापैकी अनेक दुर्गप्रेमिनी अजंठा लेणी पाहिल्या असतील पण या लेण्याकडे जाण्यासाठी जो अजंठा घाट पार करावा त्या घाटात असलेला किल्ला मात्र पुर्णपणे दुर्लक्षित व अपरिचीत आहे. मध्ययुगीन काळापासुन खानदेश व मराठवाडा यांना जोडणारा प्रमुख घाटमार्ग म्हणजे अजंठा. किंबहुना मराठवाडा-खानदेशचे प्रवेशद्वार म्हणजे अजंठा घाट असे या घाटमार्गाचे वर्णन करता येईल. औरंगाबादपासून अजंठा लेणीकडे जाताना साधारण १०० कि.मी.वर तर जळगावहून आल्यास सोयगाव फाट्यावरून साधारण ६ कि.मी. अंतरावर अजंठा घाट आहे. जळगावहून औरंगाबादकडे जाताना सोयगाव फाटा पार करताच समोर अजिंठा डोंगर व घाट दिसतो. अजिंठा घाटाचे पायथ्याचे गाव म्हणजे फर्दापूर जे पुर्वी खानदेशात होते व वरील गाव म्हणजे अजिंठा जे मराठवाड्यात आहे. या घाटमार्गाचे रक्षण व नाकाबंदी करण्यासाठी घाटाच्या वरील बाजुस अजंठा गढी तर खालील बाजुस फर्दापुर गढी बांधली गेली इतकेच नव्हे या घाटात एक लहान किल्ला बांधला गेला.
...
या दोन्ही गावातील सराई पाहिल्यास या मार्गावरून पुर्वी होत असलेल्या वाहतुकीची कल्पना येते. अजंठा घाटातील हा किल्ला म्हणजेच मराठवाडा-खानदेशचे प्रवेशद्वार होते. औरंगाबाद येथुन आल्यावर अजंठा घाट जेथे सुरु होतो तेथे उजवीकडे एक कच्चा रस्ता शेतातुन जाताना दिसतो. या कच्च्या रस्त्याने आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाता येते. थोडीफार पडझड वगळता किल्ल्याचा दरवाजा आजही पुर्णपणे शिल्लक आहे. एखादा हत्ती अंबारीसकट सहज पार व्हावा इतपत दवाजाची उंची असुन खालील बांधकाम घडीव दगडात तर कमानीवरील बांधकाम विटांनी केलेले आहे. दरवाजाच्या वरील भागात चर्या असुन दरवाजाच्या घडीव दगड बांधकामात काही ठिकाणी मंदीराचे नक्षीदार दगड दिसुन येतात. या दरवाजाला लागून असलेली तटबंदी डोंगराच्या दिशेने चढत गेलेली असुन या तटबंदीच्या टोकाला गोलाकार बुरुज आहे. या बुरुजावर चढले असता संपुर्ण अजंठा घाट नजरेस पडतो. कोटची संपुर्ण तटबंदी ओबडधोबड दगडांनी बांधलेली असुन तटाच्या आतील बाजुस चुन्याचा गिलावा केलेला आहे. येथे बहुदा सैनिकांची दालने असावीत. किल्ल्याच्या दरवाजातून सरळ जाणारा ऐसपैस मार्ग दुसऱ्या बाजुने डोंगर उतरत जातो. नवीन घाटमार्ग सुरु करण्यासठी हाच मुळचा घाट रस्ता होता. डोंगराच्या उतारावर असलेली किल्ल्याची तटबंदी आज पुर्णपणे नष्ट झालेली असुन केवळ दरवाजा, टेकडाकडे जाणारी तटबंदी इतपतच अवशेष शिल्लक आहेत. दरवाजाच्या एक बाजुस तटावर तसेच दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. डोंगरावरील तटबंदी तसेच दरवाजा वगळता इतर कोणतेही अवशेष शिल्लक नसल्याने अर्ध्या तासात आपले अजंठा दुर्गाचे दुर्गदर्शन पुर्ण होते. किल्ला पुर्णपणे अपरिचीत असल्याने किल्ल्याचा इतिहास तुर्तास माहित नाही.
© Suresh Nimbalkar