अचला
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : ३७६६ फुट
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून अजंठा-सातमाळा ही सह्याद्रीची एक उपरांग पुर्वपश्चिम पसरली आहे. पुर्वपश्चिम पसरलेल्या या रांगेमध्ये अनेक दुर्ग आहेत. या गिरीदुर्गांच्या मालिकेमध्ये नामवंत दुर्गांबरोबरच काही अपरिचित दुर्गही सामावलेले आहेत. या अजंठा-सातमाळा रांगेची सुरवात होते ती अचला नावाच्या अपरिचित किल्ल्यापासुन. नाशिक-सापुतारा महामार्गावरील पिंपरी अचला हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असुन खाजगी वाहनाने आपल्याला थेट पिंपरीपाडा या किल्ल्याजवळ असलेल्या वस्तीपर्यंत जाता येते. नाशीकहुन वणीमार्गे पिंपरी अचला हे अंतर ५४ कि.मी. तर वणीपासुन हे अंतर १२ कि.मी. आहे. पिंपरी अचला ते पिंपरीपाडा हे अंतर २.५ कि.मी. असुन या वाडीतील हनुमान मंदिराकडून किल्ल्यावर जाणारी वाट आहे.
...
पिंपरी अचला गावातुन पिंपरीपाडाकडे जाताना वाटेत ५-६ फुट उंचीच्या अलीकडील काळातील ६ विरगळ नजरेस पडतात. पिंपरीपाडा वस्तीतील हनुमान मंदिराबाहेर एक सुंदर दगडी किर्तीमुख पहायला मिळते. गावाच्या मागील बाजुस असलेला डोंगर म्हणजे अचला किल्ला तर त्याच्या डाव्या बाजुस असलेला डोंगर टवल्या डोंगर म्हणुन ओळखला जातो. अचला किल्ल्याच्या उजव्या बाजुस एक डोंगरसोंड खाली आलेली असुन या सोंडेखालील खिंडीत एका पत्र्याचा निवारा दिसतो. या निवाऱ्याखाली एका घुमटीत शेंदुर फासलेले दगड असुन स्थानिक लोक या स्थानाला सतीचे देऊळ म्हणतात. किल्ल्यावर जाणारी वाट या मंदिराकडून वर जात असल्याने हे मंदीर नजरेसमोर ठेऊनच डोंगर चढण्यास सुरवात करावी. गडावर व वाटेत कोठेही पाण्याची सोय नसल्याने पुरेसे पाणी सोबत ठेवावे. वाटेच्या सुरवातीला द्राक्षांच्या बागा असुन पुढे हि वाट चढ चढत दाट जंगलातुन अर्ध्या तासात आपल्याला सतीच्या देवळापाशी नेते. देवळाच्या डाव्या बाजुस असलेल्या डोंगरसोंडेवरील वाट आपल्याला अचला किल्ल्यावर तर डावीकडे जाणारी वाट बिलवाडीमार्गे अहिवंत गडावर नेते. अहिवंत गडावरून या मार्गे आपल्याला अचला किल्ल्यावर येता येते. डाव्या बाजुंच्या सोंडेवरून डोंगर चढायला सुरवात केल्यावर १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या डोंगराखाली असलेल्या पठारावर येऊन पोहोचतो. येथे एका झुडुपात शेंदुर फ़ासलेली हनुमानाची मुर्ती पहायला मिळते. पुढे सोंडेवरील घसाऱ्याचा चढ चढत आपण किल्ल्याच्या डोंगराला भिडतो. येथुन किल्ल्याचा डोंगर डाव्या बाजूला ठेवत डोंगराला वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या बाजुस येतो. येथुन गडावर जाणारी वाट इंग्रजांनी उध्वस्त केल्याने मोठमोठे दगड ढासळून पडले आहेत. या कोसळलेल्या दगडावरून किल्ला चढायला सुरवात करायची. वाटेच्या सुरवातीला डाव्या बाजुस थोडे वर खडकात कोरलेली ३ x ३ आकाराचे तोंड असलेली गुहा असुन या गुहेच्या आत दुसरी मोठी गुहा खोदलेली आहे. सध्या हि गुहा पाण्याने भरलेली आहे. या गुहेच्या पुढील भागातुन गडावर जाण्यासाठी कातळ कोरीव पायऱ्या सुरु होतात. या पायऱ्याच्या शेवटी खडकात कोरलेले मातीने भरलेले टाके दिसते. टाक्याच्या वरील बाजुस गडाची तटबंदी पहायला मिळते. या टाक्यापासुन थोडा चढ चढल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. या वाटेवर असलेला गडाचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याचे ठिकाणही समजत नाही. आपला गडावरील प्रवेश हा ढासळलेल्या तटबंदी वरून होतो. दगड पिंपरी गावातून गडमाथा गाठण्यास साधारण दोन तास लागतात. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासुन ३७६६ फुट असुन किल्ल्याचा पसारा पुर्वपश्चिम ११ एकरवर पसरलेला आहे. किल्ल्याचा डोंगर चारही बाजूनं ताशीव असल्याने फारशी तटबंदी बांधलेली दिसत नाही. गडावर प्रवेश केल्यावर प्रथम उजवीकडील भाग पाहुन घ्यावा. येथे समोरच एका रेषेत कोरलेली पाण्याची तीन टाकी दिसुन येतात. यातील दोन टाकी पुर्णपणे मातीने भरलेली असुन तिसरे टाके कोरडे पडलेले आहे. या टाक्याच्या आसपास कपडे पडलेले दिसतात. कुठल्याही मोठया आजारातून बरे झाल्यावर गावकरी या ठिकाणी येऊन अंघोळ करतात व जुने कपडे येथे सोडुन नविन कपडे घालून जातात. टाक्यांच्या पुढील बाजुस एका झाडाखाली काही झिज झालेल्या मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यामागे काही वास्तुंचे चौथरे दिसुन येतात. येथे वाटेच्या उजव्या बाजुस असलेल्या घळीत उतारावर एकाखाली एक असा आठ टाक्यांचा समुह पहायला मिळतो. यातील तीन टाक्यात पाणी असले तरी गावकरी वरील टाके आटल्यावर या टाक्यात अंघोळ करत असल्याने ते पिण्यायोग्य नाही. गडाचा हा भाग फिरून झाल्यावर आपण गडावर प्रवेश केला तेथुन डावीकडील भाग फिरून घ्यावा. या भागात आपल्याला एका मोठया वास्तुचा चौथरा तसेच मातीने भरलेले एक टाके पहायला मिळते. सध्या गावकऱ्यानी या टाक्यातील माती काढण्याचे कामास सुरवात केली आहे. अचला किल्ल्याचा गडमाथा अत्यंत अरुंद असुन माथ्यावर टाकी वगळता फारसे अवशेष नसल्याने अर्ध्या तासात आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्यावरून अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप,साल्हेर-सालोटा,रामसेज, देहेर,मोहनदर तसेच कंडाणा हे किल्ले पहायला मिळतात. पर्णालपर्वतग्रहणाख्यानं या ग्रंथात शिवाजी महाराजांनी अहीवंत गडासोबत अचलागड जिंकल्याचा उल्लेख येतो तर जेधे शकावलीत शिवाजी महाराजांनी नोव्हेंबर १६७० मध्ये अहिवंत गडासोबत इतर किल्ले घेतल्याचा उल्लेख येतो. सभासद बखरीत अचला गडाचा उल्लेख अचलगिरी गड असा येतो. १७५३-५४ दरम्यान मराठ्यांनी नाशिकमधील निजामाकडून जिंकलेल्या किल्ल्यांच्या यादीत अचला किल्ल्याचे नाव सामील आहे. जुन १८१८ मध्ये इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याने अहिवंत गडाबरोबर अचला किल्ला देखील ताब्यात घेतला.
© Suresh Nimbalkar