अकेरी

प्रकार : भुईकोट

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : 0

श्रेणी : सोपी

कोकणातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट झाले असुन काही किल्ल्यांचे अवशेष मात्र नावापुरते नाहीतर इतिहासाच्या पानातच उरले आहे. अकेरी किल्ला याचे एक उदाहरण आहे. सावंतवाडी तालुक्यात असलेला अकेरी किल्ला आज केवळ अवशेष रुपात शिल्लक आहे. अकेरी किल्ला सावंतवाडी शहरापासुन ७ कि.मी.अंतरावर तर कुडाळपासून १५ कि.मी. अंतरावर आहे. अकेरी किल्ल्याबद्दल गावातील लोकांना काहीही माहित नाही पण गावापासुन अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या रामेश्वर मंदिराबद्दल ते आवर्जुन सांगतात. गावातील लोकांकडे किल्ल्याची चौकशी करताना या मंदीराची चौकशी करावी. कधीकाळी या मंदिराच्या उजव्या बाजुला उभा असणारा अकेरीचा किल्ला आज पार भुईसपाट झाला आहे. गावातील एका वयस्कर माणसाने तिथे गढीसारखे काहीतरी होते असे सांगितल्याने आम्ही तेथे पोहोचलो. मंदिराच्या उजव्या बाजुस काही अंतरावर या किल्ल्याची साधारण ५ फुट उंचीची व १०० ते १५० फुट लांबीची उध्वस्त तटबंदी व या तटबंदीतील २ बुरुज पहायला मिळतात. ... तटबंदीचा आतील भाग ढिगाऱ्यात रुपांतर झाला असुन बाहेरील बाजुने हे बांधकाम व बुरुज दिसुन येतात. तटबंदीच्या बाहेरील बाजुस असलेला खंदक माती भरून बुजलेला आहे. मंदिराच्या भिंतीला टेकुन काही विरगळी ठेवलेल्या असुन मंदिरासमोर असलेल्या तुळशी वृंदावनावर १७५६ हे वर्ष व काही अक्षरे कोरलेली आहेत. मंदिराच्या आवारातच एक विहीर आहे. किल्ल्यासमोर १०० फुट उंचीची दगडी टेकडी असुन या टेकडीवर भगवा झेंडा लावलेला आहे पण वर वाढलेल्या झाडीमुळे या टेकडीवर जाता येत नाही. किल्ल्याचे इतर कोणतेही अवशेष शिल्लक नसले तरी रामेश्वर मंदीरातील कोरीव दगडी खांब व लाकडावरील इतर कलाकुसर पहाता आपली येथे दिलेली भेट मुळीच वाया जात नाही. अकेरी किल्ल्याची बांधणी केव्हा व कोणी केली हे ज्ञात नसले तरी १८ व्या शतकात हा किल्ला सावंतवाडीच्या अमलाखाली होता. इ.स.१७८७ मध्ये करवीरच्या सैन्याने नांदोस येथे सावंतांचा पराभव करून सावंतवाडीच्या दिशेने चाल केली. या सैन्याची अकेरी येथे सावंतांच्या फौजेबरोबर गाठ पडली असता करवीरच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. इ.स.१७८८ मध्ये सावंतांच्या मदतीस आलेल्या पोर्तुगीज सैन्याचा तळ आकेरी येथे होता. या सैन्याच्या फिल्ड मार्शलने गोव्यास लिहिलेल्या पत्रानुसार येथे खाद्य पदार्थांचा तुटवडा असुन सावंत पोर्तुगीज सैन्यास हवी तशी मदत वेळेवर करत नसल्याचे कळवले आहे. याशिवाय तो सावंतानी आकेरी येथे सैन्य ठेवल्याचे देखील कळवतो. सावंत घराण्यातील इ.स.१८०६ मधील वारसाहक्काच्या कलहात फोंड सावंत यांनी अकेरीस पळ काढत करवीरकरांकडे व पेशव्यांकडे सहाय्य मागीतले. यावेळी करवीरकराचे रांगण्याचे किल्लेदार राणोजी निंबाळकर व पेशव्यांचे साळशी येथील अंमलदार चिटकोपंत अकेरी येथे एकत्र आले असता राणोजीनी चिटकोपंत यांना पकडुन सिंधुदुर्ग किल्ल्यात कैदेत ठेवले. या काळात कदाचित अकेरी करवीरकराच्या ताब्यात आला असावा पण नंतरच्या काळात मात्र तो सावंतांच्या अमलाखालीच दिसतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!