अंबोवा

प्रकार : जलदुर्ग

जिल्हा : मुंबई

उंची : 0 फुट

श्रेणी : सोपी

पश्चिम रेल्वेच्या मालाड पश्चिमेस असलेला मढ-मार्वे समुद्रकिनारा मुंबईकरांना चांगलाच परीचीत आहे. मढ हे गाव मालाड रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला १२ कि.मी.अंतरावर समुद्रकिनारी वसलेलं आहे. नारळी-पोफळीच्या बागा तेथील बंगले आणि एकंदर वातावरण पाहून जणू गोव्यातच आलो आहे असं वाटतं. मढ परीसरात मढ कोट, मढ किल्ला, एरंगल बुरूज व अंबवा बेटावरील बुरुज असे ४ कोट पहायला मिळतात. यातील अंबवा कोट मढ गावाच्या पश्चिमेस समुद्रातील बेटावर असल्याने तेथे जाण्यासाठी होडीची गरज भासते. अंबवा बेटावर जाण्यासाठी होडी सहजपणे उपलब्ध होत नसल्याने तेथे जाणे काहीसे कठीण होते. स्थानीक कोळ्यांची या बेटावर मासळी सुकविण्याच्या जागा असल्याने त्यांच्या मदतीने या बेटावर जाता येते पण त्यासाठी स्थानिकांची ओळख असणे गरजेचे आहे. अंबवा बेटावर जाण्यासाठी मढ गावात आल्यावर सर्वप्रथम मढ गावातील होडीच्या धक्क्यावर यावे. या धक्क्यावर उभे राहिले असता अंबवा बेटावर असलेला हा बुरुज,अंबवा देवीचे मंदीर, गिरिजाघर व दर्गा सहजपणे नजरेस पडतात. ... बुरुज वगळता बेटावर असलेल्या उर्वरीत तीन वास्तु या अलीकडील काळातील आहेत. अंबवा बेटाच्या दक्षिण-पश्चिम दिशेला असलेला हा बुरुज समुद्राच्या खडकाळ भागात आहे. बुरुजाची सध्याची अवस्था बिकट झाली असुन भिंतीवर झाडे उगवली आहेत. २५ फुट उंचीच्या या गोलाकार आकाराच्या बुरुजाच्या बांधणीसाठी ओबडधोबड दगड, चिखलमाती, शंखशिंपले यांचा वापर करण्यात आला आहे तर झरोके व खिडकीवजा दरवाजा बांधण्यासाठी घडीव दगडांचा वापर केलेला आहे. या बुरुजावर १५ फुट उंचीवर २x३ फुट आकाराच्या सहा खिडक्या असुन त्याच उंचीवर बुरुजात जाण्याचा दरवाजा आहे. दरवाजा उंचावर असल्याने बुरुजात जाण्यासाठी शिडीचा वापर केला जात असावा. बुरुज आतील बाजुने पोकळ असल्याने या बुरुजातच रहाण्याची सोय असावी. बुरुजाच्या आत मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन थोडीफार कसरत करून बुरुजावर जाता येते पण बुरुजाच्या आत असलेल्या झाडीत कावळ्यांची घरटी असल्याने ते आत बुरुजात उतरू देत नाहीत. बुरुजाच्या आत भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्या वरून हा बुरुज दुमजली असल्याचे लक्षात येते. याचा खालील मजला रहाण्यासाठी तर वरील मजला टेहळणी व तोफा ठेवण्यासाठी असावा. बुरुजाच्या आत पाण्याची कोणतीही सोय नसली तरी काही अंतरावर असलेल्या दर्ग्याच्या आवारात एक विहीर पहायला मिळते. या विहिर आताची कि पुर्वीची हे सांगणे मात्र काहीसे कठीण आहे. या बुरुजाशिवाय कोटाचे इतर कोणतेही अवशेष नसल्याने आपली भटकंती दहा मिनिटात पुर्ण होते. एके काळी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकणातील हा प्रदेश मराठी भाषेत फिरंगाण म्हणुन ओळखला जात असे. फिरंगाणातील बहुसंख्य किल्ले हे पोर्तुगीजांनी उभारलेले आहेत. या किल्ल्यांची वेगळी अशी स्थापत्यशैली होती. फिरंगाणाचा इतिहास लक्षात घेता किल्ल्यांचे जे प्रयोजन होते तेच साध्य करण्यासाठी काही ठिकाणी एका बुरुजांची तर काही ठिकाणी चौक्यांची योजना पोर्तुगीजांनी केल्याचे लक्षात येते. साधारण १६व्या शतकात मढ भागातील इतर गढीकोटाबरोबर हा कोटही पोर्तुगिजांनी बांधला. मढ किल्ल्याकडे व मढ बंदरात शिरलेल्या व्यापारी जहाजांचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी या बुरूजाची निर्मिती केली असावी. याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि आगंतुक आलेल्या नौकांना लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने अटकाव करण्यासाठी होत असावा. साधारणतः १६व्या शतकात मढ भागातील इतर गढीकोटाबरोबर हा बुरुजही पोर्तुगिजांनी बांधला. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातुन उच्चाटन झाले. या बुरूजाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना काहीच माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जावे. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. याशिवाय मढ गावात एका टेकडीवर हरबादेवीचे मंदिर असुन त्यातील काही पुरातन मुर्ती प्रेक्षणीय आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!