अंबाजोगाई
प्रकार : एकांडा बुरुज
जिल्हा : बीड
उंची : 0
श्रेणी : सोपी
समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे. प्राचीन काळी अंबानगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंतीनगर ही अंबाजोगाईची ओळख होती. निजामाच्या काळात या गावाचे नाव बदलून मोमिनाबाद ठेवले होते. बीड जिल्ह्यातील जयंती नदीच्या काठावर वसलेले हे शहर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांशी रस्त्याने जोडलेले आहे. अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधू या ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अंबेजोगाईतील योगेश्वरी देवी महाराष्ट्रातील अनेक जणांची कुलदेवता असल्याने भाविकांची येथे सतत वर्दळ असते. पण याच भागात असलेली एक संरक्षक वास्तु फारशी कोणाला माहित नाही. दूरवर टेहळणी करण्यासाठी असलेली हि वास्तु अंबाजोगाईचा बुरुज म्हणुन ओळखली जाते. खोलेश्वर मंदिरासमोर असलेला हा एकांडा बुरुज दूरवर टेहळणी करण्यासाठी बांधला गेला.
...
या वास्तुविषयी फारशी माहीती उपलब्ध नसुन काहींच्या मते हा बुरुज १३व्या शतकातील देवगिरीचा राजा सिंघण याचा सेनापती खोलेश्वर याच्या काळातील असुन भिल्लम यादवाचा पुत्र जैतुखी उर्फ जैत्रपाल काही काळ अंबाजोगाई येथे वास्तव्यास असताना हि गढी बांधली गेली. त्यामुळे हा बुरुज जैत्रपालची गढी म्हणुन देखील ओळखला जातो. गोलाकार आकाराचा हा बुरुज साधारण ३५ फुट उंच असुन या बुरुजाच्या आत एक कोठार होते. या कोठारातूनच बुरुजाच्या माथ्यावर जाण्याचा मार्ग होता. या कोठाराची पर्यायाने या बुरुजाची पडझड झाल्याने बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्यांचा तळातील भाग उध्वस्त झाला आहे. आपल्याला वर बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात पण तेथे कसरत करत जावे लागते. शिवाय बुरुजाची पडझड झाल्याने तेथे जाणे धोकादायक आहे. निझामाच्या काळात या बुरुजावर रेडिओ बसवला होता व त्यावरून दुसऱ्या महायुद्धाच्या बातम्या प्रसारीत केल्या जात असत. हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या वेळी येथुन दिल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे स्वतंत्र सैनिकांनी हा रेडियो पळवण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. पण य बुरुजावरील रेडियो मात्र कायमचा बंद झाला.
© Suresh Nimbalkar