अंजनडोह

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सोलापुर

उंची : १८२४ फुट

श्रेणी : सोपी

गुगल व इंटरनेटच्या काळात आज आपल्याला कोणताही परीचीत अपरिचित किल्ला सहजपणे शोधता येतो किंवा सापडतो. पण त्या किल्ल्याची थोडीफार का होईना आंतरजालावर उपलब्ध असायला हवी. पण आजही काही किल्ले या आंतरजालाला देखील पूर्णपणे अपरिचित आहेत. असाच एक किल्ला आपल्याला सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असलेल्या अंजनडोह या गावात पहायला मिळतो. सोलापूर जिल्‍ह्यातील करमाळा तालुक्‍याची राजधानी म्हणून ओळखले जाणारे अंजनडोह हे ऐतिहासिक गाव आज पूर्णपणे विस्मृतीच्या गर्तेत हरवले आहे. कधीकाळी या संपुर्ण गावाला असणारा कोट व या गावाबाहेर एका लहानशा टेकडीवर असलेला भक्कम दुर्ग कोणाला फारसा परिचित नाही. पायाला भिंगरी लावुन सतत दुर्गभ्रमंती करणाऱ्या लोकांना देखील या किल्ल्याची फारशी माहिती नाही. करोनाच्या आधी काही स्थानिकांकडून या किल्ल्याची माहिती मिळाली पण करोनाच्या बंदीमुळे किल्ल्यावर काही जाता आले नाही. ऑगस्ट २०२२ मध्ये या किल्ल्याची भटकंती केल्यावर हा किल्ला कसा अपरिचित राहु शकतो याबद्दल मला आश्चर्यच वाटले. ... अंजनडोह हे गाव करमाळा या तालुक्याच्या ठिकाणाहुन १४ कि.मी.अंतरावर तर पुणे शहरापासुन दौंडमार्गे १४५ कि.मी.अंतरावर आहे. गावात प्रवेश करताना दुरूनच आपल्याला गावाच्या डाव्या बाजूस असलेल्या उंचवट्यावर एक व व उजवीकडे नदीच्या काठावर असलेले दोन बुरुज नजरेस पडतात. कधीकाळी या गावाभोवती असे एकुण नऊ बुरुज होते व या बुरुजांना लागुनच संपुर्ण गावाभोवती तटबंदी असल्याचे स्थानिक सांगतात. पण प्रत्यक्ष या बुरुजांना भेट दिल्यावर मात्र ते तितकेसे खरे वाटत नाही. गावाच्या डावीकडे उंचवट्यावर असलेला बुरुज हा गावापासुन बऱ्याच अंतरावर असुन पूर्णपणे अलिप्त आहे. या बुरुजात वर जाण्यासाठी काहीसा उंचावर लहान खिडकीवजा दरवाजा असुन त्यातुन बुरुजाच्या माथ्यावर जाता येते. त्यातुन वर गेल्यावर संपुर्ण अंजनडोह गाव, त्यातील दोन भव्य वाडे, नदीकाठचा एक बुरुज व नदीच्या पलीकडे टेकडीवर असलेला अंजनडोह किल्ला नजरेस पडतो. या बुरुजाचे एकंदरीत स्थान पहाता हा पूर्णपणे स्वतंत्र असा टेहळणी बुरुज असुन गाव व किल्ला यावर लक्ष ठेवण्यासाठीच तो बांधला गेला असावा असे वाटते. गावात शिल्लक असलेल्या दोन बुरुजांपैकी एक बुरुज सुस्थितीत असुन दुसऱ्या बुरुजाची मात्र पडझड झाली आहे. या बुरुजा सोबत तटबंदी असण्याची शक्यता असली तरी ती कोठेही दिसून येत नाही. या बुरुजाजवळ पाण्याचा डोह असुन ते पाणी कधीही आटत नसल्याचे गावकरी सांगतात. गावात असलेले दोन मोठे वाडे व घडीव दगडात बांधलेली पक्की घरे पहाता अंजनडोह गाव हे कधीकाळी बाजारपेठेचे ठिकाण होते अशी गावकऱ्यानी दिलेली माहिती खरी असल्याची खात्री पटते. गावात असलेले दोन वाडे शिंदे यांचे असुन त्यातील एक वाडा ब्रिटीश काळात बांधलेला आहे. त्यातील जुना वाडा नेमाजी शिंदे यांचा राजवाडा म्हणुन ओळखला जातो. या वाड्यांचे साधारण १५-१६ फुट उंचीचे प्रवेशद्वार आजही शिंदे यांच्या शाही रुबाबाची साक्ष देत उभे आहे. गावचा व तेथील कोटाच्या वास्तुंचा फेरफटका आटोपल्यावर गावाबाहेर नदीच्या पलीकडे टेकडीवर असलेल्या किल्ल्याच्या दिशेने निघावे. पावसाळ्यात नदीपलीकडे असलेल्या किल्ल्यावरील मंदिरात जाण्यासाठी वाट नसल्याने गावकऱ्यांनी नदीच्या अलीकडे नव्याने मंदीर बांधून त्यात धर्माबाई आणि तुळाबाई या किल्ल्यावरील देवतांची प्रतिस्थापना केलेली आहे. या मंदिराजवळ आपल्याला एक मध्ययुगीन काळातील पायऱ्याची बारव व त्यापुढे एक गोलाकार विहीर पहायला मिळते. येथून पुढे जाणारी मळलेली पायवाट आपल्याला टेकडीवरील किल्ल्याजवळ नेऊन सोडते. किल्ल्याचा मुख्य दरवाजा तटबंदीमध्ये काहीसा उंचावर असुन त्यात जाण्यासाठी शिडी शिवाय पर्याय नाही. पण या दरवाजा शिवाय किल्ल्यात जाण्यासाठी अजून दोन दरवाजे आहेत. किल्ल्यात जाण्याचा दुसरा दरवाजा या उंचावर असणाऱ्या दरवाजाच्या पुढील भागातच आहे. हा दरवाजा बहुदा किल्ल्याचा वापर संपल्यावर किल्ल्यावरील मंदिरात सहजपणे जाता यावे यासाठी नंतरच्या काळात बांधला गेला असावा असे त्याच्या एकंदरीत बांधकामावरून वाटते. या दरवाजाची कमान पुर्णपणे ढासळलेली आहे किंवा बांधलीच नसावी असे वाटते. दरवाजाने आत शिरल्यावर एक वळण पार करून आपण किल्ल्यात पोहोचतो. संपुर्ण किल्ल्याचा परिसर साधारण अर्धा एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या मध्यभागी दगडी बांधकामात धर्मादेवीचे मंदीर आहे. या मंदिरासमोर दगडी दीपमाळ असुन मंदीराच्या पाठीमागे एका दगडी चौथऱ्यावर सुकनावती देवीचे ठाणे आहे. येथून पुढे काही अंतरावर पठाराच्या दिशेने किल्ल्यात प्रवेश करण्याचा तिसरा लहान दरवाजा आहे. या दरवाजाची कमान आजही शिल्लक आहे. किल्ल्याची तटबंदी थोड्याफार प्रमाणात ढासळली असुन या तटबंदीत लहानमोठ्या आकाराचे पाच गोलाकार बुरुज आहेत. या बुरुजावर व तटबंदीवर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत पण तोफेचा मारा करण्यासाठी झरोके कोठेही दिसत नाहीत. तटबंदीच्या आतील बाजूस काही ठिकाणी कमानिवजा दालने बांधलेली आहेत. हि दालने सैनिकाना राहण्यासाठी बांधली असावी. बाहेरून उंचावर दिसणारा दरवाजा आतील बाजूस जमिनीच्या पातळीत असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजूस पहारेकरी बसण्यासाठी देवड्या आहेत. महत्वाचे म्हणजे किल्ल्यावर सद्यस्थितीत कोठेही पाण्याची सोय दिसुन येत नाही पण दोन बुजलेली टाकी मात्र पहायला मिळतात. किल्ल्यावरील इतर वास्तु पूर्णपणे भुईसपाट झाल्याने अर्ध्या तासात आपली गडफेरी पुर्ण होते. आता थोडे किल्ल्याच्या गावाच्या इतिहासाकडे वळुया. मध्ययुगीन महाराष्ट्रातील मात्तबर घराण्यांमध्ये शिंदे घराण्यांचा समावेश होतो. अंजनडोह हे नेमाजीराजे शिंदे यांचे मूळ गाव. या गावाची पाटीलकी शिंदे घराण्याकडे होती. नेमाजीराजे शिंदे यांच्या सरंजाम पत्रात वतनी गाव म्हणून अंजनडोह गावाचा उल्लेख येतो. अत्यंत पराक्रमी अशा शिंदे घराण्यातील नेमाजीराजे शिंदे स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सहभागी झाले होते. नेमाजी शिंदे यांच्या नावाचा उल्लेख कृष्णाजी अनंत सभासद रचित "शिवछत्रपतीचे चरित्र"-पृष्ठ ८१ यात शिलेदार व मुलुखाचे सुभेदार यांच्या यादीत व इतर ग्रंथांत आलेला आहे, छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात नेमाजीराजे शिंदे हे प्रसिद्धीस आले. महाराष्ट्रांत औरंगझेबाच्या फौजांचा पराभव करण्याकडे जी सरदार मंडळी गुंतली होती त्यात नेमाजीराजे हे एक प्रमुख होते. त्यांनी इ.स. १६९८ मध्ये आठ हजार फौजेसह खानदेशांत घुसून नंदुरबार, शिरपूर, थाळनेर वगैरे गांवें लुटलीं. थाळनेरजवळ मोंगलांचा सरदार हुसेनअल्ली याचा पराभव करून त्यास कैद केले व जबर खंडणी दिल्यावर त्याची सुटका केली. पुढील वर्षी राजाराम महाराजांनी गंगथडी, खानदेश, वऱ्हाडपर्यंत जी मोहीम केली त्यात नेमाजीराजे देखील होते. मोहिमेवरून परत येतांना राजाराम महाराजांनी प्रत्येक प्रांतांत आपल्या एका सरदाराची नेमणूक केलीं, त्यांत नेमाजीराजे शिंदे यांच्याकडे खानदेश आला. त्यानंतर महाराणी ताराबाई यांच्या काळात नर्मदा नदी पार करून नेमाजीराजे शिंदे यांनी उत्तरेत मोगलांच्या अनेक प्रांतावर भगवा झेंडा फडकवला. माळवा प्रांतातील उज्जैन, काळाबाग इत्यादी प्रांतावर नेमाजींनी आपला वचक निर्माण केला. गनिमी काव्याने लढणारे नेमाजी शत्रूपक्षावर अचानक हल्ला करून गनिमांकडून आपल्या लोकांचे नुकसान होण्याअगोदर खजिना घेऊन पसार होत. खानदेशात मोगलांवर प्रचंड विजय मिळवून नेमाजींनी वऱ्हाडवर आक्रमण केले. मोगल बातमी पत्रात नेमाजी शिंदे चाळीस हजार स्वार व पायदळसह वऱ्हाड मध्ये दाखल झाल्याची नोंद आहे. मोगलांचा वऱ्हाडचा सुभेदार गाजिउद्दीन फिरोजजंग याचा नायब रूस्तमखान हा प्रचंड सैन्यासह नेमाजी वर चालून आला. नेमाजींच्या फौजेने मोगलांचा जबरदस्त पराभव केला. रूस्तमखान जखमी होऊन मराठ्यांच्या कैदेत सापडला. दोन हजार मोगली स्वार या लढाईत ठार झाले. मार्च १७०४ मध्ये नेमाजींनी माळव्यातील मालोदा या गावावर हल्ला करून तेथील खजिना स्वराज्यात आणला. पुढें शाहू महाराजांची सुटका होईपर्यंत नेमाजीराजे बहुधां खानदेशांतच सुभेदार असावेत. शाहू महाराज दक्षिणेंत आले त्यावेळीं त्यांना प्रथम मिळालेल्या मंडळींत नेमाजीराजेहि होते (१७०७). शाहु महाराजांच्या तर्फे नेमाजींनी अनेक युध्दात भाग घेतला. बहादुरशहानें कामबक्षावरील स्वारींत शाहू महाराजांची मदत मागितली असतां शाहू महाराजांच्या आदेशानुसार बहादुरशहास मदत म्हणून नेमाजींनी हैद्राबाद जवळ कामबक्षच्या सेनेवर हल्ला केला. नेमाजीराजांनी हैद्राबादनजीक चढाई करून कामबक्षाचा शेवट केला (१७०८). हुसेनअल्ली दख्खनचा सुभेदार होण्यास आला असता बुऱ्हाणपुरास दाउदखान पन्नी याची व हुसेनची लढाई झाली, त्यावेळीं नेमाजीराजे हे जवळच राहून लढाईचा परिणाम पहात होते. कारण बादशहा व हुसेन या दोघांनीं मराठ्यांकडे मदतीची मागणी केली होती. शाहू महाराजांनी त्यासाठींच नेमाजीराजेंची नेमणूक खानदेशांत केली होती. थोरले बाजीराव ह्यांनी जिवाऊ शिंदे ह्यांस लिहिलेले एक जुनें पत्र उपलब्ध असुन त्यात नेमाजी शिंदे यांच्या मराठी राज्यांतील सेवेचा यथास्थित उल्लेख असून, महिपतराव शिंदे यांनी तशीच सेवा करावी व नक्ष करावा यासाठी लिहिले आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!