अंकाई
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : २९८६ फुट
श्रेणी : सोपी
नाशिक जिल्हय़ात सहय़ाद्रीच्या मुख्य रांगेबरोबर सेलबारी- डोलबारी-अजंठा-सातमाळ अशा विविध उपरांगा धावताना दिसतात. यातील अजंठा-सातमाळ डोंगररांगेतील अंकाई-टंकाई हा एक महत्वाचा किल्ला. सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावर नियंत्रणासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली व आणि संरक्षणाच्या दृष्टीने त्याला बळकट करण्यासाठी सभोवती कात्रा मेसणा,गोरक्षगड, माणिकपुंज यासारख्या उपदुर्गांची साखळी तयार केली गेली. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी वाहतुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले अंकाई गाव मध्य रेल्वेवरील मनमाड स्थानकापासुन १० कि.मी.वर असुन मनमाड–औरंगाबाद रस्त्यापासुन १ कि.मी.आत आहे. अंकाई गावात जाण्यासाठी खाजगी वाहनांची सोय आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी मनमाड–औरंगाबाद रस्त्याकडून एक वाट असुन दुसरी वाट अंकाई गावातुन आहे. या दोन्ही वाटा दोन दिशांनी व दोन वेगळ्या दरवाजांनी अंकाई-टंकाई मधील खिंडीत एकत्र येतात.
...
यातील अंकाई गावातुन गडावर जाणारी वाट मोठया प्रमाणात वापरात असल्याने सोयीची आहे. गावात शिरताना गावामागे असलेले अंकाई टंकाई किल्ल्याचे डोंगर व त्यामधील खिंडीत असलेले तटबंदीचे बांधकाम व त्यावरील चर्या ठळकपणे नजरेस पडतात. गावातील शाळेजवळुन किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता असुन या शाळेच्या परिसरात आपल्याला १५ फुट उंच दरवाजाची कमान व त्याला लागुन ठेवलेली काही शिल्प पहायला मिळतात. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या शाळेपासून काही अंतरावर चार फुट उंच व चारही बाजुस कोरलेली सतीशिळा असुन या शिळेच्या खालील बाजुस मुर्ती व शिकारीचा प्रसंग कोरलेला आहे. टंकाई किल्ल्याच्या पाव उंचीवर किल्ल्याच्या पोटात जैन लेणी खोदलेली असुन पुरातत्व खात्याने या लेण्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. शाळेकडून या लेण्यापर्यंत जाण्यासाठी १० मिनिटे पुरेशी होतात. लेण्यातील पहिल्या गुहेत असलेल्या अंबिका या जैन देवतेला भवानी मातेचे रूप देण्यात आले आहे. लेणी पाहुन डोंगर चढायला सुरुवात केल्यावर ओबडधोबड पायऱ्यांनी १० मिनिटात आपण खिंडीतील पहिल्या दरवाजात पोहोचतो. दोन मोठया बुरुजाच्या आत लपवलेल्या या दरवाजासमोर जिभी (आडवी भिंत) बांधुन रणमंडळाची रचना केलेली आहे. किल्ल्यात आपला प्रवेश पुर्वेकडून होत असला तरी आत आल्यावर उजवीकडे वळुन दक्षिणाभिमुख दरवाजाने आपण किल्ल्यात प्रवेश करतो. दरवाजा शेजारील दोन्ही बुरुजांपासुन सुरु झालेली तटबंदी थेट अंकाई-टंकाई किल्ल्यांच्या डोंगरांना भिडली आहे. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजाची तुटलेली दारे या देवडीत ठेवली आहेत. दरवाजातुन पायऱ्या चढुन आल्यावर समोरच्या तटबंदीत मनमाड–औरंगाबाद रस्त्याकडून येणारा दुसरा दरवाजा दिसतो. दरवाजाबाहेर काही अंतर जाऊन हा दरवाजा पुर्णपणे पहाता येतो. या दरवाजाने पश्चिमेकडुन प्रवेश होत असला तरी उजवीकडे वळुन उत्तराभिमुख दरवाजानेच आपण किल्ल्यात शिरतो. या दरवाजांची रचना देखील पहिल्या दरवाजासारखीच असुन तिहेरी वळणाच्या या दरवाजाबाहेरील एक बुरुज गोलाकार तर दुसरा बुरुज चौकोनी आहे. दरवाजाच्या आतील एका बाजुस देवडी असुन दुसऱ्या बाजुने किल्ल्यात शिरण्याचा मार्ग आहे. दरवाजासमोर असलेली जिभी मात्र मोठया प्रमाणात ढासळली आहे. या दिशेची तटबंदी देखील दोन्ही किल्ल्यांच्या डोंगरांना भिडली आहे. या किल्याच्या तटबंदीच्या बांधकामात मला जाणवलेले वेगळेपण म्हणजे गडावरील तोफांचे झरोके व तोफा या नेहमी फांजीवरील भागात असतात पण या तटबंदीत तोफांच्या जागा या फांजीखाली व बुरुजाखालील तटात असुन त्यासाठी वेगळे बांधकाम केलेले आहे. या भटकंतीत अंकाई किल्ला आपले उद्दीष्ट असल्याने त्या किल्ल्याच्या अनुषंगानेच पुढील वर्णन केलेले आहे. अंकाई गावाकडील दरवाजातून आत आल्यावर उजवीकडील डोंगराचा भाग हा टंकाई किल्ल्याचा तर डावीकडील डोंगराचा भाग हा अंकाई किल्ल्याचा आहे. अंकाई किल्ल्याच्या गडफेरीस सुरवात केल्यावर थेट वरील दरवाजाकडे न जाता सर्वप्रथम खिंडीतील डाव्या बाजुला म्हणजेच अंकाई गावाच्या दिशेने असलेल्या दरवाजाकडे यावे. या दरवाजाकडून अंकाई किल्ल्याच्या डोंगराकडे पहिले असता समोर डोंगराच्या पोटात एकावर एक खोदलेल्या दोन मोठया गुहा दिसतात तर डावीकडे कातळकड्याला लागुन असलेल्या तटबंदी जवळ एक लहान गुहा दिसते. दरवाजाजवळुन कातळात असलेल्या लहानशा पायवाटेने या गुहापर्यंत जाता येते. तळातील गुहा लहान आकाराची असुन दोन खांबावर तोललेली आहे तर वरील बाजुस असलेली गुहा आकाराने मोठी असुन त्यात ५०-६० माणसे सहजपणे राहू शकतात. या गुहेत तीन दालने असुन हि गुहा म्हणजे एखादे अपुर्ण लेणे असावे. कडयाच्या तटबंदीजवळ असलेली तिसरी लहान गुहा म्हणजे पाण्याचे खांबटाके आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या गुहा पाहुन झाल्यावर तटावरील चर्या,मारगीरीच्या जंग्या, पहारेकऱ्याच्या देवड्या पहात कातळावर डावीकडे असलेल्या अंकाई किल्ल्याच्या दरवाजाकडे निघावे. या वाटेच्या सुरवातीस एका चौथऱ्यावर तीन बाजुच्या भिंती शिल्लक असलेली एक वास्तुं दिसते. हि वास्तु म्हणजे किल्ल्याच्या दैनंदिन कारभाराची सदर असावी. येथुन कातळात कोरलेल्या पायऱ्यांनी आपण अष्टकोनी आकाराच्या दोन बुरुजात बांधलेल्या किल्ल्याच्या पहिल्या दक्षिणाभिमुख दरवाजात पोहोचतो. या दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन पुढे दुसरा दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाजाच्या पुढील भागात समोरच कातळात कोरलेले गर्भगृह असलेले एक ब्राम्हणी लेणे आहे. लेण्याच्या गर्भगृहात झीज झालेली सदाशिवाची मुर्ती असुन बाहेरील भिंतीवर जय विजय कोरलेले आहेत. या शिवाय भिंतीवर अजुन काही शिल्प दिसुन येतात. लेण्यासमोरच एक लहान टाक असुन समोरील तटबंदीत झरोका असलेली पहाऱ्याची मोठी देवडी आहे. येथुन काही पायऱ्या चढुन आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजात पोहोचतो. या दरवाजा शेजारी टेहळणीसाठी लहान बुरुज बांधलेला आहे. या बुरुजावरून अंकाईच्या खालील बाजुस कडयाला बिलगलेली तटबंदी व उतारावर कातळात खोदलेले टाके पहायला मिळते. या दरवाजातुन गडावर जाणारा मार्ग उभ्या कातळात कोरलेला असुन एका बाजुस कडा तर दुसऱ्या बाजुस तटबंदीने बंदीस्त असलेल्या या मार्गावर एका रेषेत तीन दरवाजे आहे. यातील मधल्या दरवाजाची लाकडी चौकट आजही शिल्लक आहे. शेवटचा दरवाजा पार करून आपण मोकळ्या भागात येतो. येथुन वर पाहिले असता गडाचा उभ्या कड्यावर बांधलेला सहावा दरवाजा व त्याखालील पायऱ्या दिसतात. हा दरवाजा पार केल्यावर वाटेत एका लहान घुमटीत ठेवलेली मुंजादेवीची मुर्ती दिसते. येथुन वर जाणारा कातळ कोरीव पायरीमार्ग कडयात कोरलेला असुन दरीच्या बाजुस लहान भिंतीने बंदीस्त केलेला आहे. या वाटेने गडाच्या शेवटच्या सातव्या दरवाजातुन आपण गडावर प्रवेश करतो. या दरवाजाच्या दगडांची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. दरवाजातून आत शिल्यावर समोरच घडीव दगडात बांधलेला चौथरा असुन या चौथऱ्याच्या पायऱ्या चढुन आपण गडावर प्रवेश करतो. येथे डावीकडे हमामखान्याची इमारत असुन या इमारतीमागे काही अंतरावर कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. मुख्य वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक वाट डावीकडे जाताना दिसते. या वाटेवर अजुन एक पाण्याचे टाके आहे. टाके पाहुन मुळ वाटेने पुढे निघाल्यावर आपण एका लेण्यापाशी पोहोचतो. हि लेणी दोन भागात विभागली असुन एका भागात गडावरील गुरे बांधली जातात पण दुसरी गुहा मात्र सुंदर व रहाण्यायोग्य आहे. दुसऱ्या गुहेच्या मध्यभागी काही प्रमाणात कोरीव काम केलेले गर्भगृह असुन या गुहेच्या भिंतीत चार विहार कोरले आहेत. गुरे बांधलेल्या गुहेत पाण्याचे एक टाके असुन दुसऱ्या गुहेच्या बाहेरील बाजुस अजुन एक टाके आहे पण या दोन्ही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या गुहेच्या डावीकडे गेले असता थोडे उंचावर कातळात कोरलेले अजुन एक टाके आहे. हे टाके पाहुन तसेच पुढे गेल्यावर आपण सीता गुंफा म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या लेण्यापाशी पोहोचतो. या लेण्याच्या दर्शनी भागात दोन कोरीव खांब असुन दरवाजाने बंद केलेल्या या गुहेत राहण्याची चांगली सोय आहे. राहण्याच्या दोन्ही गुहेत विजेची सोय केली आहे. सीता गुंफा पाहुन मागे फिरावे व आपल्या पुढील भटकंतीस सुरवात करावी. सुरवातीस पाहिलेल्या दोन गुहांच्या पुढील भागात एका मोठया वाड्याचे अवशेष दिसुन येतात. येथुन पुढे आल्यावर डावीकडील कातळात साधारण ६-७ फुट उंचावर कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. गडावर पिण्यासाठी याच टाक्याचे पाणी वापरले जाते. टाक्याच्या पुढील भागात एक मोठी गुहा असुन या गुहेला आधुनिक स्वरूप देण्यात आले आहे. गुहेत असलेल्या तीन दालनात अगस्ती ऋषी व इतर देवदेवतांच्या संगमरवरी मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या गुहेत काही साधू राहायला असतात. मंदिराच्या आवारात नव्याने स्थापन केलेला मारुती आहे. गुहेच्या पुढील बाजुस कातळात कोरलेला २X३ फुट आकाराचा लहान दरवाजा असुन या दरवाजाच्या आत २०X२०X १५ फुट आकाराचे खांब टाके आहे. हा दरवाजा सहजपणे नजरेस पडत नाही. येथुन पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. गडाचा परिसर साधारण २०-२२ एकरवर पसरलेला आहे. इथे एक कातळात कोरलेले एक मोठे टाके असुन या टाक्याच्या मध्यभागी असलेल्या चौथऱ्यावर असलेली समाधी अगस्ती ऋषींची असल्याचे मानले जाते. स्थानिक लोक या कातळ कोरीव टाक्यास काशी तळे म्हणतात. या टाक्याच्या काठावर अजुन तीन समाधी आहेत. या टाक्याकडून गडाच्या पश्चिम टोकावर असलेली भलीमोठी वास्तु व तिचा दरवाजा नजरेस पडतो. या वास्तूकडे जाताना उजव्या बाजुस कातळात कोरलेला व काही प्रमाणात बांधीव असलेला मोठा तलाव पहायला मिळतो. तलावाच्या काठावर कातळात दोन टाकी व एक शिवलिंग कोरलेले आहे. तलावाकडून पुढे जाताना वाटेत काही चौथरे असुन टोकावरील इमारतीच्या दरवाजा अलीकडे कातळात कोरलेले लांबलचक टाके आहे. गडाच्या पश्चिम टोकावर असलेली प्रचंड मोठी इमारत म्हणजे गडावरील चौसोपी राजवाडा अथवा दरबार असावा. पुर्वाभिमुख दरवाजा असलेल्या या वास्तुचा आकार २०० X २०० फुट असुन वास्तुच्या आतील भिंतीत चारही बाजुस नक्षीदार कमानी आहेत. वाडयाची खालील भिंत घडीव दगडात बांधलेली असुन वरील बाजुस विटांचे बांधकाम आहे. वाडयाच्या मध्यभागी असलेल्या चौकात जमा होणारे पाणी बाहेर नेण्यासाठी दगडी नालीची योजना आहे. वाडयाची दरवाजाची पुर्व बाजु वगळता दक्षिण भिंतीला एक व पश्चिम भिंतीला दोन असे तीन चौकोनी बुरुजासारखे सज्जे असुन त्यावर जाण्यासाठी पायरीमार्ग आहे. यातील पश्चिमेच्या एका सज्जावर पिराची स्थापना झाली आहे. वाडयाबाहेर जाण्यासाठी पुर्वेचा मुख्य दरवाजा वगळता दक्षिणेला दोन लहान दरवाजे आहेत. यातील एक दरवाजा पालखी दरवाजा तर दुसरा नोकरचाकरांसाठी असावा. आता गडावरील भटकंतीमधील राहिलेले एकमेव ठिकाण म्हणजे गडावरची टेकडी. वाडा पाहुन अगस्ती गुहेच्या वर असलेल्या टेकडीवर चढायला सुरुवात करावी. टेकडी चढताना उजव्या बाजुस उतारावर गडावरील प्रचंड मोठा घडीव दगडात बांधलेला तलाव नजरेस पडतो. टेकडीवर ध्वजस्तंभ वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. या ठिकाणी गडाची समुद्रसपाटीपासून उंची ३०१० फुट आहे. गडावरील हे सर्वात उंच ठिकाण असुन येथुन संपुर्ण गडपठार तसेच मनमाड शहर. पूर्वेला टंकाई, दक्षिणेला गोरखगड, हडबीची शेंडी आणि कात्रा किल्ला इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. टेकडीच्या दुसऱ्या बाजुने खाली उतरल्यास आपण अगस्ती गुहेच्या पुढील भागात येतो. येथुन दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पहाण्यास २ तास पुरेसे होतात. प्राचीनकाळी अंकाई डोंगरावर अगस्ती मुनींचा आश्रम असल्याचे मानले जाते. टंकाई किल्ल्याच्या पोटात असलेली जैन लेणी व अंकाई किल्ल्यावरील ब्राम्हणी लेणी दहाव्या ते बाराव्या शतकातील असुन या लेणी किल्ल्याचे प्राचीनत्व सिध्द करतात. या किल्ल्याची निर्मिती बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या कारकीर्दीत झाली असावी. दक्षिणेकडील गोदावरीचे खोरे व उत्तरेकडील गिरणेचे खोरे, खानदेश या मुलखांवर नजर ठेवण्यासाठी यादवपुर्व काळापासूनच अंकाई किल्ल्याचा वापर केला जात असावा. पुरातत्वज्ञ डॉ. वर्मांच्या मते देवगिरीचे यादव सम्राट सिंघण याच्या कारकिर्दीत (१२००-१२४७ ) परमारांचा हा किल्ला दुर्गपाल श्रीधर याला लाच देऊन यादवांनी घेतला व त्याचे बांधकाम केले. सुरत-औरंगाबाद या व्यापारी मार्गावरील हा महत्वाचा किल्ला असल्याने इ.स.१६३५ मधे मुघल बादशहा शहाजहानचा सरदार खानजहान यानें अलका-पलका किल्ल्यासोबत हा किल्ला लाच देऊन घेतला. इ.स.१६६५ मध्यें थिवेनॉट यानें सुरत व औरंगाबाद यांच्यामधील एक महत्वाचा टप्पा म्हणुन या किल्ल्यांचा उल्लेख केला आहे. इ.स.१६९३ मध्ये मोगलांकडून सुलेमानबेग हा या किल्ल्यांचा किल्लेदार असल्याचा उल्लेख येतो. मुघलांकडुन हा किल्ला निजामाकडे गेला. फेब्रुवारी १७३४ च्या शेवगाव तहानुसार हा किल्ला मराठयांना देण्याचे निजामाने कबुल केले पण किल्लेदार अब्दुल अजीजखान याने किल्ला मराठयांच्या ताब्यात देण्यास विरोध केला. इ.स. १७५२ मधे भालकीच्या तहानुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. इंग्रज-मराठा युद्धात कर्नल मॅकडोवेल याची तुकडी ५ एप्रिल १८१८ रोजीं येथे आली. त्यांनी सहा पौंडी दोन तोफांच्या सहाय्याने पायथ्यावर हल्ला केला. तोफांचा मारा पाहुन किल्लेदारानें प्रतिहल्ला न करता किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दिला. यावेळी गडावर ३०० सैनिक असल्याचा उल्लेख येतो. किल्ला ताब्यात घेताना किल्ल्यावरील ४० तोफा, भरपुर दारुगोळा व १२००० रुपये इंग्रजांच्या हाती आले. सध्या किल्ल्यावर एकही तोफ दिसुन येत नाही.
© Suresh Nimbalkar