दुर्ग

महाराष्ट्र म्हणजे दुर्गांची खाणच आहे. महाराष्ट्रात आढळणारी दुर्गविविधता इतर कोठेही आढळुन येत नाही. हे गडकोट किल्ले ही आपली प्रेरणास्थळे तसेच जाज्वल्य इतिहासाचा वारसा आहेत. दुर्गांचे वर्णन करताना कवींद्र परमानंद आपल्या ’शिवभारत’ या ग्रंथात म्हणतात, प्रभुणा दुर्गमं दुर्गं प्रभु दुर्गेण दुर्गम:।अदुर्गमत्वा दुभयोर्विद्विषन्नेव दुर्गम:॥ "आक्रमणाय दुर्गम:,गमनाय दुर्गम: इति दुर्ग:" अशी ’दुर्ग’ या शब्दाची व्याख्या कवींद्र परमानंद यांनी केली आहे. दुर्गांचा सर्वप्रथम उल्लेख येतो तो ऋग्वेदामध्ये. तटबंदीच्या आता असलेल्या शहरांचे ’पुर’ असे उल्लेख ऋग्वेदातील ऋचांमध्ये येतात. महाभारत आणि रामायण या प्राचीन ग्रंथांमधे विशेषतः महाभारताच्या ’शांतिपर्वामधे’ दुर्गांचे स्पष्ट उल्लेख आहेत. कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामधे तर दोन प्रकरणे दुर्ग या विषयावर आहेत. यात गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भूदुर्ग यांचा उल्लेख असुन तट, बुरुज, खंदक या दुर्गवास्तु बांधणी विषयक अनेक गोष्टींचे त्यात वर्णन केले आहे. महाराष्ट्रातील पैठण येथील सातवाहन हे ज्ञात असलेले सर्वात आद्य राजघराणे. सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगांत नाणेघाटाच्या रक्षणाकरता जीवधन ,चावंड, हडसर,शिवनेरी यासारखे दुर्ग सातवाहन कुळातील सम्राटांनी निर्माण केले. ... यानंतर महाराष्ट्रात नांदलेल्या अभीर, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव यासारख्या राजसत्तानी या दुर्गसंपदेमध्ये भर घातली. पुढे इस्लामी राजसत्ता महाराष्ट्रात स्थिरावल्यावर बहमनी काळात काही स्थानिक राजसत्ता उदयास आल्या. या राजसत्तानी प्रशासकीय कार्य आणि आक्रमणांपासून संरक्षण यासाठी लहानमोठे भुईकोट बांधले. या सर्व सत्तांनी दुर्गांचा वापर केवळ संरक्षण,जकात गोळा करणे,घाटवाटांवर देखरेख करणे अशी ठराविक कार्यासाठी केला. पण शिवाजी महाराजांच्या काळात हे चित्र बदलले. "दुर्गकेंद्रित राज्यपद्धतीचा" उगम,विकास आणि उत्कर्षाचा कालखंड म्हणजे छ्त्रपती शिवरायांचा कालखंड ! ’एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गो विशिष्यते’ या कौटिल्याच्या विधानाप्रमाणे शिवछत्रपतींनी मावळातील ओसाड, दुर्लक्षित डोंगरांवर ठाणी घालून सह्यपर्वताच्या दुर्गमपणाचा नेमका वापर स्वराज्य संरक्षण आणि विस्तारासाठी केला. दुर्गमपणा हि गडाची खरी ओळख असली तरी दुर्गबांधणी करताना इतरही बाबी लक्षात घेतल्या जात असत. दुर्गाच्या आसपासची भौगोलिक रचना,संरक्षणात्मक बाजू व गडावर निवासासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा लक्षात घेऊनच दुर्गबांधणी केली जात असे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. याबाबत आज्ञापत्र सांगते.......गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा.पाणी नाही आणि ते स्थळ बांधणे प्राप्त झाले तरी खडक फोडून तळी,टाकी पर्जन्यकाळपर्य॔त संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावर झराही आहे, जसे तसे पाणी पुरते,म्हणून तितकीयावरीच निश्चिंती न मानवावी.कि निमित्य की झुंजामध्ये भांडियाचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो,तेव्हा संकट पडते याकरीता जखिरीयाचे पाणी म्हणून दोन चार टाकी तळी बांधावी.त्यातील पाणी खर्च न होऊ न द्यावे.गडाचे पाणी बहुत जतन राखावे...." कोणताही गड उभारणी करताना तेथे पाण्याची योग्य सोय करून पाणीसाठा पाहूनच करावा हे या मागचे मुख्य धोरण. या झाल्या गडबांधणी मधील सुरवातीच्या काही महत्वाच्या गोष्टी. दुर्ग म्हटले कि त्याच्या संरक्षणाची रचना त्याच्या आसमंतात असलेल्या गावापासुनच होते. यात सर्वप्रथम येतो तो घेरा.गडाचा घेरा म्हणजे गडाच्या पायथ्याशी असलेली सर्व मुलुख व गावे. यानंतर येतो तो पहारा. आसपासच्या परिसरातुन गडाकडे जाणाऱ्या मुख्य वाटा सोडून अवघड, अनवट अशा ठिकाणी खबरदारी म्हणून पहारे नेमले जात. अशा पहाऱ्याना विशिष्ट नावे व पहारेकरी असत. रात्रीची गस्त घालणे हे या पहारेकऱ्याचे मुख्य काम असे. यानंतर येते ते गडाच्या वाटेवर असलेले मेट. गडावर चढून जाताना वाटेत वस्ती असलेली जागा म्हणजे मेट. गडावर जाणा-या लोकांवर लक्ष ठेवणे हे या मेटकरांचे काम असे. या मेटांना विशिष्ट अशी नावे असत. गडाच्या सुरक्षेच्या, संरक्षणाच्या दृष्टीने ही मेटे अतिशय महत्वाची असत. यानंतर सुरवात होते ती गडाच्या प्रत्यक्ष बांधकामास. यात सर्वप्रथम दिसुन येते ती गडाच्या अर्ध्या उंचीवर असलेली तटबंदी. गडाची तटबंदी म्हणजे गडाचे चिलखत. गडाची तटबंदी ही त्याच्या भौगोलिक रचनेवर अवलंबून असते. जेथे सरळ तुटलेले कडे आहेत त्या भागात तटबंदी दिसून येत नाही तर काही वेळा गडाची एखादी बाजू कमकुवत असल्यास त्या ठिकाणी दुहेरी तटबंदी दिसून येते. प्राचीनकाळी लाकडी फळ्या किंवा मातीची असलेली तटबंदी नंतरच्या काळात घडीव दगड व विटांचा वापर करून बांधली गेली. यानंतर दिसतात ते तटबंदीत असलेले बुरुज. बुरुज म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने टेहळणी व मारगिरी करण्याची एक मुख्य जागा. गडावरील तोफा या प्रामुख्याने बुरुजावरच ठेवल्या जात. या बुरुजांना वेगवेगळी नावे असत. या बुरुजामध्ये काही वेळा दुहेरी बांधणीचे चिलखती बुरुज पहायला मिळतात. नेहमीच्या बुरूजाला बाहेरून अजून एका बुरूजाचे संर-क्षण म्हणजे चिलखती बुरूज. हल्ल्याच्या दृष्टिने नाजूक व गडाच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी असे बुरूज बांधले जात.शत्रूच्या हल्ल्यात बुरुज तटबंदी ढासळली तरी आतील बुरुज सुरक्षित रहावा यासाठी हे बांधकाम केले जात असे. किल्ला भुईकोट प्रकारातील असल्यास या तटबंदीभोवती खंदक खोदला जात असे. शत्रूला किल्ल्याभोवती भिडता येऊ नये यासाठी किल्ल्याभोवती खोदलेला मोठा चर म्हणजे खंदक. यात पाणी व मगरी, साप असे प्राणी सोडले जात. हे भुईकोट किल्ल्याभोवती एक-प्रकारचे सुरक्षाकवच असे. या खंदकावरून ये-जा करण्यासाठी काढता घालता येणारा पूल बसविला जात असे. गडाचे बुरुज-तटबंदी न्याहाळत आपण पोहोचतो ते गडाच्या मुख्य दरवाजात. गडाचा मुख्य दरवाजा महादरवाजा म्हणुन ओळखला जातो.गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने याची रचना अतिशय महत्वाची असल्याने बाहेरून तो सहजपणे नजरेस न पडावा यासाठी दोन बुरूजांमध्ये बेमुलामपणे लपवलेला असे. दरवाजावर पहारा तसेच संरक्षणाच्या दृष्टीने जंग्या झरोके बांधलेले असत. या दरवाजावर आपल्याला हत्ती, शरभ,सिंह, गंडभेरूड यासारखे प्राणी तसेच देव-देवता व पाना फुलांची विविध प्रकारची शिल्पे पहायला मिळतात. हि शिल्पे काहीवेळा तटावर व मंदिरावर देखील कोरलेली असतात. काही आकाराने मोठ्या असलेल्या गडांना महादरवाजा वगळता इतरही एक- दोन दरवाजे असत. हा मुख्य दरवाजा पूर्णपणे न उघडता या दरवाजातुन आत ये-जा करण्यासाठी असलेला लहान दरवाजा म्हणजे दिंडी दरवाजा. मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस असलेली पहारेक-यांची चौकी म्हणजे देवडी. पहारेक-यांच्या सोयीसाठी देवड्यांची रचना दरवाजातच पहायला मिळते. काही गडांच्या मुख्य दरवाजाच्या माथ्यावर नगारखाना बांधलेला असे. नगारखाना म्हणजे प्रसंगी नगारा, शिंग, तुतारी व इतर वाद्य वाजवण्याची जागा. मुख्य दरवाजाने आत शिरल्यावर आपण प्रवेश करतो ते गडाच्या माचीवर. बहुतांशी डोंगरी किल्ल्यात माची व बालेकिल्ला असे दोन भाग पडलेले असतात. माची म्हणजे बालेकिल्ल्याखालील सपाटीची जागा. मुख्य गडाच्या खालील बाजूस असलेली हि संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असे. शिवाय महत्वाच्या व्यक्ती वगळता गडावरील बहुतांशी वस्ती हि माचीवरच असे. यामुळे गडावरचे वाडे ,सदर, कोठारे ,तलाव व इतर इमारतींची बांधकामे बहुतांशी या माचीवरच पहायला मिळतात. गडाची तटबंदी पाहताना आतील बाजूने या उंच तटबुरुजावर तसेच दरवाजावर जाण्यासाठी काही ठिकाणी पायरीमार्ग बांधलेले दिसून येतात. या पायऱ्या चढुन आपण तटातील फांजीवर पोहोचतो. तटावरील भिंतीच्या आतील बाजुस फिरण्यासाठी असलेली सपाट जागा म्हणजे फांजी. पहारेक-यांना गस्त घालण्यासाठी याचा उपयोग होत असे. तट व बुरूजावरील भिंतीत बंदुकीचा, बाणांचा मारा करण्यासाठी असलेली भोके म्हणजे जंग्या. याची दिशा बाहेरील बाजूस उताराची असुन तटाच्या आडुन बाहेरील बाजूस असलेल्या शत्रुला बंदूक बाणाने सहज टिपता येईल अशी याची रचना असते. याशिवाय काही ठिकाणी तोफांची तोंडे बाहेर काढण्यासाठी मोठे झरोके बांधलेले असतात. तटाबुरुजावर असलेल्या या तोफा किल्ल्याच्या संरक्षणातील महत्वाचा घटक असुन या तोफा साधारण ओतीव व घडीव प्रकारातील असत. ओतिव म्हणजे धातू वितळवून साच्यात ओतून तयार केलेली तर घडीव म्हणजे तुकडे घडवुन नंतर गोलाकार कड्यांनी एकत्र जोडलेली. या तोफा प्रामुख्याने लोखंड अथवा मिश्र धातूच्या बनवल्या जात व त्यांच्या आकारावर त्यांची मारा करण्याची क्षमता ठरत असे. काही किल्ल्यावर आपल्याला तटाच्या भिंतीवर तसेच दरवाजावर पाकळ्यांच्या आकाराचे त्रिकोणी-पंचकोनी कोरीव दगड पहायला मिळतात. किल्ल्याचे हे दगड चर्या म्हणुन ओळखले जातात. यामुळे किल्ल्याच्या सौंदर्यात पडते तसेच याच्या आडुन शत्रूवर माराही करता येतो. तटबंदीवरून फेरी मारताना अनेकदा या तटबंदीत आपल्याला लहान दरवाजा पहायला मिळतो. चोरदिंडी अथवा चोरदरवाजा म्हणुन ओळखला जाणारा हा मार्ग संकटकाळी निसटून जाण्यासाठी वापरला जात असे. छ्त्रपतींच्या आज्ञापत्रानुसार किल्ल्यास मुख्य दरवाजा वगळता चोरदिंडी असाव्यात. यानुसार आपल्याला किल्ल्यावर असे दरवाजे तटबंदीत, गडाच्या अपरिचित बाजूला दुर्गम ठिकाणी दिसुन येतात. याशिवाय तटावर फिरताना काही किल्ल्यावर तटाच्या भिंतीत (फांजीखाली) बांधलेले शौचकुप दिसून येतात. तटबंदीत सर्वात उंच ठिकाणी असलेल्या बुरुजावर ढालकाठीची म्हणजेच ध्वजस्तंभाची जागा पहायला मिळते. गडावर असलेल्या वस्तीची सर्वात महत्वाची गरज म्हणजे पाणी. गड बांधताना सुरवातीला पाणी पाहूनच गड बांधण्यास सुरवात होई. कातळात टाकी खोदताना निघालेला दगड तटबंदी व इतर बांधकामासाठी वापरला जाई. किल्ल्यावर पाणी ही महत्त्वाची गरज असल्याने या टाक्याशिवाय तलाव व विहिरी बांधल्या जात. कित्येक गडावर उताराच्या ठिकाणी बंधारा घालुन पाणी अडविलेले पहायला मिळते. तटबंदीचा फेरफटका आटोपल्यावर माचीवर अनेक इमारती व त्यांच्याशी संबंधित वास्तु पहायला मिळतात. यातील महत्वाची वास्तु म्हणजे अंबरखाना. अंबरखाना म्हणजे गडावरील धान्य साठविण्याचे कोठार. मोठया किल्ल्यावर यासाठी स्वतंत्र इमारत असे तर लहान किल्ल्यावर हे धान्य काही गुहेत वा इतरत्र साठवले जात असे. याशिवाय गडावर असलेली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दारूकोठार. गड झुंजत ठेवण्यासाठी तोफांसाठी दारूगोळा अतिशय महत्वाचा. दारूकोठारे गडावरील वस्तीपासून दूर अंतरावर असत. बाहेरील वातावरणाचा परिणाम होऊन दारू सर्द होऊ नये यासाठी दारुगोळा इमारतीस आतील बाजुस पुर्णपणे उच्च प्रतीच्या चुन्याने गिलावा केलेला असे. दारूकोठारास रात्रंदिवस पहारा असुन परवानगी शिवाय गडावरील कोणासही आसपास फिरकु दिले जात नसे.लहान किल्ल्यावर दारुकोठार व शस्त्रागार एकत्र असे तर मोठ्या किल्ल्यावर शस्त्रागार वेगळे असे. शस्त्रागारात ढाल तलवारी, बंदूका ,चिलखत, भाले, पट्टे, कुऱ्हाडी यासारखी शस्त्रास्त्रे ठेवली जात. यानंतर गडावर असलेली दुसरी महत्वाची वास्तु म्हणजे सदर. हे गडाचे मुख्य कार्यालय असुन या ठिकाणी बैठका,तक्रारी, न्यायनिवाडे व महत्वाचे निर्णय घेतले जात. काही सदर या फक्त किल्ल्याशी संबंधित असत तर काही सदरेवर परिसरातील लोकांच्या तक्रारीचे निवारण केले जाई. लहान किल्ल्यावर सदर व किल्लेदाराचा वाडा एकत्रित असे. यानंतर गडावर असलेली दुसरी वास्तु म्हणजे वाडा अथवा राजवाडा. याठिकाणी बहुतांशी किल्लेदाराची वस्ती असे पण किल्ल्यावर राजपरिवारातील व्यक्ती आल्यास त्यांची सोय या वाड्यात केली जात असे. प्रत्येक किल्ल्यावर कोणत्या ना कोणत्या देवताचे मंदीर असतेच पण यात प्रामुख्याने आढळुन येते ते गडदेवतेचे मंदिर. कधीकाळी नंदादीप तेवत असलेली हि मंदिरे आज बहुतांशी अवशेष रुपात पहायला मिळतात. याशिवाय मुख्य दरवाजाच्या आसपासच घोडयाच्या पागा असत. याशिवाय किल्ल्यावर असणारी अजून एक वास्तु म्हणजे कैदी ठेवण्यासाठी असलेली अंधारकोठडी अथवा कैदखाना. फंदफितुरी होऊ नये यासाठी हि वास्तु शक्यतो राजवाडा व सदरेपासुन दुरच असे. गडावर फिरताना अनेक ठिकाणी आपल्याला लहानमोठे घरांचे चौथरे दिसून येतात. याठिकाणी गडावरील अधिकारी व शिबंदी यांची राहण्याची सोय असे. पुर्वीच्या काळी बांधकाम सांधण्यासाठी व गिलावा करण्यासाठी चुना वापरला जात असे. हा चुना बनविण्यासाठी असलेले चुन्याचा घाणा व त्याचे दगडी चाक आजही आपल्याला अनेक किल्ल्यावर पहायला मिळते. माचीवरील उंचवट्यावर अथवा टेकडीवर बंदिस्त केलेला किल्ल्याचा दुसरा भाग म्हणजे बालेकिल्ला. साध्या सरळ भाषेत बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यावरील सर्वोच्च जागी असलेला दुसरा किल्ला असे. यावर किल्ल्यावरील महत्वाच्या वास्तु तसेच राजपरीवाराची राहण्याची सोय असे. दुर्गभ्रमंती करत असताना आपल्याला गडावर, पायथ्याशी गावांमध्ये समाधी,विरगळ,सतीशिळा,शिलालेख यासारखे अनेक अवशेष पहायला मिळतात. विरगळ हे लढाईत धारातीर्थ पडलेल्या योध्याच्या स्मरणार्थ उभे केले जात तर समाधी शुरविरांच्या, राजघरा-ण्यातील व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधली जात असे. या व्यक्तीबरोबर त्याची पत्नी सती गेली असल्यास तिची आठवण म्हणुन सतीशिळा कोरली जात असे. याशिवाय गडाच्या परिघात असलेल्या शिलालेखातुन आपल्याला किल्ल्यांच्या बांधकामाचा तसेच विविध राजवटींचा ऐतिहासिक उल्लेख मिळतो. ब्राह्मी,पर्शियन व देवनागरी भाषेत दगडावर कोरलेले हे शिलालेख उठावदार तर काही वेळा खोदीव असतात. गिरीदुर्गावर भटकंती करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात गुहा पहायला मिळतात. यातील काही गुहा नैसर्गिक तर बहुतांशी गुहा प्राचीन काळापासून मानवनिर्मित आहे. अनेकदा या गुहा म्हणजे एक प्रकारचे लेणेच असते. या गुहांचा वापर गडावर अनेक गोष्टींसाठी केला जात असे. गिरिदुर्गावर दिसणारे अजून एक निसर्गनवल म्हणजे नेढे. नेढे म्हणजे गडाच्या डोंगराला आरपार पडलेले भगदाड. याशिवाय महत्वाच्या गडावर खलबतखाना,वस्त्रागार, कोषागार,दफ्तरखाना, टांकसाळ, हत्तीशाळा, तालीम यासारख्या गोष्टीसाठी स्वतंत्र वास्तू असत. दुर्गावर असणाऱ्या या वास्तुंमुळे काही दुर्ग म्हणजे परिपुर्ण नगरच असे. दुर्गभ्रमंती करताना डोळस भटकंती केल्यास यातील अनेक वास्तू सहजपणे ओळखता येतात. चला तर मग या दुर्गांची भटकंती करायला !!!!!!
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...
Image1
ABC
अक्षरानुसार
Category-Icon
प्रकारानुसार
Map-Icon
जिल्ह्यानुसार
श्रेणीनुसार
error: Content is protected !!