पाचाड- राजमाता जिजाऊ मासाहेब समाधी
प्रकार : समाधीस्थळ
जिल्हा : रायगड
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अनमोल रत्न अन हे रत्न ज्या उदरातून जन्माला आले त्या जिजाबाई शहाजी भोसले म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या राजमाता. १२ जानेवारी १५९८ ते १७ जून १६७४ असे उणेपुरे ७८ वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. सिंदखेडचे लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊ या कन्यारत्नाचा जन्म झाला. इ.स.१६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंच्या दोन जिवंत पुत्रांपैकी थोरला संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजीराजांची जबाबदारी जिजाबाईंवर होती. शिवराय १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी पुण्याच्या जहागीरीवर त्यांची रवानगी केली व पर्यायाने जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर आली. उजाड झालेले पुनवडी गाव त्यांनी नव्याने वसवले. याच काळात त्यांनी शिवरायांना राजकीय व लष्करी शिक्षण दिले.
...
शिवरायांच्या पश्चात जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेऊन असत इतकेच नव्हे तर सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत असत. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांची संपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली. महाराज आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची जबाबदारी जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली. शिवाजी राजांचा राजाभिषेक हा सुवर्णक्षण पाहून राजाभिषेकानंतर बारा दिवसांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. या महाराष्ट्र कन्येचा जन्म विदर्भात, विवाह मराठवाड्यातील भोसले कुळात तर बहुतांशी वास्तव्य घाटमाथ्यावरील मावळात व आयुष्याचा उत्तरार्ध कोकणात असे संपुर्ण महाराष्ट्रात आयुष्य व्यतीत केल्यावर या राजमातेने पाचाड मुक्कामी १८ जून १६७४ रोजी पहाटे शेवटचा श्वास घेतला. पाचाड येथील त्यांच्या वाडयापासुन जवळच असलेल्या ओढयाकाठच्या पटांगणावर त्यांच्यावर अग्निसंस्कार केले गेले. त्यानंतर महाराजांनी या ठिकाणी एका लहान चौथऱ्यावर त्यांचे सुंदर समाधी वृंदावन उभारले. काळाच्या ओघात पडझड झालेल्या या समाधीचा फलटणचे संस्थानिक श्रीमंत मालोजीराव उर्फ नानासाहेब नाईक निंबाळकर यांनी १९४३-४४ दरम्यान जीर्णोद्धार केला. समाधीच्या या चौथऱ्यावर हाती तरवार घेतलेला जिजामातेचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे. किल्ले रायगडला भेट दिल्यावर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड कोटातील आऊसाहेबांचे निवासस्थानाला भेट देऊन नंतर समाधीचे दर्शन घेणे ओघानेच येते. वयोमानाप्रमाणे राजमाता जिजाऊंना गडावरची थंड हवा मानवत नसल्याने महाराजांनी गडाच्या पायथ्याशी भक्कम तटबंदीच्या आत राजमातेच्या इतमामाला साजेसा वाडा बांधला होता. मुंबईहून गोवा महामार्गाने माणगाव पार केल्यावर डावीकडे रायगडला जाणारा रस्ता आहे. मुंबईहुन माणगावमार्गे पाचाड हे अंतर १५७ कि.मी.आहे तर महाडमार्गे १८२ कि.मी.आहे. या रस्त्याने पाचाड गावात जाताना रस्त्याच्या उजवीकडील बाजुस हा कोट नजरेस पडतो. कोट पाहुन झाल्यावर कोटापासून काही अंतरावर असलेल्या जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेता येते. ज्या जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली त्यांच्या समाधीचे दर्शन घेतल्या शिवाय आपली रायगडवारी पूर्णच होऊ शकत नाही.
© Suresh Nimbalkar