पांडे महाल
प्रकार : स्मारक
जिल्हा : भंडारा
श्रेणी : सोपी
भंडारा शहराच्या मध्यभागी भंडारा जिल्ह्याचा गौरव म्हणून ओळखली जाणारी पांडे महाल हि वास्तु आहे. अठराव्या शतकात लॉर्ड हेस्टिंगच्या काळात सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी रायबहादूर यादवराव पांडे यांनी हा महाल बांधला होता. १८९६ मध्ये या महालाचे काम पूर्ण झाले. हा महाल सुमारे ६० हजार वर्ग फूटमध्ये असून महालात २०० हुन अधिक खोल्या आहेत. या सर्व खोल्या व दिवाणखाने कलाकृतीने सजलेले असुन त्यात नृत्य सभागृह तसेच पूजाघरही आहे. बेल्जियम काचेचे भव्य आरसे, झुंबर, इटालियन मार्बल टाईल्स, फवारे, सुंदर नक्षीकाम व भव्य आकर्षक बांधणी यामुळे पांडे महाल भंडाऱ्याचे भुषण आहे. आज मात्र या महालाची अवस्था अतिशय दयनीय आहे. महालाची स्थिती जीर्णावस्थेत पोहोचल्याने पांडे कुटुंबिय महाल सोडून नागपूर येथे स्थायिक झाले आहेत. दुर्लक्षामुळे महालाची स्थिती नाजूक झाली असुन जागोजागी प्लॉस्टर निघालेले आहे. लोखंडी बीम पावसामुळे नष्ट होऊन काही भाग तुटून खाली पडलेला आहे. वरचा मजला नाजूक अवस्थेत असल्याने तो कधीही जमीनदोस्त होऊ शकतो.
...
मुख्य दरवाजाने आत प्रवेश केल्यावर समोरच एका दालनात यादवराव पांडे यांचा संगमरवरी पुतळा आहे. संपुर्ण महाल फिरणे धोकादायक असल्याने केवळ याच ठिकाणाहुन महाल पहाता येतो. याशिवाय सोबतच देवघरच्या भागात असलेल्या छपरीतील ऐतिहासिक वस्तू पहाता येतात. पुरातत्व विभागाने महालाचे सर्व्हेक्षण करून घेतले असुन सर्वेक्षणानंतर पुरातत्व विभागाने या महालला पुरातन वास्तू (हेरिटेज बिल्डिंग) म्हणून घोषित केले आहे. यादवराव पांडे इंग्रजांच्या काळात भंडारा सुभ्याचे मानद कमिश्नर होते. ७७ गावांची मालकी त्यांच्याकडे होती. नागपूरकर भोसल्यांचे ते सावकार होते. १८९८ मध्ये इंग्रजांनी पोलीस कारवाईने या महालावर मालकी मिळवली होती परंतु १९०१ मध्ये पांडे महालाचे मालकी हक्क गणपतराव पांडे यांना सुपूर्द केले गेले. पांडे परिवारही आर्थिकदृष्टय़ा खचलेला असुन खाजगी मालकी हक्कामुळे पुरातत्व खात्याचे येथे फारसे लक्ष नाही. वेळीच लक्ष न दिल्यास हि वास्तु येणाऱ्या काळात नष्ट होण्याची शक्यता आहे. पांडे महालात बसणारा गणपती भंडारा शहराचा गणपती मानला जातो.
© Suresh Nimbalkar