नाणेघाट

प्रकार : प्राचीन घाटमार्ग

जिल्हा : पुणे

सुमारे दोन हजार वर्षापूर्वीपासून दळणवळणासाठी कोकणातून घाटावर जाणाऱ्या घाटवाटा सह्याद्रीच्या कडेकपारीत अनेक ठिकाणी आढळतात. तत्कालीन राजांनी व्यापारासाठी हे घाटरस्ते तयार केल्याचे दिसून येते. यापैकी नाणेघाट, माळशेज, अहुपे, गायधारा हे घाट व्यापारी वाहतुकीसाठी दगडांनी बांधण्यात आले होते. सध्या या घाटांपैकी बहुतेक घाट कोसळले आहेत तर काही बंद आहेत. आजही सह्याद्रीच्या पायथ्याजवळील स्थानिक लोक या घाटवाटांचा वापर करतात. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश करून जुन्नर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या सातवाहन राजांनी इ.स.पुर्व २५०ते इ.स.२५० या कालखंडात सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी जुन्नरजवळ डोंगर फोडून कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट बांधला व त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जिवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी किल्यांची निर्मिती केली. ... हा घाट मुरबाडच्या पूर्वेस ३० कि.मी. कल्याणपासून ६४ कि.मी. तर जुन्नरपासून ३० कि.मी. अंतरावर आहे. या घाटात प्रवासी, व्यापारी, सैनिक यांच्यासाठी ठिकठिकाणी पाण्याची टाके, निवासासाठी लेणी खोदण्यात आली. प्राचीन काळी सुपारक म्हणजेच सोपारा आणि कल्याण ही पश्चिम किनाऱ्यावरची दोन अत्यंत महत्त्वाची बंदरे होती. केवळ देशांतर्गत नव्हे तर परदेशाशी व्यापार येथुन होत असे. कल्याण-नाणेघाट-जुन्नर-नगर-पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. त्या काळी जगभरातील व्यापारी सोपारा-कल्याण बंदरावर आपला माल घेऊन येत असत. हा माल घोडे-खेचर अथवा बैलावर लादुन सातवाहनांची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. सातवाहन काळ ते पेशवाईपर्यंत या घाटात राबता होता. मुंबई-पुणे व मुंबई-नाशिक हे महामार्ग इंग्रजांच्या काळात बांधल्याने नाणेघाटाचे महत्त्व कमी झाले. नाणेघाट हे प्राचीन व्यापारी घाटवाटेचे उत्तम उदाहरण आहे. मुंबईहून नाणेघाटाला यायचे असल्यास कल्याण मुरबाड मार्गे वैशाखरे गावी यावे . तेथून काही अंतरावर नाणेघाटाचा पायथा आहे. वैशाखरे गावाची उत्पत्ती गझेटियरमध्ये वैश्यगृह अशी दिलेली आहे. हे गाव व्यापाऱ्यांचा व लमाणांचा घाट चढण्याआधीचा पडाव असावा. या गावात व्यापाऱ्यांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी इमारती बांधल्या गेल्या होत्या. पुण्याहून नाणेघाटाला यायचे असल्यास पुणे-जुन्नर मार्गे घाटघरला यावे. घाटघरपासून ५ कि.मी.अंतरावर नाणेघाट आहे. स्वतःचे वाहन असल्यास या मार्गे घळीच्या तोंडापर्यंत जाता येते. घाटघर वाटेने जाताना घाटावरील विस्तीर्ण पठार व नानाचा अंगठा आपले लक्ष वेधुन घेतो. नानाचा अंगठा आणि त्याशेजारील डोंगर फोडून नाणेघाट बनवण्यात आला आहे. या घाटाचे एक टोक वर घाटघरच्या दिशेला तर दुसरे टोक खाली कोकणात वैशाखरे गावाच्या दिशेला आहे. खिंडीच्या तोंडाशी उजव्या बाजुला जकातीचा दगडी रांजण व शेजारी काही जुन्या बांधकामाचे अवशेष आहेत. रांजणाचे तोंड साधारण दोन फूट असुन घेरा चार फूट तर उंची पाच फुट आहे. हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असावा. नाणेघाटाचा वापर केल्याबद्द्ल व्यापाऱ्याकडून कर म्हणुन जमा केलेली जकात त्या काळातील कर्षापण या नाण्याने या रांजणात टाकली जात असे. डाव्या बाजुला एका छोट्याश्या गुहेत गणपतीची मूर्ती असुन या गुहेशेजारी काही पायऱ्या कोरल्या आहेत. या पायऱ्यांच्या वरील बाजुस खडकात पाण्याची तीन टाकी खोदलेली असुन काही अंतरावर खडकातच पाच मोठे कोनाडे खोदले आहेत. याचे प्रयोजन लक्षात येत नाही. नाणेघाटाची नळी १३० फुट लांब आणि ५ ते १० फुट रूंद आहे. या नळीत प्रवेश केल्यावर सुरुवातीला असलेला तीव्र उतार दगडानीं बांधून काढला आहे. या नळीत साधारण दीडशे फुट आत आल्यावर उजव्या बाजुला दोन साध्या गुहा असुन डाव्या बाजुला कातळात कोरलेली ३०x३० आकाराची सुंदर आणि प्रशस्त गुहा दिसते. या गुहेत ४० जण सहजपणे राहू शकतात. नानाच्या अंगठ्याच्या पोटातच ही गुहा बांधून काढलेली आहे. ही गुहा म्हणजेच सातवाहनांचे देवकुल. सध्या या गुहेला साजेशी लाकडी जाळी बसवण्यात आली आहे. या गुहेशेजारी उजव्या बाजुला खडकात खोदलेली पाण्याची सात भुमिगत टाकी आहेत तर डाव्या बाजुला दोन भुमिगत टाकी आहेत. त्यातील काही टाक्यांमध्ये पिण्यायोग्य पाणी आहे. गुहेच्या वरील बाजुस काही नैसर्गिक कपारी दिसुन येतात. गुहा सोडून थोडेसे खाली गेलो कि वळणावळणाची वाट खाली उतरताना दिसते. या वाटेला लोखंडी कठडे लावलेले आहेत. मुंबईवरून वैशाखरे येथुन येताना आपण या वाटेने घाट चढून वर येतो. घाट चढून परत वर आल्यावर १५ मिनिटातच सोपी चढण चढून आपण नानाच्या अंगठ्याच्या सुळक्यावर पोचतो. इथे सह्याद्रीच्या धारेला वळसा असल्याने व त्यात नानाचा अंगठा मध्यभागी असल्याने लांबवरचा प्रदेश नजरेस पडतो. भीमाशंकर, सिद्धगड, गोरखगड, सर्वात उंच धाकोबाचे टोपीसारखे शिखर, सपाट माथ्याचा दुर्ग, जीवधन, वानरलिंगी हे डावीकडे तर उजवीकडे वऱ्हाडाचे सुळके, भैरवगड, हरिश्चंद्रगड, घनचक्करची रांग हे सर्व दिसते. हा सुळका तीनही बाजुंनी तुटलेला असल्याने वर फिरताना जरा सांभाळूनच फिरावे लागते. नाणेघाटात पर्यटकांची वर्दळ असल्याने घाटाच्या वरील बाजुस तीन चार ठिकाणी घरगुती जेवणाची चांगली सोय होते.मुंबई पुणेकरांना कोणत्याही ऋतुत एका दिवसात नाणेघाटाचा ट्रेक सहजपणे करता येतो. सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याची पत्नी राणी नयनिका हिच्या अधिपत्याखाली नाणेघाट व इथली गुहा कोरण्यात आल्याचा शिलालेख येथील गुहेत कोरलेला आहे. या गुहेत तिन्ही भिंतीवर ब्राह्मी लिपीत लिहिलेला सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचा २० ओळींचा शिलालेख असुन या शिलालेखात सातवाहन राजांची, त्यांच्या वंशाची आणि त्यांनी केलेल्या यज्ञांची माहिती मिळते. येथील एका लेखात सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ, दानधर्माचे उल्लेख आहेत. सातवाहन राजांनी दोनदा अश्वमेध यज्ञ केल्याची याशिवाय वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ असे तब्बल २२ यज्ञ पार पडल्याची माहिती हे लेख देतात. हजारो गाई, शेकडो हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र-अलंकार आणि तत्कालीन सातवाहनांची कार्षांपण या नाण्यांचा मोठा दानधर्म केल्याचाही यात उल्लेख येतो. यम, इंद्र, चंद्र, सूर्य या वैदिक देवतांचेही उल्लेख इथल्या शिलालेखात सापडतात. प्राचीन भारतातील आकाराने सर्वात मोठा असा हा शिलालेख आहे. गुहांमध्ये सातवाहनांचे वंशजांचे सात पुतळे होते. प्रत्येक पुतळ्यावर त्यांची नावेही लिहिली होती. पण सध्या त्यांचे केवळ पायांचे भाग शिल्लक आहेत. ती नावे अशी १)सिमुक सातवाहन - हा या कुळाचा आद्य संस्थापक नाही. सातवाहन नामक राजाच या घराण्याचा संस्थापक. सिमुक ह्या त्यानंतरच्या दोन तीन पिढ्यातील असावा. २) राणी नयनिका - ही सिमुकाची सून आणि प्रथम सातकर्णीची पत्नी. ३) सातकर्णी - हा प्रथम सातकर्णी आणि सिमुकाचा पुत्र व पुढील तिघेही सातकर्णी आणि नयनिकेचे पुत्र ४)भायल- हा अल्पायुषी होता. ५) हकुसिरी अथवा हकुश्री- हा अल्पकाळच राज्यपदावर होता. ६) कुमार सातवाहन अथवा वेदिश्री सातवाहन- हा पराक्रमी सातवाहन राजा झाला आणि सातवी मूर्ती आहे ती ७) महारठी त्रिनकयीर अथवा त्रिणकवीर- हा सातवाहनांचा अमात्य व नयनिकेचा पिता असल्याने याची मूर्ती येथे कोरण्यात आली. त्रिनकयीराचे सातवाहन साम्राज्यामध्ये फार मोठे योगदान होते असे दिसते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!