जोगेश्वरी
प्रकार : शैव लेणी
जिल्हा : मुंबई
जोगेश्वरी लेणी मुंबई उपनगरात जोगेश्वरी रेल्वे स्टेशन पासुन २ कि.मी.अंतरावर आहेत. येथे जाण्यासाठी जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपासुन रिक्षा उपलब्ध आहेत. जोगेश्वरी लेणी हि बौद्ध आणि वैदिक धर्मीय लेण्याचा सुंदर संगम असुन इथे वैदिक आणि बौद्ध लेणी मंदिरे शिल्पे आहेत. या लेण्याचा निर्मितीचा काळ साधारणपणे १५०० वर्षापूर्वी म्हणजेच इ.स.५२० ते इ.स.५५० मानला जातो. या लेणी महायान बौद्ध स्थापत्यांच्या शेवटच्या टप्प्यातील तर वैदिक धर्माच्या पुनर्स्थापनाच्या काळातील आहेत. हि लेणी ब्राहामनीय शैलोत्कीर्णातील असुन याचे साम्य घारापुरीतील आणि वेरुळमधील एका लेण्याशी आढळून येते. या लेण्याचे खोदकाम वाकाटक राजवंशाच्या अधिपत्याखाली झाले असावे तर काही संशोधकांच्या मते हे लेणे मौर्यकालीन असावे. अजिंठा लेणी काम बंद झाल्यावर आणि घारापुरी लेण्याचे काम सुरु करण्यापूर्वी मधील काळात जोगेश्वरी लेणी उत्खनन केले गेले.
...
या बांधकामात केवळ हातोडा आणि छीन्नीचा वापर करून हि लेणी पूर्णत्वास नेली गेली. पहिल्या आणि दुसऱ्या शतकात इ.स.पू. वाकाटक राजवंश यांच्या नेतृत्वाखाली लेणी घडत होती. नंतर सहाव्या शतकात याच भागात वैदिक समाजाने देखील गुहा मंदिर निर्माण ही परंपरा दत्तक घेतली. अजिंठा पासून काही कारागीर पश्चिमेस आले आणि पहिली वैदिकधर्मीय गुहामंदिर जोगेश्वरी लेणी बांधकाम सुरु झाले. या लेणीतील शिल्पामध्ये लकुलीश, कल्याण सुंदरमुर्ती, नटराज,रावणाला अनुग्रह देणारा शिव,सारीपाट खेळणारे शिव-पार्वती, आयुध पुरूष आणि द्वारपाल यांच्या सुंदर प्रतिमा आहेत. प्रसिद्ध इतिहासकार आणि विद्वान वाल्टर स्पिंक यांच्यामते जोगेश्वरी लेणी हे लांबीच्या दृष्टीने हिंदूचे सर्वात मोठे हिंदु गुहा मंदिर आहे. जोगेश्वरी लेण्याच्या आत शिरण्यासाठी पुर्व व पश्चिम अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. हि दोन्ही प्रवेशद्वारे खडकाने वेढली असुन हा खडक कोरूनच लेण्याचे प्रवेशर बनविण्यात आले आहे. लेण्याच्या पश्चिम प्रवेशद्वारातून आत आल्यावर सर्वप्रथम एक मोठा सभामंडप लागतो. या सभामंडपाच्या मध्यभागी चार दिशांना भिंतीपासून विलग असे सहा सहा खांब एका ओळीत कोरलेले आहेत. या चोवीस खांबाच्या मध्यभागी लेण्यातील जोगेश्वरी देवीचे मुख्य मंदिर (गाभारा) लांबी रुंदी ३० x ३० कोरलेले असुन या मंदिरात जोगेश्वरी (योगेश्वरी) देवीचे पाऊल कोरण्यात आले आहे. योगेश्वरी या शब्दाचा अपभ्रंश होऊन जोगेश्वरी बनले आहे जे या भागाची ओळख आहे. हि देवी काही मराठी समाजाची कुलदेवता असुन त्यांच्याकडून तिची उपासना केली जाते. गुहेतील भिंतीवर विविध मूर्तीची अतिशय सुंदर शिल्पे कोरण्यात आली असुन गुहेच्या भिंतींवर अनेक खांब तयार करण्यात आले आहे.या सभामंडपाच्या बाहेर एका बाजूस मोकळा व्हरांडा असुन सभामंडपातून तेथे जाता येते. या व्हरांडयाच्या भिंतीवर आणि येथून सभामंडपात येणाऱ्या दरवाजावर देखील नाजूक जाळीदार नक्षीकाम आणि शिल्पे कोरण्यात आली आहेत. व्हरांडयाच्या या बाजूसच शिवलिंग असणारे शिवमंदिर लेणे आणि हनुमान मूर्ती असणारे लेणे आहे. या गुहा मंदिराला पाणी पुरवठा करण्यासाठी येथे पाण्याची दोन टाकी खोदलेली आढळतात. याशिवाय लेण्यात अजून दोन लेणीमंदिर अनुक्रमे गणेश मंदिर आणि दत्तात्रय मंदिर आहे पैकी गणेश लेण्यात गणेश मूर्ती कोरलेली असुन दत्तात्रय मंदिरात दगडालाच शेंदूर फासण्यात आला आहे. सभामंडपात प्रवेश करणाऱ्या पूर्व दिशेला मोकळा चौक असुन शेजारी दोन्ही बाजूस बंदिस्त व्हरांडा आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल कोरलेले आहेत व वरील बाजूस शिव पार्वतीचा विवाह प्रसंग कोरलेला आहे. या चौकाच्या पुढे लेण्याचा उर्वरित भाग असुन येथे गणेशमंदिर लेणे आहे व त्यासमोर अजून एक व्हरांडा आहे. यापुढील पायऱ्यानी आपल्याला पुर्व बाजूस बाहेर पडता येते व लेण्याला पुर्ण वळसा घालून पहिल्या मजल्यावर असलेल्या दत्तमंदिर लेण्यात जाता येते. येथे लेण्याचे संपुर्ण दर्शन पुर्ण होते. निसर्गतः जोगेश्वरी मंदिर लेणीची झीज होऊन थोडाफार नाश झाला आहे व उरलेले काम मानवाने केलेल्या अतिक्रमणाने होत आहे. सध्या हे लेणी पूर्णतः अतिक्रमणाने वेढली आहेत आहेत आणि या घरातील सांडपाणी लेण्यांमध्ये पाझरत असुन हे पाणी लेण्यातच साठत आहे आणि त्यामुळे लेण्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याद्वारे हि लेणी संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली गेली आहे.
© Suresh Nimbalkar