जटायु मंदीर

प्रकार : मध्ययुगीन मंदीर

जिल्हा : नाशिक

सर्वतीर्थ टाकेद हे इगतपुरी तालुक्यातील प्राचीन व धार्मिक महत्त्व असलेले तीर्थक्षेत्र आहे. टाकेद येथे जटायूचे मंदिर असुन या ठिकाणी महाशिवरात्रीला नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरते. सीताहरण आणि जटायू ही रामायणातली प्रसिद्ध कथा ज्या ठिकाणी घडली असे सांगितले जाते ते स्थान म्हणजे टाकेद होय. पंचवटी येथून सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमार्गे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला. रावण व जटायु यांच्यात झालेल्या युद्धात रावणाने जटायुचे पंख छाटले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला. सीतेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असता त्यांना श्रीराम- श्रीराम असा धावा करीत असलेल्या रक्तबंबाळ जटायूचा आवाज ऐकू आला. जटायुने रामाला सीताहरणाची घटना सविस्तर सांगितली. प्रभू रामचंद्रांनी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला व रावणाशी युद्ध करून जखमी झालेल्या जटायूला पाणी पाजण्यासाठी सर्व तीर्थांना बोलाविले व निर्माण झालेले पाणी जटायुला पाजले. ... ते प्यायल्यावर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले. मुंबई- नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर- घोटी गाव आहे. घोटी गावतून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदऱ्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावरच टाकेद गाव आहे. घोटीपासून टाकेदला पोहचण्यास पाऊण तास लागतो. नाशिकवरून इगतपुरी घोटीमार्गे टाकेदचे अंतर ४५ किमी आहे. टाकेद गावाबाहेरच राममंदिर असुन तिथे जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलेले आहे. इथे बारामाही वाहणारा झरा असुन काळ्या पाषाणात बांधलेले कुंड आहे. या मंदिर संकुलात जटायु मंदिर, दत्त मंदीर, महादेव व हनुमान मंदीर आहे. मुख्यकुंडाच्या जवळच बाहेर एक पिंड असून त्या पिंडीच्या आत जमीनीत एक गुळगुळीत दगड ठेवला आहे. मनात इच्छा ठेवून तो एका हाताने बाहेर काढल्यास इच्छापुर्ती होते अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. आड- औंढा-पट्टागड -बितंगगड अशा दुर्गम किल्ल्यांनी व्यापलेला हा सारा प्रदेश आहे पण जटायु मंदिर मात्र दुर्मीळच म्हणायला हवे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!