गिर्ये रामेश्वर

प्रकार : मध्ययुगीन शिवमंदिर

जिल्हा : सिंधुदुर्ग

कोकणभूमीतील देवगड तालुक्यातील गिर्ये गावाजवळचे शिवशंकराचे स्थान म्हणजे श्रीदेव रामेश्वर. या मंदिराला व स्वयंभू रामेश्वराच्या पिंडीला दैदिप्यमान अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. रामेश्वर मंदिराचा जवळ जवळ 300 वर्ष जुना इतिहास आहे. मंदिराची बांधणी कोकणातल्या सर्व मंदिरांपेक्षा वेगळी अशी आहे. हे मंदिर खोलगट भागात असल्याने समोरून किंवा मुख्य रस्त्यावरून दिसत नाही. रस्त्यावरून फक्त मंदिराची हल्लीच्या काळातच रंगवलेली कमान दिसते. कमानी खाली उभे राहून खाली पाहिल्यास अजुन एक छोटी कमान दिसते. त्या भव्य कमानीतून आत जाण्यासाठी 150 मी. लांब, 15 मी. खोल असा जांभ्या दगडाच्या अखंड खडकातून खोदून मार्ग बनविलेला आहे. मंदिर साधे, कौलारू असून समोर पाच दीपमाला आहेत. कौलारू मंदिराच्या चारी बाजूस घनदाट झाडी आणि जंगल आहे. ... आत शिरल्यावर मंदिराच्या लाकडी खांबावर केलेले त्या काळ्चे कोरीव काम देखील लक्ष वेधून घेणारे आहे. गाभाऱ्यात शिरल्यावर आत मध्ये अजुन एक छोटा गाभारा आहे त्यात प्राचीन काळीन शंकराची पिंडी दिसते. बाहेर एक भव्य नंदी आहे. उजव्या बाजूस एक रिकामा छोटा देवारा आहे, त्यात पुर्वी रामेश्वराची नंदीवर स्वार झालेली सुमारे 3 फुट उंच ५० किलो वजनाची शुध्द चांदीची बनवलेली,चतुर्भुज श्री शंकराची प्रासादिक मूर्ती होती ती आता तिथून हलवण्यात आली आहे. मंदिराच्या वास्तूस्वरूपावरून या मंदिराचा विकास व विस्तार तीन वेळा करण्यात आलाय. श्री देव रामेश्वर या मूळ मंदिराची स्थापना इ. स.च्या १६व्या शतकात किंवा त्यापूर्वीही झाली असावी असे त्याच्या मांडणी व मंदिरातील कलाकुसरीवरून अनुमान काढता येईल.१८व्या शतकाच्या पूर्वार्धात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मूळ स्थानाभोवती दगडी गाभारा बांधला . मंदिराच्या चारही दिशेस प्रवेशद्वारे आहेत हे या मंदिराचे वैशिष्टय़ आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र संभाजी आंग्रे हे येथील आरमाराचे प्रमुख झाले. ते शिवभक्त होते. त्यांचे दुसरे बंधू सखोजी आंग्रे यांच्या सोबतीने श्री देव रामेश्वर मंदिराच्या मूळ गाभा-यापुढे कलाकुसरीने मढवलेले लाकडी खांबाचे सुंदर मंडप उभारले.सभोवती प्रदक्षिणा मार्ग बांधून मंदिर बंदिस्त केले. तसेच मंदिराभोवती फरसबंदी प्रांगण करून पश्चिम आणि दक्षिण दिशेला प्रवेशद्वारे बांधली. संभाजी आंग्रे यांनी रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. अनेक लोकोपयोगी कामे केली. पण ते अल्पायुषी ठरले. त्यांचे निधन जानेवारी १७४२ साली झाले. त्यांची समाधी व सती गेलेल्या सखीची समाधी याच मंदिराच्या दक्षिण दरवाजाशेजारी सुस्थित अवस्थेत आहे.इ. स. १७६३ साली श्रीमंत माधवराव पेशवे यांनी कोकण किनारपट्टीवर आपली हुकूमत ठेवण्यासाठी सरदार आनंदराव धुळप यांना ‘सुभेदार सिबत आरमार’ हा हुद्दा बहाल केला.५ एप्रिल १७८३ रोजी रत्नागिरीच्या किना-यावर इंग्रजांशी झालेल्या युद्धात त्यांचा पाडाव करून सर्व सैन्य व जहाजे पकडून विजयदुर्ग बंदरात जेरबंद केली. १७९२-९३ साली आनंदराव धुळप यांनी एका पकडलेल्या जहाजावर मिळालेली एक अजस्र घंटा पुढे कृष्णराव धुळप यांनी १८२७ साली याच रामेश्वराला अर्पण केली. मंदिराच्या प्रवेशद्वारावर टांगली असून ती आजही चांगल्या स्थितीत आहे. घंटेवर १७९१ सालचा उल्लेख आहे. जिंकलेल्या संतान नामक जहाजावरील भव्य अशी उंचीची डोल काठी मंदिराच्या समोरील पठारावरील प्रवेशद्वारासमोर शौर्याचे प्रतीक म्हणून रोवली आहे. सध्या मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर असलेली दीड मणाची घंटा धुळपांचा शौर्याची आजही साक्ष देत आहे. इ. स. १७७५ साली श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी गंगाधर पंत भानू यांना विजयदुर्ग प्रांताचे मुलखी सुभेदार नेमले. इ. स.१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात सरकार आनंदराव धुळप व गंगाधरपंत भानू या उभयतांनी रामेश्वर मंदिरात बरीच कामे केली. सुभेदार गंगाधरपंत यांनी पुन्हा इ. स. १७८० च्या सुमारास मंदिरासमोर अत्यंत देखणा लाकडी सुरुदार खांब व महिरीपी कमानीने सजविलेला भव्य सभामंडप उभारला. मंदिराकडे जाण्यासाठी अवघड वाट होती. पूर्वेकडील डोंगर फोडून त्यात पायऱ्यांची वाट तयार केली व प्रवेशद्वारसुद्धा बांधले. हे मंदिर गिर्ये, रामेश्वर, विजयदुर्ग गावांच्या सीमारेषेवर आहे. गिर्ये गावाच्या पठारावर आल्यावर मंदिर दिसत नाही. डोल काठीचे दर्शन प्रथम घडते. तेथून प्रवेशद्वार पार करून कोरलेल्या पायऱ्यांची घाटी उतरताना मंदिर दृष्टीस पडते. मंदिरात पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती, नंदी आणि देवाचे स्थान आहे. मंदिराच्या गाभा-याच्या बाहेरील भिंतीवर व मंदिराच्या तिन्ही दिशेच्या भिंतीवर सुरेख चित्रे रेखाटली आहेत. त्यातील प्रसंग पौराणिक काळातील असून त्यांचे अलंकार, पोशाख, आयुधे १८व्या शतकात वापरात असलेल्या नमुन्याप्रमाणे आढळतात. मंदिराच्या गाभा-यातील इतर खांबांवर कोरीव काम केलेले आहे. मंदिराबाहेरील भिंतीवरील चित्रे आजमितीस तरी सुस्थितीत आहेत. मंदिराचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिरातील पेशवे कालीन चित्रे. मराठा शैलीतील ही चित्रे अतिशय दुर्मिळ आहे. मंदिरातील कलाकुसरीचे काम प्राचीन संस्कृतीचा साक्षात्कार आहे. प्रशस्त बांधणी, प्राचीन चित्रांची आरास मंदिराच्या भव्यतेत भर घालते. मंदिराच्या भिंतीवर रामायणातील विविध प्रसंगांची अनेक रंगीत चित्रे असून अद्यापही त्यातील पुष्कळ चित्रांचे रंग चांगल्या स्थितीत आहेत. मंदिरातील नक्षीकाम पहाण्यासारखे आहे. दक्षिण द्वाराबाहेरील परिसरात समाधी व इतर देवस्थाने आहेत. आजूबाजूच्या परिसर नानाविध झाडांनी बहरलेला आहे. त्यामुळे प्रसन्नता वाटते.मंदिरात दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा, होळी इ. उत्सव होतात. प्रतिवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. या शिवाय श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या परिसरातील असंख्य भाविक रामेश्वराचे दर्शन घेतात. श्री देव रामेश्वर मंदिर कोकणी व पेशवाई वास्तुशिल्प शैलीचा मिलाफ दर्शविणारा देखणा वास्तूविष्कार असून अशी मंदिरे अभावानेच आढळून येतात. हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.आवर्जून भेट देऊन पर्यटनाचा आनंद लुटण्यासारखे हे स्थळ आहे. येथे जाण्यासाठी मालवण, कणकवली वा रत्नागिरी येथून थेट एस.टी. आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!