आंबवडे- कान्होजी जेधे समाधी
प्रकार : समाधीस्थळ
जिल्हा : पुणे
पुण्याजवळ असलेल्या भोरच्या परीसरात एक दिवसाच्या भटकंतीसाठी आंबवडे नावाचे निसर्गरम्य गाव आहे. या गावाला केवळ निसर्गाचे वरदान लाभलेले नसुन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गावात कान्होजी जेधे, जिवा महाला व भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. याशिवाय आंबवडे गावातील ओढ्याच्या काठावर दाट झाडीत नागेश्वराचे पुरातन मंदिर असुन तेथे जाण्यासाठी ओढयावर झुलता पुल बांधला आहे. आंबवडे गाव पुण्याहुन कापुरहोळमार्गे ६० कि.मी. तर भोर या तालुक्याच्या ठिकाणावरून १२ कि.मी.अंतरावर आहे. भोरवरून आंबवडे गावात येण्यासाठी एसटीची चांगली सोय आहे. आंबवडे गावातुन वाहणारा हा ओढा म्हणजे एक लहान नदीच आहे. या नदीवरील झुलता पुल पार केल्यावर पलीकडील बाजुस असलेल्या एका इमारतीत भोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. या इमारतीच्या मागील आवारात झाडाखाली काही कोरीव मुर्ती व विरगळ तसेच सतीशिळा पहायला मिळतात.
...
येथील गर्द झाडीतून पायऱ्यांच्या वाटेने खाली उतरत गेल्यावर खोलगट भागात नागेश्वर मंदिराचे आवार येते. शिवकाळातील या मंदिराभोवती फरसबंदी अंगण असून एका उंच चौथऱ्यावर पश्चिमाभिमुख मंदीर बांधलेले आहे. मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी केलेली असून मंदिरावर मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. घडीव दगडात बांधलेल्या या मंदिराच्या आवारात दिपमाळ व काही लहान घुमटी आहेत. मंदिरासमोर ओवऱ्या बांधलेल्या असुन त्याच्या समोर बारमाही वहाणाऱ्या झऱ्याचे पाणी गोमुखातून एका कुंडात पडते. हे कुंड पंचगंगा कुंड म्हणुन ओळखले जाते. मंदिराचा परीसर अतिशय रमणीय आहे. नागेश्वर मंदिर पाहुन झाल्यावर येथुन साधारण १ कि.मी. अंतरावर असलेल्या कान्होजी जेधे व जिवा महाला यांच्या समाधी स्थानाकडे गाडीने अथवा चालत जाता येते. गावाबाहेर जिल्हा परिषदेच्या शाळेशेजारी असलेल्या या ठिकाणाला गावकरी कान्होबाची घुमटी व घुमटी मंदीर म्हणुन ओळखत असल्याने आपण देखील याच नावाने चौकशी करावी. येथे एका सरळ रेषेत बांधलेली तीन घुमटीवजा मंदिरे आहेत. यातील पहिली घुमटी जिवा महाला यांची समाधी असून दुसरी घुमटी कान्होजी जेधे यांची समाधी तर तिसऱ्या घुमटीत भवानी मातेची मुर्ती आहे. कान्होजी जेधे यांची समाधी वगळता उर्वरित दोन्ही बांधकामे अलीकडील काळातील वाटतात. कान्होजी जेधे यांच्या समाधीचे बांधकाम मात्र शिवकालीन आहे. हे संपुर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. एका दगडी चौथऱ्याच्या मध्यभागी समाधीची वास्तु बांधण्यात आली असुन या वास्तुमध्ये वाटोळ्या दगडाखाली कान्होजी जेधे यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या आहेत. वास्तुवरील दगडी छप्पर उतरते बांधलेले असून त्याच्या मध्यभागी कळस बांधलेला आहे. आतील बाजुने हा कळस गोलाकार असून त्याच्या मध्यभागी फुलांची नक्षी कोरलेली आहे. महाराजांच्या शब्दासाठी आणि स्वराज्यासाठी ज्या काही घराण्यांनी आपले सर्वस्व बहाल केले त्यातील एक घराणे म्हणजे कारीचे जेधे घराणे. शिवकाळात जेधे घराण्यातील कान्होजी जेधे व त्यांचा पुत्र बाजी उर्फ सर्जेराव या दोन कर्तबदार पुरुषांचे मोठे योगदान आहे. कान्होजी जेधे हे भोर जवळच्या कारी गावचे देशमुख होते. कान्होजी जेधे यांचा जन्म कारी गावात झाला तर बालपण मोसे खोऱ्यात गेले. पुढे काही वर्ष ते शहाजी राजांसोबत दक्षिणेत होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू केल्यावर शहाजी राजांच्या सांगण्यावरून कान्होजी जेधे स्वराज्यात आले. कान्होजी जेधे स्वराज्याच्या कामी शिवाजी महाराजांना सहाय्य करीत असले तरी ते आदिलशाहीच्या सेवेत होते. आदिलशहाने त्यांना वतन बहाल केले होते. अफझलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी आदिलशहाने १६ जून १६५९ रोजी कान्होजी जेधे यांना अफजलखानास मदत करण्याचे फर्मान काढले पण कान्होजी जेधे यांनी वतनावर पाणी सोडून शिवाजी महाराजांना आपल्या पाच मुलांसह पाठिंबा दिला. कान्होजींनी स्वराज्यावरची निष्ठा दाखवत १२ मावळचे देशमुख एकत्र आणून स्वतःसोबत अनेक मराठा सरदार स्वराज्यात आणले. प्रतापगडच्या युद्धात जेधेनी भरघोस कामगिरी पार पाडली. कान्होजी जेधे यांनी स्वराज्यासाठी केलेल्या सेवेसाठी शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीच्या प्रथम पानाचा मान दिला. कान्होजी केवळ शुरच नव्हते तर त्याचं मनही आभाळाइतक मोठ होत. पावनखिंडच्या लढाईत महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचावे यासाठी ३०० बांदलवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. बांदलाच्या या कामगिरीसाठी शिवाजी महाराजांनी त्यांना तलवारीचं प्रथम पानाचा मान देण्याचे ठरविले. शिवाजी महाराजांच्या या विचारावर कोणतीही खळखळ न करता कान्होजीनी आपला मान बांदलास देऊन आपले औदार्य दाखवून दिले. सोबत खाजगी वाहन असल्यास आंबवडे भेटीत कान्होजी जेधे यांचा कारी येथे असलेला वाडा देखील पहाता येतो. कान्होजी जेधे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या त्यांच्या कारी येथील वाडयास व आंबवडे येथील समाधीस एकदा तरी भेट दयायला हवी.
© Suresh Nimbalkar