अंबरनाथ
प्रकार : प्राचीन शिवमंदीर
जिल्हा : ठाणे
अंबरनाथ.... मध्य रेल्वेच्या मुंबई ते कर्जत या उपनगरीय मार्गावरील एक रेल्वे स्टेशन. परंतु प्राचीन काळापासून अंबरनाथची खरी ओळख आहे ती येथील शिलाहार राजांनी बांधलेल्या पुरातन शिवमंदिरामुळे. अंबरनाथचे हे प्रख्यात शिवमंदिर या प्रदेशावर शैवपंथीय शिलाहारांच्या सत्ताकाळात बांधले गेले. आपल्या राजसत्ताकाळात त्यांनी आपल्या प्रदेशात १२ अप्रतिम कलाकृतीची शिवमंदिरं बांधली त्यातील अंबरनाथचे शिवमंदिर आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे. मंदिरात विविध प्रकारच्या लहानमोठय़ा अशा हजारो मूर्ती असून शिल्पकला आणि वास्तुकला यांचा सुरेख संगम या मंदिरात पहायला मिळतो. मंदिरातील शिवलिंग अंबरेश्वर म्हणुन ओळखले जाते आणि या नावावरून या शहराला अंबरनाथ हे नाव पडल्याचे सांगितले जाते. रेल्वे स्टेशनपासुन साधारण दोन कि.मी अंतरावर वालधुनी नदीकाठी हे प्राचीन शिवमंदिर आहे.
...
रेल्वे स्टेशनपासून चालत गेल्यास २०-२५ मिनीटात तर रिक्षाने १० मिनीटात आपण मंदिर परिसरात पोहचतो. खडकात भव्य प्राकार खोदून त्या प्राकारात जमिनीच्या पातळीवर हे मंदिर उभारले आहे. मंदिराभोवतालची प्राकार भिंत कालौघात नष्ट झाले असुन मंदिर परीसरात कोसळलेल्या भागांचे अवशेष दिसुन येतात. मंदिराच्या प्रांगणातच एक बांधीव तळे असुन या तळ्यात दोन बाजूंनी उतरणाऱ्या पायऱ्यांच्या कोपऱ्यात कोरीव मुर्ती दिसुन येतात. दुसरा मोठा तलाव मंदिराच्या पुर्व बाजुला असुन हा बहुधा नंतरच्या काळात बांधला गेला असावा. मंदिराची रचना पश्चिमाभिमुख असुन मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला तर उत्तर व दक्षिण बाजूस दोन प्रवेशद्वारे आहेत. शिल्पशास्त्राप्रमाणे हे शिवमंदिर सप्तांग भूमीज पद्धतीत बांधलेले असुन मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. गाभाऱ्यायावरील कळस नष्ट झाल्याने पूर्वी एकावर एक अशा रचलेल्या शिल्परांगातील तीनच शिल्परांगा शिल्लक आहेत. पायापासुन शिखरापर्यंत हे मंदिर अगदी नखशिखांत सौंदर्याने नटलेले आहे. सध्या असलेले मंदिर गर्भगृह आणि सभामंडप दोन भागात विभागले आहे. मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ अलीकडच्या काळातील दोन नंदी आहेत. यातील एका नंदीच्या गळयात शिवलिंग आहे. मंदिराचे प्रवेशदाराजवळ शिलालेख असल्याचे वाचनात येते पण आता मात्र तो तेथे व मंदीर परीसरात नाही. एशियाटीक सोसायटीच्या एका खंडात हा इ.स.१०६०चा शिलालेख छापला असुन त्याच्या वाचनानुसार शिलाहार राजा छित्तराज याने इ.स. १०२० मध्ये मंदीर बांधण्यास प्रारंभ केला व त्याचा मुलगा मुण्मणि याच्या कारकीर्दीत श्रवण शुध्द ९ शके ९८२ म्हणजेच २७ जुलै १०६० रोजी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. आत शिरल्यावर अठरा खांबांचा भव्य सभामंडप दिसतो त्यातले चार खांब विलग असुन बाकीचे खांब भिंतीलगत आहेत. सभामंडपातील हे खांब कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुना आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत असुन छताच्या मध्यभागावरील दगडी झुंबर त्याच्या भोवतालची वर्तुळे, घुमटाकृती नक्षीकाम फारच सुंदर आहे. गाभाऱ्याच्या दरवाजाच्या गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या असुन तळात किर्तीमुख कोरले आहेत. मंडपाच्या खांबांवर अंत्यत सुंदर अशा प्रतिमा कोरल्या आहेत. या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख कामदेवाची अष्टभुजा मूर्ती आहे. कामदेवाच्या मुर्तीची एकूणच कमनीयता, अलंकार स्पष्ट आणि नाजुकतेने कोरले आहेत. मंदिरात तीन तोंडे असणारी एक त्रिमुखी मूर्ती आहे. हे बहुधा शंकर पार्वतीचे शिल्प असावे कारण मूर्तीच्या मांडीवर आणखी एक स्त्री प्रतिमा कोरली आहे. गर्भगृह हे सभामंडपापेक्षा आठ फुट खाली असुन आत उतरण्यासाठी बारा पायऱ्या आहेत. मूळ मंदिरात शिवलिंग नसल्याने अलीकडच्या काळात गाभाऱ्यात दोन शिवलिंग स्थापित करण्यात आली आहेत. गाभाऱ्यात शिवलिंगाऐवजी एक उंचवटा आहे यालाच स्वयंभू शिवलिंग मानून त्याची पूजा केली जाते. गाभाऱ्याच्या वरील शिखर कोसळलेले असल्याने तेथुन वर पाहिले असता शिखराच्या अंतर्गत भागाचे अवशेष दिसतात व विवरातून आकाशदर्शन होते. गाभाऱ्याच्या तळापासून शिखराची उंची साधारण ४० फुट आहे. मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपण लक्षात येते. मंदिराच्या तळखड्यात अनेक हत्ती कोरलेले असुन जणू काही हत्तींच्या पाठीवरच हे मंदिर वसले आहे. मंदिराच्या बाह्यांगावर अनेक देवदेवतांची शिल्पे कोरली आहेत. शिवाच्या जीवनाशी निगडीत असे ठळक प्रसंग या मंदिरातील कोरीव कामातून दिसतात. या शिल्पांमध्ये विविध पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, शृगांरिक कामशिल्पे, गरुडारूढ विष्णू, विवाहपुर्व शोडषवर्षीय पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, त्रिपुरासुर वधमूर्ती, नृत्यांगना, द्वारपाल, नटराज, नरमुंडधारी महाकाली, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवतार मूर्ती, महिषासुरमर्दिनी, हंसारुढ ब्रम्हदेव या मूर्ती अत्यंत कुशलतेने कोरल्या आहेत. दगडात कोरलेल्या या मुर्तीतून त्या काळची आभूषणे आणि वेशभूषा साकारलेल्या आहेत. मात्र त्यातील अनेक मुर्तीची काळाच्या ओघात झीज झाली आहेत. मंदिराच्या उत्तर दिशेला एक छोटे बांधकाम केलेले आहे पण ते मूळ मंदिराच्या कामाशी विसंगत असुन कदाचित नंतरच्या काळात केले गेले असावे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. गाभाऱ्यातील अभिषेकजल प्रथम कुंडात आणि नंतर ओढय़ात सोडण्याची व्यवस्था या मंदिर बांधकामात आहे. मुंबईपासून जवळ असलेल हे शिवमंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असुन या मंदिरास भेट द्यायलाच हवी. मंदिराचा ताबा पुरातत्व खात्याकडे असुन पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे.
© Suresh Nimbalkar