शेगुड

प्रकार : मध्ययुगीन मंदीर

जिल्हा : अहमदनगर

खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर देखील खंडोबाची अनेक मंदीरे आढळतात. यातील प्रमुख मंदीरे बारा असुन ती बारा मल्हार म्हणुन ओळखली जातात. जेजुरी, पाली, शेगुड, धावडी निमगांव, सातारे , मोळेगांव, नळदुर्ग – आंदुर (उस्मानाबाद) व कर्नाटक येथील बिदर आदीमल्हार, देवरगुड्डा, मंगसुंदळी, मैलाळ, भैलारसिंग अशी हि बारा ठिकाणे आहेत. या बारा मल्हारपैकी एक मल्हार म्हणजे शेगुडचे खंडोबा मंदिर होय. शेगुडचे हे मंदीर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असुन या गावानंतर सोलापूर जिल्हा सुरु होतो.कर्जत या तालुक्याच्या ठिकाणाहुन १४ कि.मी.अंतरावर असलेले हे मंदीर सोलापुर जिल्ह्यातील करमाळा येथुन फक्त १३ कि.मी. अंतरावर आहे. कर्जत- करमाळा या रस्त्याला जागुनच हे मंदीर असल्याने या रस्त्याने जाता येत सहजपणे मंदीराचे दर्शन घडते. माळंगी ओढ्याच्या काठावर असलेल्या या मंदिराचा परिसर साधारण अर्ध्या एकरवर पसरलेला असुन या संपुर्ण परिसराला एखाद्या किल्ल्याप्रमाणे १५ फुट उंचीची दगडी तटबंदी आहे. ... या तटबंदीतुन मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी दोन दरवाजे आहेत. यातील उत्तरेकडील दरवाजा हा महादरवाजा असुन दक्षिणेकडील लहान दरवाजा हा प्रसंगानुरूप उघडला जातो. मुख्य दरवाजाच्या वरील बाजूस दगडांनी बांधलेला नगारखाना असुन दरवाजाच्या दर्शनी भागात मंदिराचे बांधकाम सांगणारा शिलालेख पहायला मिळतो. या शिलालेखातील उल्लेखानुसार सदर बांधकाम शके १६९५ मध्ये विजय संवत्सर असता मल्हारी शंकर,रायाजी महीपत, विठ्ठल महीपत पुंडे यांनी केलेले आहे. मुख्य दरवाजाने आत आल्यावर संपुर्ण मंदीराचा परिसर नजरेस पडतो. मंदिराच्या आवारात चार दगडी दीपमाळ असुन त्यासमोरच मुख्य मंदीराचा सभामंडप आहे. संपुर्ण तटबंदीला लागुन भक्तांना राहण्यासाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. मुख्य दरवाजाला लागुनच नगारखाना तसेच तटबंदीच्या वरील भागात जाण्यासाठी बाजुसपायऱ्या आहेत. मंदिराच्या सभामंडपासमोर एक मेघडंबरी असुन त्यात चार पादुका व नंदी विराजमान झालेले आहेत. मंदिराच्या डाव्या घडीव दगडात बांधलेली चौकोनी बारव असुन या बारव मध्ये उतरण्यासाठी दोन बाजूस पायऱ्या आहेत. या बारवचे पाणी फक्त देवासाठी वापरले जात असल्याने हि बारव तीर्थाची विहीर म्हणुन ओळखली जाते. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला प्रथम सभामंडप व मोठी पितळी घंटा दिसते. मंदिराचे गर्भगृह पुर्वाभिमुख असुन गाभाऱ्यात जाण्यासाठी पायऱ्या उतराव्या लागतात. गाभाऱ्यात उतरल्यावर आपल्याला खंडेरायाची प्रसन्न मूर्ती नजरेस पडते त्यासोबत डाव्या बाजूस म्हाळसादेवी तर उजवीकडे बाणाईदेवी यांच्या मुर्त्या दिसून येतात. मंदिराचा कळस उंच असून त्यावर नवदुर्गा व नवनाथांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. याशिवाय मंदीराच्या आवारात तटबंदीच्या आतील बाजूस विठ्ठल रुक्मिणी व गणपती यांच्या मुर्ती पहायला मिळतात. याशिवाय मंदिराच्या मागील बाजूस एक सतीशिळा व काही विरगळ पहायला मिळतात. दक्षिण दरवाजाजवळ रथोत्सवात खंडेराया ज्या अश्वावर स्वार होतात तो लाकडी घोडा व रथ आहे. उत्सवाचे दिवस वगळता देवाचे दर्शन घेऊन संपुर्ण मंदीर परिसर पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!