वेतोबा

प्रकार : मध्ययुगीन वेताळ मंदीर

जिल्हा : सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वेंगुर्लेतील आरवली गावात असणारे वेतोबाचे मंदिर. वेंगुर्ल्यापासुन साधारण १५ कि.मी. अंतरावर रेडीकडे जाताना आरवली हे गाव लागते. विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात हरवल्ली नावाने अस्तित्त्वात असलेल्या गावाचे नाव कालौघात बदलून आरवली झाले. हर म्हणजे शिव आणि वल्ली म्हणजे वस्ती. हरवल्ली म्हणजे जेथे शिवाची वस्ती आहे असा गाव. ‘हरवल्लीच्या’ या इतिहासावर सतराव्या शतकात नवी मोहर उमटवली ती ‘सिद्ध भुमैय्या’ नामक एका नाथपंथीय सिद्ध पुरूषाने! कर्नाटकातून येथे अवतीर्ण झालेल्या या योग्याने गावच्या ‘साताखणाची डोंगरी’ नावाच्या निर्जन टेकडीवरील जंगलातून इथल्या ‘अनादि वेताळाची’ आराधना करून त्याला आजच्या मध्यवर्ती ठिकाणी आणून सुस्थापित केले. श्री भुमैया यांनी आरवलीचे देऊळ सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्थापन केले असे म्हणतात. सांप्रत मंदिर इसवी सन १६६० मध्ये बांधल्याचा तर पुढचा सभामंडप इसवी सन १८९२ ते १९०० च्या सुमारास बांधल्याचा उल्लेख आढळतो. सतराव्या शतकात उदयास आलेल्या या मंदिराचा हळूहळू श्री वेतोबा देवस्थान ते ‘श्री देव वेतोबा संस्थान आरवली’ असा कायापालट होत गेला. ... आज आरवलीत आल्यावर श्री देव वेतोबा संस्थान असे लिहिलेले महाद्वार दृष्टीस पडते. श्रीदेव वेतोबाचे देवालयाचा नगारखाना तीन मजल्यांचा आहे. तर देवालय दुमजली आहे. आरवलीचे श्री देव वेतोबा मंदिर मूलतः वेताळाचे आहे. "बा" हा आदरार्थी शब्द जोडला गेल्याने "वेताळाचे" वेतोबा झाले असावे. श्री देव वेतोबा कोकणातील आरवली गावचा देव आहे. अरबी समुद्राच्या पायथ्याशी असलेल्या या नयनरम्य गावात श्री देव वेतोबा याची गावाचा तारणहार म्हणून उपासना केली जाते. श्री देव वेतोबाचे मंदिर म्हणजे गावच्या लोकांच्या सुबत्तेचे, उच्च अभिरूचीचे आणि श्रद्धेचे रूप आहे. आधुनिक पद्धतीने जीर्णोद्धार झालेले हे मंदिर खूप सुंदर आहे. आतबाहेर सर्व परिसर स्वच्छ आहे. सभामंडपात वरती चारी बाजूंनी कठडे असलेल्या गॅल-या आहेत. खाली दोन्ही बाजूंला बैठका आहेत. तेथून गाभा-यात शिरले, की उंच, काळीकभिन्न, शुभ्र वस्त्रांकित वेतोबाची मूर्ती दिसते. नऊ फुटाच्या आसपास उंची असलेली ती मूर्ती पंचधातूंची आहे. वेतोबाच्या एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात भांडं दिसते. असे म्हणतात की १७ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मूळ मूर्ती जवळपासच्या डोंगरातून आणून बसविली होती. तेव्हा, ही मूर्ती फणसाच्या लाकडापासून कोरली गेली होती. आणि म्हणूनच दर १०० वर्षांनी ती पुन्हा स्थापित करावी लागत असे. सध्याची सुंदर, पंचधातूची मूर्ती एका स्थानिक शिल्पकाराने बनविली असुन १९९६ मध्ये या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंदिरात प्रवेश करताच सुमारे सात फूट उंचीच्या श्री वेतोबाचे भव्य दर्शन घडते. श्री वेतोबाची मूर्ती पूर्वी फणसाच्या लाकडाची होती. त्यामुळे या गावात बांधकामात व इतर व्यवहारात फणसाचे लाकूड वापरत नाही. श्री वेतोबाच्या हातात साडेतीन फूट लांबीची तलवार आहे. गावची ती रक्षक देवताच आहे. विशेष म्हणजे या देवास नवस म्हणून केळीचे घड आणि चपला वाहण्याची प्रथा आहे. इथल्या रहिवाशांच असं म्हणंण आहे कि आजही वेतोबा हातात दंडा आणि खांद्यावर घोंगडी घेऊन रात्री संपूर्ण गावात फिरुन या गावाच रक्षण करतो. त्यावेळी याच नवसाच्या चपलांचा वापर होतो. सभामंडपात अशा मोठ्या आकाराच्या चामड्याच्या चपलांचा ढिगच पाहावयास मिळतो. गावात फिरण्यासाठी त्या देवाला वाहिलेल्या असतात. श्री वेतोबाची यात्रा वर्षातून दोनदा कार्तिक वद्य पौर्णिमा आणि मार्गशिर्ष शुद्ध तृतीया या दिवशी भरते. कोकण दर्शन करताना आरवलीच्या या वेतोबाचे दर्शन करायलाच हवे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!