विहीरगाव
प्रकार : एकांडा बुरुज
जिल्हा : चंद्रपुर
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याची भटकंती करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात पोर्तुगीजांनी निर्माण केलेली एकांडा बुरुजांची साखळी पहायला मिळते. त्यामुळे माझा असा समज झाला होता कि एकांडा बुरुज हि पोर्तुगीजांनी संरक्षणाच्या दृष्टीने निर्माण केलेली साखळी हि त्यांचीच युद्धशास्त्रातील देणगी आहे. पण चंद्रपूर जिल्ह्याची भटकंती करताना मला चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अशी एक दोन नव्हे तर चनई-विहीरगाव-रुपापेठ-दुर्गाडी अशी चक्क चार बुरुजांची साखळी पाहायला मिळाली आणि एकांडा बुरुज हि पोर्तुगीजांनी देणगी आहे हा माझा समज खोटा ठरला. या चार बुरुजापैकी सर्वात सुंदर व आजही व्यवस्थितपणे टिकून असलेल्या विहीरगाव बुरुजाची आपण भेट करणार आहोत. विहीरगाव चंद्रपूर जिल्ह्यापासून ३८ कि.मी. अंतरावर तर राजुरा या तालुक्याच्या ठिकाणाहुन १४ कि.मी.अंतरावर आहे. हा बुरुज विहीरगाव गावात असल्याने विहीरगाव बुरुज म्हणुन ओळखला जातो पण विहीरगाव गावात मात्र हा बुरुज जोशींचा किल्ला म्हणुन ओळखला जातो. या बुरुजाला लागुनच जोशी यांचा वाडा आहे. बाहेरून जरी हा वाडा साधा दिसत असला तरी आत मात्र सुंदर लाकडी कोरीव काम केलेले आहे.
...
विदर्भाच्या काही भागावर गोंड राजसत्तेनंतर राज्य आले ते नागपूरच्या भोसले घराण्याचे. त्यांच्या काळात कसही ठिकाणी प्रशासकीय कामासाठी गढी तर काही ठिकाणी गावाच्या-शहराच्या रक्षणासाठी एकांड्या बुरुजाची बांधणी देखील करण्यात आली. विहीरगाव बुरुज हा त्याचेच एक उदाहरण. बुरुजाचे एकंदरीत बांधकाम पहाता हा बुरुज मराठ्यांच्या म्हणजे नागपूरच्या भोसले घराण्याच्या काळात बांधला गेला असावा. बुरुज किंवा किल्ला म्हणुन स्थानिकांना विचारणा केली असता आपण सहजपणे या बुरूजाजवळ पोहोचतो. गोलाकार आकाराचा हा बुरुज साधारण चाळीस फुट उंच असुन संपुर्ण बुरुजाचे बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. बुरूजाच्या वरील भागात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या असुन तोफांचा मारा करण्यासाठी झरोके ठेवलेले आहेत. बुरुजाचे प्रवेशद्वार जमिनीपासुन १० फुट उंचावर असुन कोरीवकामाने सजवलेले आहे. बुरुजात प्रवेश करण्यासाठी पुर्वी व आज देखील शिडीचा वापर केला जातो. या दरवाजाने आत प्रवेश केल्यावर सुरवातीलाच एक खोली असुन काही अंतरावर दुसरी खोली आहे. या खोलींचा वापर सैनिकांना राहण्यासाठी अथवा कोठार म्हणुन केला जात असावा. येथुन एका वळणदार पायरीमार्गाने आपण बुरुजाच्या माथ्यावर पोहोचतो. बुरुजाच्या माथ्यावर झेंडा रोवण्यासाठी दोन दगडी कट्टे बांधलेल्या असुन काही ठिकाणी मशाली रोवण्यासाठी दगडी कडी बांधलेल्या आहेत. याशिवाय बुरुजावर इतर कोणतेही अवशेष नसल्याने १५ मिनिटात आपले गढी दर्शन पुर्ण होते. जोशी यांच्या वाड्याचे संरक्षण करण्यासाठी या बुरुजाची निर्मिती करण्यात आली असावी असे वाटते. जोशी यांचे कुटुंब अथवा वंशज येथे वास्तव्यास नसल्याने बुरुजाबद्दल फारशी माहीती मिळत नाही, पण जोशी यांच्याशी संपर्क साधल्यास या वास्तुबद्दल बरीचशी माहिती उपळब्ध होऊ शकते. स्थानिकात इतिहासाची पुर्णपणे बोंब असल्याने गढीचा इतिहास अबोल आहे.
© Suresh Nimbalkar