वरखेड
प्रकार : गढी
जिल्हा : जळगाव
उंची : 0
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने अपरीचीत अशा गढीकोटांची भटकंती करण्याची मजा काही वेगळीच असते. आपण त्या वास्तूबाबत अपरीचीत असतोच पण आपण ज्याला त्या वास्तुबाबत विचारात असतो तो स्थानिक देखील कधीकधी त्या वास्तुबाबत अपरीचीत असतो. काही वेळेस या वास्तुला समांतर इतर काही नावे असतात अन हि शोधमोहीम वेगळाच अनुभव देऊन जाते. असाच काहीसा अनुभव आम्हाला जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील वरखेड येथील गढीबद्दल आला. आजही मी या गढीचे नेमके नाव वरखेड, वरखेडा कि वरखेडी याबाबत संभ्रमीत आहे कारण हि गढी या तीनही नावाने ओळखली जाते अन माहीत मात्र कोणालाही नाही. या भागात पत्ता विचारताना मनाचा संयम राखावा लागतो. कारण आपण पत्ता विचारल्यावर पारावर असलेल्या या व्यक्ती आपल्याला विसरून आधी या पत्त्याबाबत आपापसात साधक-बाधक चर्चा करतात नंतर आपण कुठून आलो याची चौकशी करतात.
...
त्यानंतर आपण चुकीच्या मार्गाने कसे आलो हे पटवुन देतात व त्यानंतर माहित असल्यास पत्ता सांगतात अन्यथा पत्ता विचारण्यास पुढच्या गावाकडे रवाना करतात. गुगलवर देखील ह्या नावाने शोधले असता गढी असलेले वरखेड गाव सोडुन इतर गावे दाखवली जातात. त्यामुळे गढीची स्थान निश्चिती करताना मी येथे २०.८८५०३४, ७६.०४७४२० हे गढीचे अक्षांश रेखांश दिले आहेत. वरखेड गढीला भेट देण्याचा योग्य मार्ग म्हणजे बोदवड गाठावे. भुसावळ बोदवड हे अंतर ३३ कि.मी.आहे तर मुक्ताईनगर बोदवड हे अंतर २२ कि.मी.आहे. बोदवड येथुन मलकापुर महामार्गाने वरखेडे बुद्रुक गाव ६ कि.मी. अंतरावर आहे. गावात प्रवेश केल्यावर चौकातच एक जुनी लहान तोंडाची खोल विहीर व लाकडी कोरीवकाम असलेले २ दुमजली वाडे दिसुन येतात. येथुन काही अंतरावर गावातील नदीच्या काठावर वरखेड गढी उभी आहे. गढीचे खालील १०-१२ फुटांचे बांधकाम दगडात केलेले असुन वरील बांधकाम विटांनी केले आहे. उत्तरेस मुख्य प्रवेशद्वार असलेली हि गढी अर्धा एकरपेक्षा कमी जागेवर पसरली आहे. चौकोनी आकार असलेल्या या गढीची तटबंदी आजही पुर्णपणे शिल्लक असुन या तटबंदीत अष्टकोनी आकाराचा एक बुरुज आहे. या बुरुजाची उंची तटापेक्षा जास्त असुन तटावर जागोजागी बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या आहेत. गढीत प्रवेश केल्यावर समोरच एक चौकोनी आकाराची दगडात बांधलेली खोल विहीर असुन या विहिरीचा आतील गोलाकार भाग विटांनी बांधलेला आहे. गढीच्या आत असलेल्या वास्तु मोडकळीस आल्याने गढीमालक असलेले भोसे पाटील कुटुंबीय अलीकडील काळात गावात दुसरीकडे राहायला गेले आहेत. त्यामुळे गढीच्या आतील वास्तुंची मोठया प्रमाणात पडझड झाली आहे. विहिरीच्या काठावरील भिंतीत एक कमान असुन या कमानीभोवती चुन्यात कोरलेली एक महिरप आहे. या महिरपीत एक गणेशमुर्ती कोरलेली आहे. गढीच्या आत मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने सर्वत्र फिरता येत नाही. गढीच्या आतील काही वास्तु दुमजली तर काही वास्तु तीनमजली असल्याचे दिसुन येते. यातील एका मोडकळीस आलेल्या वास्तुतुन तटावर जाण्यासाठी जिना आहे. गढीच्या फांजीवरून काही प्रमाणात तटाला फेरी मारता येते. संपुर्ण गढी व परीसर फिरण्यास एक तास पुरेसा होतो. होळकर यांच्या वंशजांनी बांधलेली हि गढी ब्रिटीश काळात लेवा पाटील यांनी विकत घेतली व त्यानंतर भोसे कुटुंबीयांनी लेवा पाटील यांच्याकडून विकत घेतली.
© Suresh Nimbalkar