रेवस कोट

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : O फुट

श्रेणी : सोपी

रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग तालुक्यात रेवस ते कुंडलिका खाडीपर्यंत समुद्र किनाऱ्यालगत निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग म्हणजे अष्टागर. तीस ते पस्तीस कि.मी. लांबीची अलिबाग तालुक्यातील हि किनारपट्टी येथे असलेल्या आक्षी, नागाव, किहीम, आवास, सासवणे, रेवस, चौल, रेवदंडा या आठ प्रमुख गावांमुळे ‘अष्टागर’ म्हणुन ओळखली जाते. या अष्टागरात उत्तर पश्चिमेकडील धरमतर खाडीवरील पहिले गाव म्हणजे रेवस तर दक्षिण-पूर्वेकडील कुंडलिका खाडीवरचे शेवटचे गाव म्हणजे रेवदंडा. या दोन्ही खाडीतून सागरी मार्गाने अष्टागरात प्रवेश करणे साध्य असल्याने पोर्तुगीजांनी कुंडलिका खाडीच्या मुखावर रेवदंडा किल्ला बांधला व आपले बस्तान तेथे बसवले. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी धरमतर खाडी म्हणजे अष्टागराचे प्रवेशद्वार हे ओळखुन धरमतर खाडीच्या मुखाशी असलेल्या रेवस येथे मनरंजन कोटाची तर मांडवा येथील टेकडीवर श्रीवर्धन कोटाची बांधणी केली. मनरंजन व श्रीवर्धन कोटांची नावे घेतली कि आपल्याला आठवतात ते राजमाचीचे बालेकिल्ले. पण हे दोन्ही कोट कधीकाळी अलिबाग परीसरात होते याची दुर्गप्रेमिनी नोंद घ्यावी. शिवकाळात नोंद आढळत नसलेले हे किल्ले सिद्दीच्या अनुषंगाने पेशवे दफ्तरात वारंवार डोकावत असल्याने व अखेरीस मराठ्यांनीच हे किल्ले पाडल्याची नोंद येत असल्याने या कोटांच्या उरल्यासुरल्या अवशेषांचे दर्शन घेणे क्रमप्राप्त होते. ... श्री.भगवान चिले यांच्या वेध जलदुर्गांचा हे पुस्तक वगळता या कोटांची माहिती व उल्लेख येत नसल्याने हे कोट दुर्गप्रेमींच्या यादीत देखील दिसुन येत नाही. पुणे मुंबईहून अलिबागला येण्यासाठी थेट बस उपलब्ध आहे.रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे ११० कि.मी. अंतरावर आहे. गेट वे ऑफ इंडियावरुन जलमार्गाने दीड तासात अलिबागला पोहोचता येते तर रस्त्याने पनवेल-पेण-अलिबाग हे अंतर सुमारे तीन तास आहे. खाजगी वाहनाने येणाऱ्यांसाठी पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली-पेण मार्गे अलिबागला येता येते तर रेल्वेने अलिबागला येण्यासाठी पेण हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.पेणपासून पुढे आपण खाजगी वाहनाने किंवा बसने अलिबागला जाऊ शकतो. अलिबागपासुन रेवस गाव २० कि.मी.अंतरावर असुन थळ-मांडवा मार्गे बस अथवा रिक्षाने तेथे जाता येते. मुंबईहुन भाऊचा धक्का येथुन रेवस जेट्टीवर आल्यास रेवस जेट्टी व मांडवा जेट्टी या दोन्ही ठिकाणाहुन रेवस गाव हे अंतर ७ कि.मी.आहे. रेवस गावात आल्यावर गावात शिरून १० मिनिटे चालत गावाच्या टोकाला खाडीकिनारी असलेल्या कोळीवाडयात यावे. येथे खाडीच्या किनारी घरे बांधलेला उंचवटा नजरेस पडतो घरे असलेला हा उंचवटा म्हणजेच आपला मनरंजन कोट उर्फ रेवसची गढी. कोळी बांधवाना कोळीवाड्यातील हा उंचवटा आजही किल्ला म्हणुन परीचीत असुन आपण किल्ला अशी विचारणा केल्यास ते सहजपणे या उंचवट्यावर पोहोचवतात. मी किल्ला या स्थानाची निश्चिती करण्यासाठी तेथील वयोवृद्ध व्यक्तीकडे चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार उंचावर दहा बारा घरे असलेला हा भाग त्यांच्या आजोबांच्या वेळेपासुनच किल्ला म्हणुन परीचीत आहे. किल्ल्यातील गडदेवता आजही तेथे एका लहानशा घुमटीत पुजली जाते. या घुमटीपासुन काही अंतरावर गोलाकार आकाराचा नामशेष होत असलेला बुरुज पहायला मिळतो. बुरुज ते मंदिर या भागात काही मोठे घडीव दगड पहायला मिळतात. तेथे असलेल्या घरांमध्ये चौकशी केली असता ते असे मोठमोठे दगड त्यांनी घराच्या पायामध्ये वापरल्याचे सांगतात. छोटी घुमटी. घडीव दगड व एक उध्वस्त बुरुज वगळता इतर कोणतेही अवशेष शिल्लक नसल्याने दहा मिनिटात आपली शोध मोहीम पूर्ण होते होते. येथे समोरच जुने रेवस बंदर ( रेवस जेट्टी नाही) असुन त्यावर नव्याने बांधलेला धक्का आहे. तेथे आजही बोटींची दुरुस्तीची कामे चालतात. हे बंदर व त्यात आजही उभ्या असलेल्या शे-दीडशे बोटी पाहिल्यावर या बंदराचे व किल्ल्याचे त्या काळातील महत्व लक्षात येते. ( दीपक कोळी यांनी त्यांच्या घराच्या वरील मजल्यावर जाण्याची परवानगी दिल्याने हे न्याहाळता आले.) आता थोडे किल्ल्याच्या इतिहासाकडे वळूया. पेशवेकाळात या कोटाच्या बांधकामाची नोंद येत नसल्याने हा कोट शिवकाळापासूनच अस्तित्वात असावा व महाराजांनी आरमाराचा पाया घालताना रेवस बंदराचे महत्व ओळखुन या कोटाची निर्मिती केली असावी. या किल्ल्याचा कागदोपत्री उल्लेख येतो तो पेशवेकाळातच. पेशवे दफ्तरातील २ मे १७३६ च्या एका पत्रानुसार सिद्दी सातच्या आरमाराने रेवस गढीवर हल्ला करून त्यातील साठ माणसे मारली व गढी ताब्यात घेतली. यावेळी मानाजी आंग्रे त्यांच्या सैन्यासह चालुन गेले असता त्यांचा पराभव झाला व बरीचशी माणसे मारली गेली. सिद्दी शिरजोर होऊन मुलुख लुटीत आत शिरला. हि घटना एप्रिल १७३६ च्या आधी केव्हातरी घडली असावी. कारण १९ एप्रिल १७३६ रोजी कामारले येथे झालेल्या मराठे व सिद्दी यांच्या लढाईत ८०० मराठे व सिद्दीची १३०० माणसे मारली गेली. या लढाईत सिद्दी सात हा देखील रणांगणावर ठार झाला. यावेळी जिवाजी खंडेराव चिटणीस चिमाजीअप्पा यांना पाठवलेल्या अभिनंदनपर पत्रात लिहीतात सिद्दी सात म्हणजे रावणासारखा दैत्य, त्याला मारून हबशाचे मुळच उपटले. सर्वत्र तुमचा लौकिक झाला. हि विजयवार्ता ऐकून छत्रपती शाहु म्हणतात सिद्दी सात सारखा गनीम मारला, असामान्य कर्म केले. यावेळी रेवस गढी पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आली असावी. पुढे १७३९ च्या एका पत्रात चिमाजीअप्पा लिहीतात, शामलाचे (सिद्दी) आरमार व तीन चार हजार लोक येऊन रेवस गढी घेतली व मुलुकात उपद्रव करू लागला. पुढे इ.स.१७४९ मध्ये मराठ्यांनी मनरंजन कोट म्हणजे म्हणजे रेवसची गढी ताब्यात घेतली. या कोटाची मदत कमी व सिद्धीचा सतत कोटास होणारा त्रास पाहुन मराठ्यांनी कोट पाडण्याचा निर्णय घेतला. इ.स. १७५१ मध्ये खुबलढा व मनरंजन हे दोन्ही कोट पाडण्यात आले. ५ डिसेंबर १७५१ च्या एका पत्रात याचा उल्लेख खालीलप्रमाणे येतो. मानाजी आंग्रे यांनी रेवसास संभाजीराव खानविलकर व नारोपंत सबनीस यांच्या समवेत दोनशे माणसे पाठवुन गढीचे दगड,मेढा(तट) साफ करून तोफा पाच व कर्णां १० होता तो कुलाबा किल्ल्यावर आणीला. यावेळी सिद्धीशी दोन चार घटका झटापट झाली पण गढी पाडण्याचे काम फत्ते झाले. मनरंजन कोट मराठ्यांनीच इ.स. १७५१ साली पाडल्याने त्याचे जुजबी अवशेष वगळता काहीही शिल्लक नाही व हे अवशेष देखील काही काळाचे सोबती आहेत. या कोटाचे मोक्याचे ठिकाण पाहण्यासाठी या ठिकाणास एकदा तरी भेट दयायला हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!