राजगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : गडचिरोली
उंची : ९९५ फुट
श्रेणी : कठीण
राजगड म्हटले कि आपल्याला आठवतो तो शिवछत्रपतींचा राजगड. पण महाराष्ट्रात या राजगड पासुन दूर अजुन एक राजगड आहे हे आपण कधी ऐकलेले नसते. किल्ल्यांची माहीती वाचताना नागपूरचे राजे भोसले यांच्या ताब्यात गोंड राजवटीतील राजगड परगणा असल्याचे वाचनात आले व त्या भागातील स्थानिक मित्रांकडून या राजगड परगण्यात राजगड नावाचा किल्ला होता जो आता पूर्णपणे नष्ट झाला अशी माहिती मिळाली. पण प्रवीण हजारे या मित्राने मात्र तो किल्ला नष्ट झाला असला तरी त्याचे अवशेष त्य डोंगरावर आजही शिल्लक आहेत अशी माहीती देऊन त्या किल्ल्याची स्थाननिश्चित केलेले ठिकाण देखील पाठवले. गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यात असलेला हा किल्ला गडचिरोली जिल्ह्यापासून ६३ कि.मी.अंतरावर तर चार्मोशी या तालुक्याच्या ठिकाणाहुन २८ कि.मी.अंतरावर आहे. घोट –मुलचेरा रस्त्यावर असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी अंबेला हे पायथ्याचे गाव आहे. अंबेला हे जरी या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असले तरी ते किल्ल्यापासून साधारण ६ कि.मी.अंतरावर आहे. घोट-मुलचेरा रस्त्यावरून वनखात्याने तयार केलेला एक कच्चा रस्ता थेट राजगडच्या पायथ्याशी जातो पण त्यासाठी जीप सारखे खाजगी वाहन सोबत असणे गरजेचे आहे.
...
शिवाय राजगड किल्ल्याचे स्थान व अवशेष घनदाट जंगलात डोंगरावर असुन सहजपणे सापडणे शक्य नसल्याने स्थानीक माहितगार वाटाड्या सोबत असणे अतिशय गरजेचे आहे. माहितगार वाटाड्या शिवाय या किल्ल्यावर जाण्याचे धाडस करू नये. सर्वप्रथम अंबेला गावात जाऊन तेथुन वाटाड्या सोबत घ्यावा व नंतर या किल्ल्याची वाटचाल करावी. वनखात्याने बांधलेला कच्चा रस्ता साधारण ६ कि.मी.आहे. या वाटेने आल्यावर जंगलातील भूलभुलय्या सुरु होतो कारण किल्ल्यावर जाण्यासाठी कोणतीही वाट नाही. स्थानिक लोक त्यांचा जंगलातील वावरण्याचा अनुभव असल्याने अगदी सराईतपणे दोन डोंगर पार करून आपल्याला राजगड किल्ल्याचे अवशेष असलेल्या डोंगरावर घेऊन जातात. या जंगलात अस्वलांचे प्रमाण जास्त असल्याने आपल्याला सांभाळूनच मार्गक्रमण करावे लागते. पण स्थानिक पुरेशी काळजी घेऊन व आपल्याला सोबत ठेऊनच पुढे निघतात. राजगड किल्ल्याचे अवशेष म्हणजे चपट्या व मोठ्या विटांची तटबंदी पण हि तटबंदी देखील मोठ्या प्रमाणात मातीत गाडली गेली आहे. सध्या दिसणारी तटबंदी हि दरीच्या काठावर असुन ती किल्ल्याची तटबंदी आहे कि एखाद्या वाड्याची भिंत आहे हे ठामपणे सांगता येत नाही. हि तटबंदी साधारण ३०० फुट लांब असुन त्यात एका बुरुजाचा पाया पहायला मिळतो. पायथ्यापासुन किल्ल्यावर येण्यासाठी दीड तास लागतो तर किल्ल्याचे अवशेष पाहण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. किल्ल्यावर दाट जंगल असल्याने आसपासचा परिसर दिसत नसला तरी कड्यावरील वाटेने जाताना केवळ आणि केवळ जंगलच नजरेस पडते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांतीवीर बाबुराव शेडमाके याने इ.स.१८५७ मध्ये इंग्रजाविरुद्ध बंड पुकारल्यावर सर्वप्रथम राजगड परगणा ताब्यात घेतला व त्यामुळे सुरवातीचा काही काळ त्याचे या किल्ल्यावर वास्तव्य होते. किल्ल्याबद्दल त्याआधीचा कोणताही इतिहास वाचनात अथवा ऐकण्यात आला नाही. इ.स.१८५३ मध्ये लॉर्ड डलहौसीने दत्तकविधान नामंजूर करुन नागपूर संस्थान खालसा केले. त्यामूळे या संस्थानाचा अंमल असलेला चांदा जिल्हा ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली आला. जिल्ह्यात अनेक जमीनदारी आणि उप-जमीनदारी राजगोंड कुटुंबियांच्या मालकीच्या होत्या. या सर्व जमीनदाऱ्या भोसले राजवटीच्या आधी म्हणजेच गोंड काळापासून अस्तित्वात होत्या. स्वाभाविकपणे या साऱ्या जमीनदारांच्या जमिनी ताब्यात घेतल्यामूळे त्यांच्या मनात इंग्रजांबद्दल प्रचंड राग उफाळत होता. अशीच एक जमीनदारी मोलमपल्लीची होती. ज्यात सध्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील २४ गावे होती. मोलमपल्लीचा जमीनदार बाबूराव सेडमाके (शेडमाके) हा २५ वर्षांचा उमदा तरुण होता. त्याचा जन्म गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील किष्टापूर गावात १२ मार्च १८३३ रोजी झाला होता. मार्च १८५८ च्या सुरुवातीस बाबुरावने जवळच्या प्रदेशातील गोंड, माडिया आणि पूर्वी निजामाच्या सेवेत असलेल्या रोहिला जमातीमधील आदिवासी तरुणांची जमवाजमव करून सशस्त्र सैन्याची एक शिबंदी तयार केली. या सैन्याच्या बळावर बाबुरावने चांदा जिल्ह्यातील संपूर्ण राजगड परगणा ताब्यात घेतला. चंद्रपूरात ही बातमी पोहोचताच, तत्कालीन जिल्हाधिकारी क्रिश्टन यांनी ही बंडखोरी रोखण्यासाठी ब्रिटीश सैन्याच्या तुकडीची नेमणूक केली. १३ मार्च १८५८ रोजी ब्रिटिश सैन्याची नांदगाव-घोसरीजवळ बाबुरावच्या सैन्याशी चकमक झाली त्यात बाबुरावच्या सैन्याचा विजय झाला व ब्रिटिशांच्या फौजेचे व सामानाचे नुकसान झाले. पुढे 'अडपल्ली' व 'घोट' भागाचा जमीनदार व्यंकटराव हा बाबुरावला सामील झाला. या दोघांनी ब्रिटीशांविरूद्ध उघडपणे युद्ध जाहीर केले आणि १,२०० हून अधिक रोहिला व गोंड सैन्याची जमवाजमव केली. दोघांच्या संयुक्त सैन्याने उत्तरेकडे गढी सुर्लाच्या दिशेने धडक मारली व हा मुलुख आपल्या ताब्याखाली आणला. जेव्हा क्रिश्टनला हे वृत्त समजले तेव्हा त्याने दुसरी एक तुकडी त्या टेकडीला घेरण्यासाठी पाठवली. परंतु बाबुरावच्या सैन्याने ब्रिटिश फौजेवर टेकडीवरून दगड-गोट्यांच्या मारा सुरु केला व त्यात ब्रिटिश सैन्य विखुरले गेले. त्यानंतर क्रिश्टनने नागपूरहून लेफ्टनंट जॉन नटल यांच्या नेतृत्वाखाली पायदळाची अजून एक तुकडी मागवून घेतली. नव्याने प्राप्त झालेली ही कुमक सोबतीला घेऊन ब्रिटिश फौज १९ एप्रिल १८५८ रोजी सगणपूर येथे व २७ एप्रिल १८५८ रोजी बामनपेट येथे बाबुरावच्या सैन्याशी भिडली. दोघा सैन्यात पुन्हा एकदा जोरदार झुंज झाली. परंतु ह्या खेपेससुद्धा बाबुरावच्या सैन्याने कुरघोडी करीत ब्रिटिश सैन्यास पराभूत केले. या यशाने आनंदित झालेल्या बाबुरावने २९ एप्रिल १८५८ रोजी प्राणहितेच्या तीरावरील अहेरी जमीनदारीमधील चिंचगुडी येथे ब्रिटिशांच्या टेलीग्राफ कॅम्पवर हल्ला केला. ब्रिटिश फौजेने बाबुरावच्या सैन्याचा पाठलाग केला, परंतु १० मे १८५८ रोजी सलग तिसऱ्यांदा ब्रिटिश सैन्याला पराभवाच्या नामुष्कीचा सामोरे जावे लागले. त्यानंतर क्रिश्टनने युक्तीचा वापर करून बाबुरावला शह देण्याची योजना आखली. अहेरी येथील जमीनदार लक्ष्मीबाईंला चिथावणीवजा पत्र लिहून बंडखोरांना आश्रय दिल्यास व त्यांना मदत केल्यास तिच्यावर खटला चालवून तिची जमीनदारी जप्त करण्याची धमकी दिली. त्यासोबतच बाबुरावला पकडून देण्यात ब्रिटिशांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचा हुकूम केला. या धमकीचा इच्छित परिणाम झाला आणि लक्ष्मीबाईंने ब्रिटिशांना तत्परतेने मदत करण्याची हमी दिली. जुलै १८५८ मध्ये लक्ष्मीबाईच्या सैन्याने बाबुरावला भोपाळपट्टणम येथे पकडण्यात यश मिळवले. परंतु त्याला अहेरी येथे नेले जात असतांना आपल्या रोहिला अंगरक्षकांच्या मदतीने तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर बाबुरावने ब्रिटीशांच्या ताब्यातील प्रदेशांची लूट करण्याचे सत्र चालू ठेवून ब्रिटिश सत्तेस खुले आव्हान दिले. अखेरीस १८ सप्टेंबर १८५८ रोजी लक्ष्मीबाईच्या सैन्याला बाबुरावला पकडण्यात यश आले. लक्ष्मीबाईने त्यास क्रिश्टनच्या स्वाधीन केले. बाबुरावला अटक करून चांदा येथे आणण्यात आले व गंभीर आरोप लावून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. २१ ऑक्टोबर १८५८ रोजी सायंकाळी साडेचार वाजता बाबुरावला चंद्रपूर तुरूंगात फाशी दिली गेली. त्याच्या साथीदारांवरही कोर्टाने खटले चालवून काहींना फाशीची शिक्षा देण्यात आली तर काहींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अखेरीस या प्रदेशातील बंडाचा शेवट झाला. अहेरीची जमीनदार लक्ष्मीबाई हिला तिने केलेल्या मदतीबद्दल ब्रिटिश सरकारकडून कम्पॅनियन ऑफ बाथ हा सम्मान मिळाला व व्यंकटरावची अडपल्ली व घोट येथील ६७ गावांची जमीनदारी बक्षीस म्हणून देण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर चंद्रपूरमध्ये कारागृहाच्या प्रांगणात बाबुराव सेडमाकेचे स्मारक उभारण्यात आले.
© Suresh Nimbalkar